माणसाला नातेवाईक, परिवार, जन्म ठिकाण निवडण्याचे स्वातंत्र्य नाही. नाती जन्मताच ठरलेली असतात. मात्र एक नाते आहे जे व्यक्ती स्वत:हून तयार करते आणि वर्षानुसार हे नातं बदलंत जातं. हे नातं म्हणजे मैत्रीचं. आयुष्यात एक तरी जवळचा मित्र किंवा मैत्रिण असायलाच हवी. (Friendship Day 2025: having a good friend in life is very important, people can't live without friends)मैत्री फार गरजेची असते. हे नाते इतर नात्यांपेक्षा फार वेगळे असते. या नात्यात जेवढे स्वातंत्र्य आहे तेवढे इतर कोणत्याही नात्यात नाही. मित्रमैत्रिणींसमोर तुम्ही तुमच्या मानातील भावना अगदी प्रेम, राग, द्वेष, मत्सर सारे काही बिनधास्त व्यक्त करता. खरे तर या नात्याची किंमत कळायला एक ठराविक वय उलटायला लागते. रोज भेटणारे मित्र शिक्षण-कामानिमित्त आपल्यापासून दूर गेल्याशिवाय त्यांच्यासोबत रोज मारलेल्या गप्पांची किंमत कळत नाही.
तुमच्या लहान यशात आनंद व्यक्त करणारे, दु:खात कायम तुमच्या पाठी उभे असणारे आणि जर तुम्ही चुकत असाल तर कान पिळणारी मैत्रिण मिळणे हे नशीबवान असल्याचे लक्षण आहे. अनेकदा असे प्रसंग आयुष्यात येतात जे आपण कोणालाही सांगू शकत नाही. अशा वेळी डोळ्यासमोर सगळ्यात आधी तोच मित्रपरिवार येतो. सगळ्यात आधी आपण त्यांनाच भेटून सगळं सांगतो. मनमोकळं झाल्यावर फार बरं वाटतं. असे मनमोकळेपणने गप्पा मारता येतील असा मित्रपरिवार मिळणे एकदम सुखी माणसाचं लक्षण आहे.
शाळेत स्वत:च्या वह्या देणारा, कॉलेजात आपल्या चहाचे पैसे भरणारा आणि कधीही न ऐकवणारा तसेच आठ तासाची ऑफीस शिफ्ट करुन आल्यावरही पाच मिनटांसाठी कट्ट्यावर भेटणारे मित्रमैत्रिणी म्हणजे थेरेपी असते. मानसिक शांतता मिळवण्यासाठी आजकालचे तरुण अनेक ट्रिटमेंट्स घेतात. जरा तासभर मित्रांशी संवाद साधून पाहा, अशा कोणत्याही ट्रिटमेंट्सची गरजच भासणार नाही. एवढी ताकद या नात्यात असते.
'टिकती नही टिकानी पडती है' मैत्रीच्या नात्याचा जेवढा विचार आणि आदर करायला हवा तेवढा जर करत नसाल तर नक्की करा. धावपळीच्या जीवनात हे एकच नाते असे आहे, जिथे काही द्यावे लागत नाही आणि काही घ्यावेही लागत नाही. कोणत्याही स्वार्थाशिवाय या नात्याची नौका बिनधास्त पुढे जात असते. तुमच्या मित्रमैत्रिणींना तुमचे त्यांच्या प्रतिचे प्रेम जाणवेल यासाठी नक्की प्रेम व्यक्त करा. मैत्रीचे नाते जपावे लागत नाही मात्र मैत्री दुतर्फाच असायला हवी.