Join us

ऐन लग्नात स्वत:चा मेकअप सोडून नवरीच करतीये नवऱ्याचा मेकअप, पाहा व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2022 13:43 IST

नवरी तर चक्क लग्नाच्या दिवशी आपला मेकअप सोडून आपल्या होणाऱ्या नवऱ्याला तयार करताना दिसली.

ठळक मुद्देलग्नाच्या हॉलमध्ये असणाऱ्या खोलीत हा व्हिडिओ शूट करण्यात आल्याचे दिसते. इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ व्हायरल झाला असून नेटीझन्सनी या व्हिडिओला भरपूर पसंती दिली आहे.

लग्न म्हणजे प्रत्येकासाठीच आयुष्यातील एक महत्त्वाचा सोहळा. आयुष्याच्या नव्या वळणावर पाऊल ठेवत असताना हा क्षण साजरा व्हायला हवा यासाठी लग्नसमारंभ मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडताना दिसतात. या दिवशी आपण खास दिसायला हवे यासाठी प्रत्येकाचीच धडपड सुरू असते. मुलींच्या बाबतीत तर त्यांचे दिसणे, कपडे, मेकअप या सगळ्याला खूपच जास्त महत्त्व असते. या सगळ्या गोष्टींसाठी लाखो रुपये खर्च केले जातात. नवऱ्या मुलीची तयारी हा सगळ्यांसाठीच एक चर्चेचा आणि महत्त्वाचा विषय असतो. नवऱ्या मुलीला विधींना, प्रत्यक्ष मंगलाष्टकांच्या वेळी आणि मग रिसेप्शनला असे बरेच कपडे बदलायचे असतात. या सगळ्यावर वेगवेगळा मेकअप आणि तितकेच वेगवेगळे दागिने आणि हेअरस्टाइल. या सगळ्या गोष्टींना साहजिकच बराच वेळ लागतो. त्यामुळे प्रत्येक जण लग्नाच्या दिवशी नवरीला तयार होण्याची घाई करत असतो. 

आपला जोडीदार कायमच सुंदर दिसावा असे प्रत्येकालाच वाटत असते. त्यासाठी आपण त्याला असे राहा, तसे राहा अशा सूचनाही करतो. पण एक नवरी तर चक्क लग्नाच्या दिवशी आपला मेकअप सोडून आपल्या होणाऱ्या नवऱ्याला तयार करताना दिसली. वरातीसाठी हा नवरा चाललेला असताना त्याचे कपडे नीट करण्यापासून ते त्याला डोक्यावर तयार फेटा घालण्यापर्यंत सगळं ही नवरी अतिशय प्रेमाने करत असल्याचे व्हिडिओमध्य़े दिसत आहे. हा नवराही अगदी प्रेमाने छान करुन घेत असल्याचे य़ा व्हिडिओमध्ये दिसते. शेवटी नवरी त्याला आता मस्त दिसतोय अशा स्वरुपाचे काही सांगत असल्याचे तिच्या देहबोलीवरुन दिसते. 

इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ व्हायरल झाला असून नेटीझन्सनी या व्हिडिओला भरपूर पसंती दिली आहे. अवघ्या २० दिवसांत या व्हिडिओला ३ लाखांच्या जवळपास लाईक्स मिळाले असून या दोघांचे प्रेम पाहून अनेकांनी या कपलला शुभेच्छा देत त्यांचे कौतुक केले आहे. कपल्स लाईफ स्टेटस ६६ असे या इन्स्टाग्राम पेजचे नाव असून ऑफिशिअली क्यूटी प्राची या अकाऊंटला टॅग करुन हा व्हिडिओ पोस्ट कऱण्यात आला आहे. लग्नाच्या हॉलमध्ये असणाऱ्या खोलीत हा व्हिडिओ शूट करण्यात आल्याचे दिसते. तसेच नवऱ्या मुलीचा मेकअप आणि हेअरस्टाइल झालेली असून तिही लवकरच तयार होणार असल्याचे दिसत आहे.  

टॅग्स :सोशल व्हायरललग्नइन्स्टाग्राम