घरामध्ये काम करताना अनेकदा छोट्या-मोठ्या दुखापती या होतच असतात. अशातच भांडी घासताना चक्क काचेच्या ग्लासमध्ये हात अडकल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे. अर्जेंटिनामधील महिलेला भांडी घासणं महागात पडलं आहे. एमिलिया सेमेले असं या महिलेचं नाव असून तिचा हात काचेच्या ग्लासमध्ये भांडी घासायच्या स्क्रबरसह अडकला.
काचेच्या ग्लामध्ये हात अडकल्यावर तिने तो बाहेर काढण्याचा खूप प्रयत्न केला पण ते शक्यच झालं नाही. तब्बल दहा तास तिला त्याच अवस्थेत राहावं लागलं. अखेर सर्जरीनंतरच तिची यातून सुटका झाली. एमिलियाने एका टिकटॉक व्हिडीओमध्ये तिच्यासोबत घडलेली ही भयंकर घटना सांगितली. ज्यामुळे अनेकांना धक्का बसला. तिचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
डॉक्टरांनी काच तोडण्याचा प्रयत्न केला, मात्र काच जास्त जाड असल्याने ते शक्य झाले नाही. अखेरीस, तिला सर्जरीसाठी न्यावं लागलं. एमिलियाला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जाईपर्यंत दहा तासांचा अवधी उलटून गेला होता. डॉक्टरांना ग्लास काढताना कोणताही स्नायू किंवा नसाला धक्का लागू होऊ नये याची काळजी घ्यायची होती. म्हणून, तिला भूल देऊनच सर्जरी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
भूल दिल्यानंतर डॉक्टरांना काळजीपूर्वक तो ग्लास तिच्या हातातून बाहेर काढण्यात यश आलं आणि सुदैवाने, तिच्या हाताच्या महत्वाच्या नसा आणि स्नायूंना कोणतंही नुकसान झालं नाही. ही भयंकर घटना असल्याचं एमिलियाने सांगितलं, सोशल मीडियावर आपला अनुभव शेअर करून लोकांना अलर्ट केलं आहे. भांडी घासताना आवश्यक ती काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे हेच यातून दिसून येतं.