पैसे कमवण्यासाठी, पोट भरण्यासाठी आपण सर्वजण दिवसरात्र काम करत असतो. तहान भूक विसरून कष्ट करत असतो. कधी कधी तर कामाचं प्रेशर इतकं असतं की, कुटुंबाला वेळच देऊ शकत नाही. आरोग्यावर या सर्व गोष्टींचा वाईट परिणाम होतो. अशातच रेडिटवरील एका पोस्टने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली. एका कर्मचाऱ्याला काम असल्याने लंच ब्रेक घेण्यापासून रोखल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पण कर्मचारी घाबरला नाही त्याने मॅनेजरला सडेतोड उत्तर दिलं आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, एका कंपनीत काम करणाऱ्या व्यक्तीला त्याच्या मॅनेजरने लंच ब्रेकवर जाण्यापूर्वी काम पूर्ण करण्यास सांगितलं. कर्मचाऱ्याला आधीच खूप भूक लागली होती आणि त्याने रागाने "मी खाण्यासाठीच कमवत आहे आणि तुम्ही मला जेवण्यापासून थांबवत आहात" असं उत्तर दिलं. त्यानंतर तो त्याच्या शेड्यूलनुसार लंच ब्रेकवर गेला.
कर्मचाऱ्याचं म्हणणं आहे की या घटनेनंतर त्याच्या मॅनेजरने त्याच्याकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली. ही प्रतिक्रिया अनेकांना त्रासदायक वाटली, कारण यातून ऑफिसमधील टॉक्सिक कल्चर आणि पॉवर ट्रिप्सची झलक दिसली. लोकांनी या पोस्टवर तीव्र प्रतिक्रिया दिल्या. एका युजरने "कदाचित त्याला वाटलं असेल की त्याने चूक केली आहे, परंतु त्याची ही एक गोष्ट अनेक लोकांना वाचवू शकते. आता तो मॅनेजर पुन्हा असं बोलण्यापूर्वी नक्कीच विचार करेल" असं म्हटलं आहे.
दुसऱ्या एका व्यक्तीने त्याची गोष्ट सांगितली, “माझ्यासोबतही असंच घडलं. जेवणाच्या मध्येच मॅनेजरने फोन केला आणि आधी काम पूर्ण करायला सांगितलं. मी जेवण सोडून काम पूर्ण करायला गेलो आणि घरी आल्यावर मी रडू लागलो. माझी आई म्हणाली – ‘बेटा, तू फक्त खाण्यासाठी कमावतोस, आणि जर तू जेवत नसशील तर काय उपयोग?’ त्यानंतर, मीही हुशारीने उत्तर देऊ लागलो.” लोक त्यांच्यासोबत घडलेल्या घटना सांगत आहेत.