Join us  

लग्नाच्या दिवशी मुहूर्त जवळ आला तरी नवरीचे वर्क फ्रॉम होम संपेना... व्हायरल व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2022 4:47 PM

ऐन लग्नातही वधू बॉसशी कामाबाबत बोलत होती, सर तुम्हाला कसं सांगू, आज माझं लग्न आहे म्हणत केली विनवणी...

ठळक मुद्देमुहूर्त जवळ आला तरी ऑफीसचे काम करणाऱ्या नवरीचे नेटीझन्सनी केले कौतुकमेकअप करत काम करणाऱ्या नवरीच्या व्हिडिओला ५० लाखांहून अधिक व्ह्यूज

कोरोनामुळे सध्या जगभरातील अनेक कंपन्यांनी आपल्या कर्माचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा दिली आहे. सर्वच क्षेत्रात असणारे कामाचे वाढते ताण आणि त्यामुळे वैतागलेले कर्मचारी आपल्या आजुबाजूलाच असतात. कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून असणाऱ्या अपेक्षा दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यातच वर्क फ्रॉम होममुळे कामाच्या वेळांवर कोणतेही बंधन राहीलेले नसून दिवसाचे १२-१२ तास काम करणारे लोक आपल्या प्रत्येकाच्याच आजुबाजूला दिसतात. वर्क फ्रॉम होम ही कामाची एक नवीन पद्धती गेल्या काही दिवसांपासून तयार झाली असून त्यामुळे कर्मचाऱ्यांना वैयक्तिक आयुष्यातही अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. वर्क फ्रॉम होमचा एक फायदा मात्र नक्की आहे, तो म्हणजे खाण्याच्या टेबलापासून ते कुटुंब आणि मित्रमंडळींसोबत ट्रीपला जाण्यापर्यंत कोणत्याही ठिकाणहून तुम्ही काम करु शकता. 

 

पण एक वधू तर चक्क स्वत:च्या लग्नात वर्क फ्रॉम होम करताना दिसली. सोशल मीडियावर तिचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि नेटीझन्सनी त्यावर एकाहून एक कमेंटस केल्याचे पाहायला मिळाले. डोक्यावर अक्षता पडायला काही मिनिटांचा कालावधी शिल्लक असताना ही वधू आपल्या आयुष्यातील या खास क्षणांसाठी तयार होत असल्याचे दिसते. पण यावेळीही तिचे काम संपायचे नाव घेत नसल्याचे दिसते. सतत सुरू असणाऱ्या या ऑफीसच्या कामामुळे ही नवरी वैतागलेली व्हिडिओमध्ये दिसत आहे. एकीकडे तिचा मेकअप सुरू असताना ती मात्र लॅपटॉप घेऊन फानवर आपल्या सिनियरशी बोलत असल्याचे दिसते. इतकेच नाही तर पलिकडून तिला काहीतरी काम सांगण्यात येते तेव्हा ती त्या व्यक्तीला थो़डीशी वैतागून सांगून टाकते, की सर आज माझे लग्न आहे आणि हे काम मी नाही करु शकत. 

(Image : Google)

अनेकांनी या नवरीचे ऐन लग्नातही बॉसला अटेंड करते म्हणून तिचे कौतुक केले आहे. या नवरीच्या व्हिडिओवर कमेंटस करत अनेकांनी आपल्या वर्क फ्रॉम होमची दु:खे मांडली आहेत. तर हा व्हिडिओ पाहून अनेकांनी या नवरीच्या बॉसला तिला सुट्टी देण्याची विनंतीही केली आहे. वर्क फ्रॉम होममुळे त्यांना बऱ्याच वेळा गृहीत धरले जाते, किंवा लोक काम सोडून मजा मारतात असे बॉसला किंवा कंपनीला वाटत असते, पण प्रत्यक्षात वर्क फ्रॉम होममध्ये ऑफीसपेक्षा जास्त प्रमाणात काम करावे लागत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. हा व्हिडिओ अनेकांना इतका आवडला आहे की इन्स्टाग्रामवरील ऑफीशिअल सोनाकौर या अकाऊंटवरील हा व्हिडिओ नेटीझन्स वारंवार पाहताना दिसत आहेत. अवघ्या १२ ते १३ दिवसांत हा  व्हिडिओ ५० लाखहून अधिक लोकांनी पाहिला असून त्याला ६ लाखांहून अधिक लाइक्स आले आहेत.   

 

टॅग्स :सोशल व्हायरललग्नसोशल मीडियाइन्स्टाग्राम