भारतीय महिला क्रिकेट संघातली ऑलराउंडर दीप्ती शर्मा तिच्या दमदार खेळामुळे ओळखली जाते. पण तिच्या व्यक्तिमत्वाबद्दल सगळ्यांनाच कौतुक वाटते. शांत असूनही चपळ आणि पॉवरफुल अशी दीप्ती. (Deepti Sharma: The Prime Minister asked Deepti Sharma what is the reason for the Hanuman tattoo on her hand? her answer went viral )तिच्या हातावरचा टॅट्टू फार चर्चेत आला होता. तिच्या हातावर आहे हनुमानाचा टॅटू, त्या टॅट्टूची दखल पंतप्रधानांनीही घेतली आणि तिला विचारलंही की या टॅटूचं काय महत्त्व?
दीप्तीच्या उजव्या हातावर हनुमानाची प्रतिमा असलेला टॅटू कोरलेला आहे. हा टॅटू तिला सामन्यादरम्यान आत्मविश्वास आणि मानसिक शक्ती देतो, असे ती सांगते. सोशल मीडियावरही ती वारंवार “जय श्रीराम” असा उल्लेख करते, आणि आपल्या श्रद्धेचा अभिमानाने उल्लेख करते. तिच्या मते, हा टॅटू केवळ धार्मिक प्रतीक नसून, तिच्या खेळातील एकाग्रतेचा आणि धैर्याचा आधार आहे.
महिला क्रिकेट संघाने २०२५ चा वर्ल्ड कप जिंकल्यानंतर संपूर्ण संघाने दिल्लीतील पंतप्रधान निवासस्थानी नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. संवादादरम्यान मोदींनी सगळ्यांचे कौतुक केले. तसेच दीप्तीच्या हातावरील हनुमान टॅटू आणि तिच्या “जय श्रीराम” पोस्ट्सबद्दल उल्लेख केला. त्यांनी स्मितहास्य करत विचारले, “तुझ्या हातावर हनुमानजींचा टॅटू पाहिला, तो तुला शक्ती देतो का?” त्यावर दीप्तीने नम्रपणे उत्तर दिलं, “हो सर, हा माझा विश्वास आहे. मला वाटतं, मैदानावर खेळताना ही शक्ती माझ्यासोबत असते.”
क्रिकेटसारख्या स्पर्धात्मक खेळात स्थिर मन आणि धैर्य आवश्यक असतं, आणि हा टॅटू तिच्यासाठी त्या दोन्हींचं प्रतीक ठरला आहे. तिच्या या शब्दांनी मोदी देखील प्रभावित झाले आणि संपूर्ण संघाच्या मानसिक ताकदीचं कौतुक केलं. खेळात जिद्द, श्रद्धा आणि स्थैर्य किती महत्त्वाचे असतात, हे दीप्तीने दाखवून दिले. म्हणूनच तिचा हा हनुमान टॅटू एक साधं चित्र नसून, तिच्या विजयाच्या प्रवासाचा प्रेरणादायी भाग ठरला आहे.
