निचलगड या छोट्याशा गावातील एक फोटो सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये एक नातू आपल्या ७० वर्षांच्या आजारी आजीला पाठीवर घेऊन खडकाळ रस्त्यांवरून सुमारे १ किलोमीटर चालत आरोग्य केंद्राकडे घेऊन जाताना दिसत आहे. हे दृश्य जितकं भावनिक आहे तितकेच ते सरकारी दाव्यांचे धक्कादायक वास्तव उघड करत आहे.
कलाराम असं या नातवाचं नाव आहे आणि सोमी बाई असं आजीचं नाव आहे. जेव्हा त्याच्या आजीची तब्येत अचानक बिघडली तेव्हा कलारामने तिला पाठीवर घेऊन आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी कठीण मार्गाने अथकपणे प्रवास केला. त्याच्या या कृतीने लोकांची मनं जिंकली आणि हा फोटो इंटरनेटवर व्हायरल झाला. तो सोशल मीडियावर हिरो झाला आहे. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही आबू रोडवरील निचलगडसारख्या गावांमध्ये मूलभूत सुविधांचा प्रचंड अभाव आहे. चांगले रस्ते किंवा रुग्णालय नाही. येथील लोकांना मूलभूत उपचारांसाठीही गुजरातला जावं लागतं.
गेल्या ४२ वर्षांत येथे एकही नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र (पीएचसी) सुरू करण्यात आलेलं नाही, असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. १९८३ मध्ये बांधलेलं प्राथमिक आरोग्य केंद्र आजही कार्यरत आहे. या काळात लोकसंख्या वाढली, परंतु आरोग्य सेवा ठप्प राहिल्या. सरकार आदिवासी भागात आरोग्य सुविधा पुरवण्याचे सतत दावे करते, परंतु या फोटोने वास्तव समोर आलं आहे. योजना फक्त कागदावरच राहिल्या आणि प्रत्यक्षात परिस्थिती बदललेली नाही.
गेल्या चार दशकांपासून गावकरी प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणी करत आहेत, परंतु त्यांचं म्हणणं कोणीच ऐकत नाही. गावकऱ्यांना आशा आहे की, सरकार लवकरच त्यांचा हा त्रास आणि समस्या समजून घेईल आणि नवीन आरोग्य केंद्र सुरू करण्यात येतील, जेणेकरून कोणालाही त्यांच्या वृद्ध आई किंवा आजीला पाठीवर घेऊन रुग्णालयात जावं लागणार नाही.