Vitamin D : सोशल मीडियावर हल्ली हेल्थसंबंधी, पोषणासंबंधी सल्ले देणारे बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण हे सगळेच सल्ले किंवा त्यांमधील दावे खरे असतात की खोटे याचा विचार न करता बरेच लोक ते फॉलो करतात. ज्याचे मग त्यांना दुष्परिणामही भोगावे लागतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल झालाय. ज्यात एक महिला अजब दावा करत आहे. महिला सांगत आहे की, एका काचेच्या बाटलीत पाणी भरा, बाटली थोडी रिकामी ठेवा आणि ही बाटली दिवसभर उन्हात ठेवा. महिलेनुसार, हे उन्हात ठेवलेलं पाणी प्यायल्याने शरीराला व्हिटामिन डी मिळतं. पण खरंच असं होतं का? याबाबत डॉ. बृजपाल त्यागी यांनी खुलासा केला आहे.
काय सांगतात डॉक्टर?
डॉ. बृजपाल त्यागी सांगतात की, उन्हात ठेवलेलं पाणी प्यायल्याने व्हिटामिन डी मिळतं, हा दावा पूर्णपणे चुकीचा आहे. याला विज्ञानाचा काहीच आधार नाही. डॉक्टरांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, लोकांना अशाप्रकारच्या भ्रामक गोष्टींवर अजिबात विश्वास ठेवू नये.
शरीरात कसं तयार होतं व्हिटामिन डी?
डॉक्टरांनी समजावून सांगितलं की, शरीरात व्हिटामिन डी तयार होण्याची एक नैसर्गिक आणि वैज्ञानिक प्रक्रिया आहे. उन्हात ठेवलेलं पाणी पिण्याचा याच्याशी काहीही संबंध नाही. ते म्हणाले की, जेव्हा आपल्या शरीराची कमीत कमी अर्धी त्वचा उन्हाच्या संपर्कात येते, तेव्हा सूर्याची अल्ट्रावॉयलेट किरणं आपल्या त्वचेवर पडतात. ही किरणं त्वचेमध्ये असलेल्या 'डीहायड्रोकोले कॅल्सिफेरोल' रसायनासोबत रिअॅक्शन करतात. या रिअॅक्शननंतर शरीरात व्हिटामिन डी ३ तयार होतं.
शरीरात कसं काम करतं हे व्हिटामिन?
त्वचेमध्ये व्हिटामिन डी३ तयार झाल्यावर हे थेट आपल्या लिव्हरमध्ये जातं आणि तिथे जाऊन अॅक्टिवेट होतं. नंतर ते हाडांशी जुळतं, ज्यामुळे हाडं निरोगी आणि मजबूत होतात. याने 'ऑस्टियोपोरोसिस' सारख्या हाडांच्या आजारातही मदत मिळते.
उन्हातून व्हिटामिन डी घेण्याची योग्य पद्धत
डॉक्टरांनुसार, जर आपण शरीर पूर्णपणे कपड्यांनी झाकून उन्हात बसाल तर आपल्याला व्हिटामिन डी मिळणार नाही. कपड्यांमुळे सूर्याची किरणे आपल्या त्वचेपर्यंत व्यवस्थित पोहोचत नाहीत. त्यामुळे सूर्याच्या किरणांचा थेट संपर्क त्वचेसोबत यायला हवा. आपण अनेकदा पाहिलं असेल की, परदेशातील लोक अनेकदा समुद्र किनारी झोपून ऊन घेतात. ते व्हिटामिन डी मिळवण्यासाठी असं करतात.
म्हणजेच काय तर पाण्यातून व्हिटामिन डी मिळण्याचा दावा पूर्णपणे चुकीचा आहे. जर आपल्याला व्हिटामिन डी हवं असेल तर दिवसातून किमान अर्धा तास शरीराची अर्धी त्वचा सूर्यकिरणांच्या संपर्कात आणा किंवा मग गरज पडली तर व्हिटामिन डी सप्लीमेंट घ्या.
