Join us
Daily Top 2Weekly Top 5

"माझा मूड खराब..."; चिडलेल्या नवऱ्याची घरात तोडफोड, एका डिशवॉशरने मोडला सुखाचा संसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 14:04 IST

एका दाम्पत्याचा डिशवॉशर खरेदीवरून झालेला वाद सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

चीनमधील एका दाम्पत्याचा डिशवॉशर खरेदीवरून झालेला वाद सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. पत्नीने आपल्या संमतीशिवाय डिशवॉशर विकत घेतल्याने पती इतका संतापला की, त्याने रागाच्या भरात घराचं मोठं नुकसान केलं आणि थेट फर्निचरची तोडफोड केली.

चीनच्या ग्वांगडोंग प्रांतातील एका महिलेने ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून १,५०० युआन (सुमारे १८,००० रुपये) किमतीचा डिशवॉशर खरेदी केला होता. तिने ही खरेदी पतीला न सांगता केली होती. हिवाळ्यात हात थंड पडत असल्याने भांडी घासणं खूप कठीण जातं आणि पती कामात मदत करत नाही, म्हणून तिने हा निर्णय घेतला होता.

जेव्हा डिशवॉशर फिट करण्यासाठी कर्मचारी घरी पोहोचला, तेव्हा पतीला या खरेदीबद्दल समजलं. पाण्याचं आणि विजेचं बिल जास्त येईल असे सांगून पतीने ती ऑर्डर रद्द करण्यास सांगितलं. पत्नीने "हे फार महाग नाही, आपण हे घेऊ शकतो" असं म्हणत नकार दिला.

पत्नीने डिशवॉशर बसवण्याचा हट्ट धरल्यावर पतीचा संयम सुटला. त्याने संतापून लिव्हिंग रुममधील फर्निचर आणि इतर वस्तूंची तोडफोड करण्यास सुरुवात केली. पतीने केलेल्या या राड्यामुळे घाबरलेली पत्नी रडत घराबाहेर पडली आणि तिने ती रात्र एका हॉटेलमध्ये काढली.

दुसऱ्या दिवशी पत्नीने तो डिशवॉशर परत केला. त्यानंतर पतीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत पत्नीची माफी मागितली. त्याने म्हटले, "माझा मूड खराब होता, म्हणून मी तसं वागलो. भविष्यात मी तुला चांगली वागणूक देईन. आपण यापेक्षा लहान डिशवॉशर खरेदी करू."

या घटनेवर इंटरनेटवर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी पतीच्या हिंसक वागणुकीवर टीका केली आहे, तर काहींनी पत्नीने घराची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घ्यायला हवा होता, असं मत मांडलं आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Dishwasher Dispute: Angry Husband Destroys Home, Marriage Suffers

Web Summary : A Chinese husband, enraged by his wife's dishwasher purchase without his consent, destroyed their home. He later apologized, citing a bad mood. Public reactions are mixed.
टॅग्स :सोशल मीडियासोशल व्हायरलचीन