Mosquitoes In Summer : उन्हाळा सुरू झाला की, गरम तर फार होतं. ज्यामुळे सगळेच वैतागलेले असतात. सोबतच डासांमुळेही अनेक लोक हैराण असतात. जरा काय सूर्य खाली गेला की, डासांची गॅंग घरावर हल्ला करतात. उन्हाळ्यात जास्त डास चावतात. पण प्रश्न हा आहे की, उन्हाळ्यात डास इतके का चावतात? यामागचं कारण काय आहे. तेच आज जाणून घेणार आहोत.
डासांचं प्रजनन वाढतं
उन्हाळ्यात डास जास्त चावण्याचे हे एक मुख्य कारण आहे. उन्हाळा हा डासांचा प्रजननाचा काळ असतो. खासकरून उन्हाळ्याच्या सुरूवातीला डास प्रजनन करतात. अशात मादा डासांना अंडी देण्यासाठी रक्ताची गरज असते आणि याच कारणामुळे उन्हाळ्यात डास जास्त चावतात. यानंतर डासांची संख्याही वाढते. याच कारणाने सांयकाळ झाली तर डासांची संख्या वाढते.
जास्त घामामुळे...
घाम डास जास्त चावण्याचं दुसरं मोठं कारण आहे. उन्हाळ्यात व्यक्तीच्या शरीरातून जास्त घाम निघतो आणि या घामाच्या वासामुळे डास व्यक्तीकडे आकर्षित होतात. तुमच्या अंगावर घाम असेल किंवा तुम्ही घामाचे कपडे घातले असतील तर डास तुमच्याकडे जास्त येतात.
कमी कपड्यांमुळे...
हिवाळ्यात आपणं आपलं शरीर जास्तीत जास्त झाकून ठेवत असतो. घराचे खिडकी-दरवाजे बंद ठेवतो. त्यामुळे हिवाळ्यात डास कमी चावतात. तेच उन्हाळ्यात आपण कमी किंवा पातळ कपडे घालतो. काही लोक तर झोपताना कपडेही घालत नाहीत. खिडक्या-दरवाजे उघडे असतात. अशात डास घरात येतात आणि हल्ला करतात.
वैज्ञानिक काय सांगतात?
न्यू जर्सीच्या प्रिंस्टन यूनिवर्सिटीच्या वैज्ञानिकांनी एडीज एजिप्टि प्रजातीच्या डासांवर एक रिसर्च केला आणि यात त्यांना आढळलं की, या प्रजातीचे अनेक डास मनुष्यांचं रक्त पिण्याऐवजी दुसऱ्या माध्यमातून आपलं पोट भरतात. त्याशिवाय एका दुसऱ्या रिसर्चमधून समजलं की, मनुष्यांचं रक्त नर डास नाही तर मादा डास पितात.
डास पळवण्याचे उपाय
लिंबू आणि लवंग
लिंबाचे दोन तुकडे करून त्यात काही लवंग खोचा. हे लिंबू घराच्या एखाद्या कोपऱ्यात ठेवा. लवंगाच्या गर्द वासामुळे डास दूर पळतात. तसेच तुळशीचं झाड घरात लावल्याने देखील डास दूर पळततात.
लसूण आणि कडूलिंबाची पाने
लसणाच्या कळ्या बारीक करून पाण्यात मिक्स करा. हे पाणी स्प्रे बॉटलमध्ये टाकून घरात स्प्रे करा. लसणाच्या वासाने डास दूर पळतात. तसेच कडूलिंबाची पाने जाळल्यावर होणाऱ्या धुरामुळेही डास घरातून पळून जातात.
पदीन्याचा रस फायदेशीर
तसा तर पदीन्याचा वापर खाण्याच्या पदार्थांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. त्यासोबतच पदीन्याचा वापर वेगवेगळ्या रोगांसाठीही केला जातो. याच पदीन्याचं रोप तुम्ही घरात लावल्यास डासांपासून सुटका मिळवू शकता.