Tips To Get Rid Of Mosquitoes : उन्हाचा पारा आता चांगलाच वाढलाय. ज्यामुळे आधीच लवकर झोप लागत नाही. अशात वरून डासांचा वाढता त्रास म्हणजे कहर. डासांमुळे झोप तर चांगली होतच नाही वरून डेंग्यू आणि मलेरियासारख्या आजारांचा धोकाही असतो. सामान्यपणे घराघरांमध्ये हीच सवय बघायला मिळते की, लोक डासांना पळवून लावण्यासाठी लिक्विड कॉइल, मॉस्किटो कॉइल, वेगवेगळ्या अगरबत्त्या किंवा केमिकल स्प्रेचा वापर करतात. काही लोक तर डास चावू नये यासाठी काही क्रीमचा देखील वापर करतात. पण अनेकजण याचा विचारच करत नाहीत की, हे धुराचे कॉइल किंवा केमिकल स्प्रे आपल्यासाठी खूप घातक ठरू शकतात. अशात आपण काही घरगुती आणि नॅचरल उपाय करूनही डासांना पळवून लावू शकता. फक्त यासाठी थोडी वेगळी मेहनत घ्यावी लागेल इतकंच...आम्ही आपल्याला असेच चार सोपे उपाय सांगणार आहोत.
कडूलिंब आणि कापराची जादू
कडूलिंबामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात आणि त्याचा वास डासांना अजिबात आवडत नाही. कडुलिंबाच्या तेलात थोडा कापूर मिसळा आणि दिव्यासारखे पेटवा. यामुळे निर्माण होणारा धूर डासांना घरातून लवकर दूर पळवतो.
लिंबू आणि लवंग
हा अतिशय सोपा आणि प्रभावी उपाय मानला जातो. यासाठी एक अर्धा लिंबू कापून त्यात ६–७ लवंगा खोचा. हे लिंबू खोलीच्या कोपऱ्यात किंवा खिडकीजवळ ठेवा. त्याचा सुगंध डासांसाठी नैसर्गिक रिपेलेंटसारखा काम करतो.
घरात लावा हे खास रोपे
डासांना दूर ठेवण्याचा एक आणखी चांगला उपाय म्हणजे डास पळवणारे झाडी लावणे. तुम्ही घरात तुळस लावू शकता. याच्या आसपास डास कमी येतात. तसेच लेमनग्रास आणि Citronella ही झाडे सुद्धा डासांना दूर ठेवण्यात प्रभावी मानली जातात. यांचा लिंबूसारखा सुगंध डासांना गोंधळात टाकतो.
लसूण स्प्रे
लसणाचा तीव्र वास डासांना सहन होत नाही. काही लसणाच्या पाकळ्या ठेचून पाण्यात उकळा. हे पाणी स्प्रे बाटलीत भरून घराच्या कोपऱ्यांत, पडद्यांवर आणि घराच्या दाराजवळ स्प्रे करा. यामुळे डास घरात येणे कमी होते.
