सध्या जगभरात 'वर्क-लाईफ बॅलन्स' म्हणजेच काम आणि पर्सनल आयुष्याचा समतोल साधण्यावर जोर दिला जात आहे. याच दरम्यान नेदरलँड्सची राजधानी ॲमस्टरडॅम येथे राहणाऱ्या एका भारतीय महिलेने शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे, ज्यामुळे भारतीय कॉर्पोरेट कल्चरवर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. बरोबर ५ वाजता संपूर्ण ऑफिस रिकामं झालेलं पाहायला मिळत आहे.
'ज्योती सैनी' (@livewithjyoti) नावाच्या इन्स्टाग्राम युजरने एका व्हिडिओद्वारे दाखवलं की, युरोपातील ऑफिसमध्ये कामाच्या वेळेचं किती कडक पालन केलं जातं. या व्हिडिओमध्ये ५ वाजण्याची वेळ होताच ऑफिसमधील सर्व डेस्क आणि वर्कस्टेशन्स एका मिनिटात रिकामं झाल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. कामाची वेळ संपताच एकही कर्मचारी ऑफिसमध्ये थांबत नाही.
व्हिडिओला 'कॉर्पोरेट शॉक' (Corporate Shock) असं टायटल देण्यात आले आहे. भारतात जिथे कॉर्पोरेट जगात कामाच्या वेळेनंतरही उशिरापर्यंत थांबणं ही एक सामान्य बाब मानली जाते, तिथे युरोपियन कर्मचाऱ्यांचा वेळेवर ऑफिस सोडण्याचा हा व्हिडिओ भारतीय लोकांसाठी आश्चर्याचा मोठा धक्का आणि चर्चेचा विषय ठरला आहे.
सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून अनेक भारतीयांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. बहुतांश युजर्सनी युरोपियन वर्क कल्चरचे कौतुक करत, वेळेनुसार काम संपवून पर्सनल आयुष्याला महत्त्व देण्याचं हे कल्चर भारतातही 'नॉर्मलाईज' करण्याची जोरदार मागणी केली आहे. "हे कल्चर सगळीकडे करा... " असं म्हटलं आहे.
एका युजरने "आमच्या ऑफिसमध्ये ५ वाजता ऑफिसमधन निघणं म्हणजे 'हाफ डे' (Half Day) मानलं जातं" असं सांगितलं . तर दुसऱ्याने "युरोपातील लोक खऱ्या अर्थाने जीवन जगत आहेत आणि नोकरी हा त्याचा एक भाग आहे, पण भारतात आपण नोकरीसाठी जगतो" असं म्हटलं आहे. कामाच्या वेळेचे कडक नियम आणि कर्मचाऱ्यांसाठी असलेला आदर पाहून, अनेक भारतीय नोकरदार आता भारतातील वर्क कल्चरवर प्रश्नचिन्ह उभे करत आहेत.