Tea Pan Cleaning Tips: जवळपास सगळ्याच घरांमध्ये किंवा टी-स्टॉलवर सुद्धा चहा करण्यासाठी एकाच स्टीलच्या किंवा अॅल्युमिनिअमच्या भांड्याचा वापर केला जातो. वारंवार तेच तेच पातेलं वापरल्याने काळपट होतं. भांड्याच्या कडेला सुद्धा काळपट लाइन्स पडतात. जे बघायला खराब दिसू लागतं. अनेकदा चहा किंवा दूध उकळताना भांडं जळतं आणि मग ते स्वच्छ करायला खूप मेहनत घ्यावी लागते. खूप मेहनत घेऊनही भांड्याचा काळपटपणा जाईलच असं नाही. पण काही सोपे घरगुती उपाय वापरले, तर चहाचं जळलेलं भांडं सहजपणे चमकदार करता येतं. असेच काही उपाय पाहुयात.
चहाचं जळालेलं भांडं स्वच्छ करण्याचे उपाय
बेकिंग सोडा आणि लिंबू
जळलेल्या भांड्यात पाणी घाला आणि त्यात अर्धा लिंबाचा रस व १ चमचा बेकिंग सोडा टाका. हे मिश्रण ५–१० मिनिटं गॅसवर गरम करा. नंतर पाणी थंड होऊ द्या आणि स्क्रबरने स्वच्छ घासा. भांड्यावरील काळपट थर नाहीसा होऊन ते पुन्हा चमकू लागेल.
मीठ आणि व्हिनेगर
भांड्याच्या जळलेल्या भागावर मीठ शिंपडा आणि त्यावर थोडा व्हिनेगर टाका. दोघांच्या मिश्रणाने काळपट डाग सैल होतात. भांडे १०–१५ मिनिटांसाठी तसेच ठेवा, नंतर स्क्रबरने घासून धुवा.
लिंबाचा वापर
फक्त लिंबानेही हलकं जळलेलं भांडं स्वच्छ करता येतं. आधी नेहमीप्रमाणे भांडे धुवा. मग जिथे जळलेले डाग आहेत तिथे लिंबाची साले घासा. त्यावर डिशवॉश लिक्विड लावा आणि गरम पाणी टाका. थोड्याच वेळात डाग निघून जातील.
बटाट्याची साल
बटाट्याची साले देखील भांडे स्वच्छ करतात. जळलेल्या भांड्यात काही बटाट्याची साले आणि थोडं पाणी घाला. हे मिश्रण गॅसवर उकळा. थंड झाल्यावर साबण आणि स्क्रबरने स्वच्छ घासा. खासकरून अॅल्युमिनियमच्या भांड्यांसाठी हा उपाय अतिशय परिणामकारक आहे.
फक्त बेकिंग सोडा
१ चमचा बेकिंग सोडा आणि थोडं डिशवॉश लिक्विड मिक्स करून जळलेल्या भागावर लावा. अर्धा तास तसंच ठेवा. नंतर स्क्रबरने घासून धुवा. भांडं नवीनसारखं चमकेल.
