Home Cleaning Tips : घरात जर पसारा असेल, स्वच्छता नसेल तर घरात अजिबात मन लागत नाही. त्यात जर टाईल्सवर म्हणजे लादीवर जर पिवळे, काळे डाग असतील तर आणखीनच खराब दिसतात. महत्वाची बाब दिवसभर आपण या लादीवर बसत असतो किंवा लहान मुले खालीच खेळत असतात. अशात लादी स्वच्छ असणं फार गरजेचं होऊन बसतं. बरं असं नाही की, लादी रोज पुसली जात नाही. रोज लादी केमिकल्सचा वापर करून किंवा मग साध्या पाण्याने पुसली जाते. पण तरी सुद्धा पिवळे किंवा काळे डाग जात नाहीत. पण आता याची फार काळजी करू नका. कारण सोपे आणि घरगुती करून लादीवर पडलेले पिवळे डाग सहज दूर केले जाऊ शकतात. त्यासाठी काही ट्रिक्स आम्ही आपल्याला सांगणार आहोत.
लादीवरील पिवळे डाग दूर करण्याचे उपाय
व्हाइट व्हिनेगर - व्हाइट व्हिनेगर एक नॅचरल आणि फार प्रभावी असं क्लीनर आहे. यात थोडं अॅसिड असतं. जे हट्टी डाग काढण्यास मदत करतं. याचा वापर करण्यासाठी एका बकेटीत एक झाकण व्हाइट व्हिनेगर घाला. नंतर या पाण्याने लादी साफ करा. जिथे जास्त डाग असतील त्यावर थेट थोडं व्हिनेगर घातलेलं पाणी टाकून घासा. याने डाग तर दूर होतीलच, सोबतच बॅक्टेरिया देखील नष्ट होतील आणि लादी चमकदार दिसेल.
बेकिंग सोडा आणि पाणी - बेकिंग सोडा प्रत्येक घरात असतोच असतो. याचा वापर घरातील वेगवेगळ्या कामांसाठी केला जातो. पण अनेकांना कल्पना नसते की, बेकिंग सोड्याने लादी स्वच्छ करण्यासही मदत होते. याचा वापर करण्यासाठी बेकिंग सोड्यात थोडं पाणी टाकून घट्ट पेस्ट तयार करा. ही पेस्ट लादीवर हट्टी डागांवर लावा आणि १० ते १५ मिनिटांपर्यंत तशीच राहू द्या. नंतर हलक्या हाताने स्पंज किंवा कापडाच्या मदतीने आणि पाण्याने लादी धुवा. डाग दूर झालेले दिसतील.
लिंबाचा रस - लिंबामध्ये सायट्रिक अॅसिड असतं, जे डाग दूर करण्यास मदत करतं आणि लादीला एक फ्रेशनेसही देतं. याचा वापर करण्यासाठी लिंबाचा रस पाण्यात घालून लादी पुसा. जास्त डाग असलेल्या जागांवर लिंबाचा रस थेट स्प्रे करा आणि कपड्याने पुसा. लिंबामुळे लादीवरील डाग तर जातातच, सोबतच एक फ्रेश सुगंधही मिळतो.
सैंधव मीठ आणि शाम्पू - जर लादीवरील डाग जुने आणि हट्टी असतील तर सैंधव मीठ आणि शाम्पू यांचीही मदत होऊ शकते. ही ट्रिक वापरण्यासाठी बालटीमध्ये पाणी घ्या आणि त्यात एक ते दोन चमचे सैंधव मीठ व थोडं शाम्पू मिक्स करा. या पाण्याने लादी चांगली घासून पुसून काढा. सुकल्यानंतर लादीवर नॅचरल फ्रेशनेस दिसेल आणि लादी चमकेलही.
रोज पोछा लावणं किती महत्त्वाचं?
घरातील फरशी रोज साफ करणं गरजेचं मानलं जातं. नियमित पोछा लावल्याने धूळ आणि घाण साचत नाही, तसेच डागही कमी तयार होतात. एखादा डाग दिसताच लगेच साफ केल्यास तो कायमचा बसत नाही. वेळोवेळी कोमट पाण्याने फरशी पुसल्यास स्वच्छता अधिक चांगली राहते. फरशी किंवा टाइल्स साफ करताना हातात रबरचे ग्लोव्हज वापरणंही फायदेशीर ठरतं. त्यामुळे हात सुरक्षित राहतात आणि जास्त वेळ साफसफाई करणं सोपं होतं.
Web Summary : Stubborn floor stains? White vinegar, baking soda, lemon juice, or salt with shampoo can help. Regular cleaning prevents dirt buildup. Clean floors enhance the home's ambiance.
Web Summary : जिद्दी फर्श के दाग? सफेद सिरका, बेकिंग सोडा, नींबू का रस या नमक और शैम्पू मदद कर सकते हैं। नियमित सफाई से गंदगी जमा नहीं होती। स्वच्छ फर्श घर के माहौल को बढ़ाते हैं।