Join us
Daily Top 2Weekly Top 5

दृष्टिहीन वडिलांसोबत भीक मागायची लेक; अभ्यासात हुशार, परिस्थितीवर मात करत बदललं नशीब

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 16:46 IST

सात वर्षांची असताना आपल्या वडिलांसोबत रस्त्यावर भीक मागायची.

वेगाने बदलणाऱ्या जगात प्रत्येकाचं जीवन हे साधं सोपं नाही. अनेक वेळा परिस्थिती माणसाची कठोर परीक्षा घेत असते. अशातच चीनच्या झांग यानने जर तुमच्याकडे प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनत करण्याची जिद्द असेल तर तुम्हीही काहीही करू शकता हे सिद्ध केलं आहे.  सर्वात कठीण परिस्थिती देखील यशाची पायरी बनू शकते हे दाखवून दिलं. बिकट परिस्थितीवर मात करत तिने आपलं नशीब पालटलं आहे. 

झांग यानचे वडील हे दृष्टिहीन होते. आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असल्याने झांग सात वर्षांची असताना आपल्या वडिलांसोबत रस्त्यावर भीक मागायची. २०१० मध्ये वडील झांग शिमिंग यांच्या डोळ्याला जंगलामध्ये खिळा लागला. पैशाअभावी त्यांच्यावर उपचार घेता आले नाहीत आणि त्यामुळेच हळूहळू त्यांची दृष्टी गेली. वडील आणि मुलीला रस्त्यावर आश्रय घ्यावा लागला.

वडिलांना अंधत्व आल्यानंतर, आईला गंभीर मानसिक आजार होऊ लागला. झांगचा एक भाऊ दिव्यांग आहे. तीन लहान बहिणींना शिकवण्याची जबाबदारी आणि घर चालवण्याचा भार झांगवर आला. पालकांनी कसातरी एक छोटासा स्टॉल लावला आणि बॅटरी, लाईटरसारख्या छोट्या वस्तू विकून आपला उदरनिर्वाह करण्यास सुरुवात केली.

प्रचंड गरिबी असूनही झांगने आपलं शिक्षण सोडलं नाही. ती नेहमीच वर्गात पहिला नंबर काढायची. तिच्या घराच्या भिंती सर्टिफिकेटने भरल्या आहेत. झांग म्हणते की, लोकांच्या अजब नजरेची भीती वाटत होती, पण शिक्षक आणि मित्र-मैत्रिणींच्या प्रेमाने मला हिंमत दिली." २०२५ मध्ये झांगला फिजिक्सचा अभ्यास करण्यासाठी चेंगदू नॉर्मल युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश मिळाला. 

झांगने दिलेल्या माहितीनुसार, "मला माझं शिक्षण पूर्ण केल्यानंतर शिक्षिका व्हायचं आहे, जेणेकरून मी कुटुंबाचा भक्कम आधार बनू शकेन. त्याच वेळी, डोंगरात राहणाऱ्या मुलांना चांगलं शिक्षण देण्याचं माझं स्वप्न देखील आहे." झांगची ही गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे आणि अनेकांना तिच्यापासून प्रेरणा मिळत आहे. 

टॅग्स :सोशल मीडियासोशल व्हायरल