प्रेमाला वयाचं बंधन नसतं, कोण कधी कोणाच्या कसं प्रेमात पडेल हे सांगता येत नाही. काही प्रेमप्रकरणं परिस्थितीमुळे अधुरी राहतात. पण कधीकधी नियती स्वतः अशा अधुऱ्या प्रेमकथा पूर्ण करण्याचा मोठा निर्णय घेते. केरळमधील जयप्रकाश आणि रश्मी यांच्यासोबत असंच काहीसं घडलं आहे. त्यांची प्यारवाली लव्हस्टोरी सध्या सोशल मीडियावर अनेकांच्या मनाला स्पर्शून जात आहे.
मुंडक्कलचे रहिवासी असलेले जयप्रकाश आणि रश्मी तरुणपणी एकमेकांच्या प्रेमात होते. जयप्रकाश यांच्या मनात भावना होत्या, पण त्या व्यक्त करण्याची हिंमत त्यांच्याकडे नव्हती. याच दरम्यान रश्मी यांचं लग्न झालं आणि जयप्रकाश कामाच्या निमित्ताने परदेशात निघून गेले.
काळाने दोघांनाही वेगवेगळ्या वळणांवर आणून उभं केलं. जयप्रकाश यांनीही त्यानंतर लग्न केलं आणि आपला संसार थाटला. आयुष्य वेगवेगळं सुरू होतं. रश्मी यांच्या पतीचं १० वर्षांपूर्वी आणि जयप्रकाश यांच्या पत्नीचं ५ वर्षांपूर्वी निधन झालं. एकटेपणातून बाहेर पडण्यासाठी रश्मी यांनी सांस्कृतिक उपक्रम आणि शॉर्ट फिल्ममध्ये अभिनय करण्यास सुरुवात केली.
जयप्रकाश यांनी एका शॉर्ट फिल्ममध्ये रश्मी यांना पाहिलं आणि कुटुंबाच्या माध्यमातून त्यांच्याशी संपर्क साधला. जुन्या आठवणी, मनात असलेलं प्रेम आणि पुन्हा एकत्र येण्याची ओढ निर्माण झाली. या कथेतील सर्वात सुंदर पैलू म्हणजे दोघांच्या मुलांनी या नात्याचा मोकळ्या मनाने स्वीकार केला. रश्मी यांची मुलगी आणि जावई तसेच जयप्रकाश यांची मुलं या सर्वांच्या संमतीने कोची येथे एका साध्या समारंभात या दोघांचा विवाह संपन्न झाला.
