Kitchen Hacks : स्वयंपाकघरात जेवण बनवण्यासाठी वेगवेगळ्या भांड्यांचा वापर केला जातो. त्यात इतर भांड्यांपेक्षा प्रेशर कुकरला खूप जास्त महत्वं असतं. कारण प्रेशर कुकरनं जेवण बनवण्यासाठी वेळ कमी लागतो. वेगवेगळ्या डाळी, पदार्थ किंवा भाज्या शिजवण्यासाठी प्रेशर कुकरची मदत घेतली जाते. पण तुम्ही पाहिलं असेल की, कुकरमधील पाणी किंवा डाळीचं पाणी वर येतं आणि यामुळे शिटीसोबतच कुकरचं झाकणही खराब होतं. अशात हे डाग काढणं अनेकदा त्रासदायक ठरतं. सोशल मीडियावर यावर उपाय सांगणारा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
कुकरमधील पाणी वर येऊन झाकण किंवा शिटी खराब होऊ नये, यासाठी एक खास ट्रिक व्हिडिओत सांगण्यात आली आहे. व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, गॅसवर कुकर ठेवलेला आहे. एक महिला शिटी वर करून त्यावर मोहरीचं तेल टाकत आहे. तसेच झाकणाचा रिंग काढून तिथेही तेल लावत आहे. तेल लावल्यावर शिटी आणि रिंग पुन्हा लावून कुकर गॅसवर ठेवत आहे. महत्वाची बाब म्हणजे तेल लावल्यानंतर शिटी जेव्हा वाजते तेव्हा कुकरमधील पाणी वर येत नाही.
कुकर खराब होण्यापासून रोखण्यासाठी ही एक चांगली ट्रिक आहे. याच कारणाने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. इन्स्टावर हा व्हिडीओ @ayurvedahealthstudio हॅंडलवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत ५ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.
अनेक यूजर्सनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिलं की, 'याहूनही चांगला उपाय म्हणजे कुकरमध्ये पाणी योग्य प्रमाणात टाका. ते बाहेर येणार नाही'. एका दुसऱ्या यूजरने लिहिलं की, 'तेल टाकल्याने कुकरमध्ये स्फोट होऊ शकतो'. तिसऱ्याने लिहिलं की, 'चुकून जर तेल नोजलमध्ये अडकलं तर राम राम सत्य होईल'. अनेकांना ही आयडिया आवडली सुद्धा आहे.
इतरही काही उपाय
- डाळीचं पाणी कुकरमधून वर येऊ नये यासाठी प्रेशर कुकरमधून ढक्कन शिटी वेगळी करा. आता या शिटी बसवण्याच्या जागेवर थोडं तूप लावा. शिटी पुन्हा लावा. तसेच कुकरमधील पाण्यातही थोडं तूप टाकावं.
- जर डाळ शिजवताना कुकरमध्ये जास्त पाणी टाकाल तर कुकरमध्ये प्रेशर जास्त तयार होतं आणि पाणी बाहेर येतं. अशात डाळ शिजवताना पाण्याचं योग्य प्रमाण असलं पाहिजे. डाळ बुडेल इतकंच पाणी टाका. जास्त पाणी टाळा.