भारतात तरुण सरकारी नोकऱ्या मिळवण्यासाठी उत्सुक असतात. कारण त्यांना सरकारी नोकऱ्यांची स्थिरता, फायदे आणि प्रतिष्ठा दिसते. याच दरम्यान एका सायकोलॉजिस्टचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. त्यांनी हा समज मोडून काढला. मिळालेल्या माहितीनुसार, सायकोलॉजिस्ट एकात्म्या एका व्हायरल इन्स्टाग्राम व्हिडीओमध्ये खूप रडल्या. तसेच त्यांनी सरकारी नोकरी मानसिक आरोग्यासाठी विष असल्याचं म्हटलं आहे.
सायकोलॉजिस्ट एकात्म्या यांनी सरकारी नोकरीतील त्यांच्या अनुभवाबद्दल एक भावनिक व्हिडीओ शेअर केला आहे. एकात्म्या यांनी सरकारी व्यवस्थेतील त्रुटी उघड केल्या आहेत. त्यांनी म्हटलं आहे की, सरकारी नोकऱ्यांच्या ग्लॅमरमागे एक विषारी वातावरण लपलेलं आहे ज्यामुळे त्या खूप थकल्या आहेत. एकात्म्या यांनी आरोप केला की, सरकारी व्यवस्थेतील कार्यसंस्कृती खूपच खराब आहे आणि कर्मचाऱ्यांचा आदर नाही.
सरकारी कार्यालयांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव
कर्मचाऱ्यांवर जास्त भार टाकला जातो. एकात्म्याने दावा केला की, सरकारी कार्यालयांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव आहे. त्या ज्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणी तुटलेले दरवाजे, काम न करणाऱ्या कम्पुटर लॅब आणि खाण्यापिण्यासाठी कॅन्टीन नाहीत. सरकारी नोकरीमुळे तिच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम झाला आहे आणि आता कामात समाधान मिळत नाही.
एकात्म्या यांच्या धाडसाचं, दृढनिश्चयाचं कौतुक
काही लोकांनी एकात्म्या यांच्या धाडसाचं आणि बोलण्याच्या दृढनिश्चयाचं कौतुक केलं आहे, तर काहींनी त्यांच्यावर टीका केली आहे. सरकारी नोकरीची वास्तविकता खूप वेगळी आहे. काहींनी असं निदर्शनास आणून दिले की भारतीय सरकारी कार्यालयांमध्ये अशा समस्या सामान्य आहेत. "मी पाच महिन्यांपूर्वी रुजू झालो होतो आणि मी तुमच्याशी पूर्णपणे सहमत आहे. हे मी अपेक्षित असलेले जीवन नाही" असं एका युजरने म्हटलं आहे.