Paper Soap Making : आपल्या घरात अशा कितीतरी गोष्टी असतात ज्या आपण कचरा समजून बाहेर फेकतो. यातील एक गोष्ट म्हणजे बाथरूममध्ये शिल्लक राहिलेले साबणाचे छोटे छोटे तुकडे. आंघोळीच्या साबणांचे छोटे छोटे तुकडे कचऱ्यात फेकले जातात. पण जर आपण थोडा वेळ काढला तर या साबणांच्या तुकड्यांचा चांगला वापर करू शकता. सोबतच पैसेही वाचवू शकता. या साबणांच्या शिल्लक राहिलेल्या तुकड्यांपासून आपण पेपर सोप तयार करू शकता. जे बाजारात बरेच महाग मिळतात. महत्वाची बाब म्हणजे घरी तयार करण्यात आलेले पेपर सोप देखील बाजारातील पेपर सोपसारखे काम करतात. यासाठी फार खर्चही येणार नाही. चला तर पाहुयात घरी पेपर सोप कसे तयार करावेत.
पेपर सोप बनवण्यासाठी लागणारे साहित्य
उरलेले साबणाचे तुकडे
थोडे पाणी
किसणी
छोटा पॅन किंवा बाउल
बटर पेपर / प्लास्टिक शीट
चमचा किंवा ब्रश
पेपर सोप बनवण्याची पद्धत
साबण किसून घ्या - उरलेले साबणाचे तुकडे किसणीने बारीक किसून घ्या. त्यामुळे ते लवकर वितळतात.
साबण वितळवा - किसलेला साबण एका छोट्या पॅनमध्ये घ्या. त्यात १-२ चमचे पाणी घाला आणि मंद आचेवर गरम करा. साबण हळूहळू वितळून पेस्टसारखा होईल.
मिश्रण पसरवा - वितळलेला साबण बटर पेपर किंवा प्लास्टिक शीटवर खूप पातळ थरात पसरवा. तो थर ३-४ तास किंवा पूर्ण सुकून जाईपर्यंत तसेच ठेवा.
छोटे तुकडे कापा - सुकल्यानंतर त्याचे लहान चौकोनी किंवा आयताकृती पेपरसारखे तुकडे कापा. तुमचे पेपर सोप तयार झाले.
हे कट केलेले तुकडे आपण एखाद्या बॉक्समध्ये स्टोर करू शकता. जेव्हा आपण कुठे बाहेर जाता किंवा प्रवासाला जाता तेव्हा यांचा वापर करू शकता. हात धुण्यासाठी यांचा वापर करू शकता. हे बाहेरून विकत घेण्याची गरज पडणार नाही.
