'कौन बनेगा करोडपती १७' च्या लेटेस्ट एपिसोडमध्ये गांधीनगरचा पाचवीतील विद्यार्थी इशित भट याच्या खेळाने केवळ मनोरंजनच नाही तर लहान मुलांच्या मानसिक आरोग्यावर प्रकाश टाकला आहे. इशित भट याने ओव्हर कॉन्फिडन्समुळे'रामायणा'वर आधारित एका सोप्या प्रश्नाचे उत्तर चुकवलं आणि काहीही पैसे न मिळवता त्याला स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं.
इशित भट याने सुरुवातीला वेगवान उत्तर देत बिग बी अमिताभ बच्चन यांनाही प्रभावित केलं. तो प्रश्नांची उत्तरं पर्याय पूर्ण होण्याचीही वाट न पाहता देत होता. मात्र, २५,००० रुपयांसाठी त्याला 'वाल्मिकी रामायणा'च्या पहिल्या कांडाचे नाव विचारण्यात आलं. ओव्हर कॉन्फिडन्सच्या भरात मुलाने घाईघाईत चुकीचं उत्तर दिलं, ज्यामुळे त्याला कोणतीही रक्कम न घेता हॉटसीट सोडावी लागली.
या घटनेनंतर अमिताभ बच्चन यांनी लहान मुलांच्या, तरुण पिढीच्या ओव्हर कॉन्फिडन्सवर भाष्य केलं. "कधी कधी लहान मुलं ओव्हर कॉन्फिडन्समध्ये चूक करतात" असं म्हटलं आहे. इशितने प्रश्नाचं उत्तर हे पर्याय न पाहता दिलं. हीच रिस्क आणि ओव्हर कॉन्फिडन्स त्याला नडला. यामुळेच कोणत्याही गोष्टीला प्रतिसाद देण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करण्याचं महत्त्व देखील अधोरेखित झालं.
आरोग्य आणि मानसशास्त्राच्या दृष्टीने पाहिल्यास घाईघाईत आणि पर्यायांचा विचार न करता निर्णय घेणं हे हाय स्ट्रेस परिस्थितीत एकाग्रता आणि निर्णयक्षमता गमावल्याचं लक्षण असू शकतं. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, शालेय जीवनात स्पर्धेच्या वातावरणात ओव्हर कॉन्फिडन्स कधीकधी मुलांच्या आकलन क्षमतेत अडथळा आणू शकतो.
कठीण परिस्थितीत शांत राहून, सर्व पर्याय काळजीपूर्वक वाचून निर्णय घेणं हे केवळ गेम शोसाठीच नव्हे, तर दैनंदिन जीवनातील मानसिक आरोग्यासाठीही महत्त्वाचे आहे. इशित भटच्या उदाहरणावरून पालकांनी आपल्या मुलांमध्ये आत्मविश्वासासोबतच एकाग्रता आणि समतोल विचार करण्याची क्षमता विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे.