lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > ऑनलाइन जगात महिलांची फसगत, ट्रॅप ओळखाल कसे? ऑनलाइन जगातल्या वाटेवरही काचाच..

ऑनलाइन जगात महिलांची फसगत, ट्रॅप ओळखाल कसे? ऑनलाइन जगातल्या वाटेवरही काचाच..

ऑनलाइन जगात वावरताना महिलांनी काय काळजी घेतली पाहिजे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2024 06:28 PM2024-03-19T18:28:24+5:302024-03-19T18:37:45+5:30

ऑनलाइन जगात वावरताना महिलांनी काय काळजी घेतली पाहिजे?

cyber security for women? how to be safe online? cyber laws and help for women | ऑनलाइन जगात महिलांची फसगत, ट्रॅप ओळखाल कसे? ऑनलाइन जगातल्या वाटेवरही काचाच..

ऑनलाइन जगात महिलांची फसगत, ट्रॅप ओळखाल कसे? ऑनलाइन जगातल्या वाटेवरही काचाच..

मुक्ता चैतन्य

भारतात १० पैकी ८ महिलांना कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या स्वरूपाच्या ऑनलाइन त्रासाला सामोरं जावं लागतं असं संशोधनं सांगतात. ट्रोलिंग, फसवणूक, सायबर बुलिंग, ब्लॅकमेलिंग किंवा इतर अनेक सायबर गुन्ह्यांचा समावेश असतो. आजही पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचं ऑनलाइन जगात वावरण्याचं प्रमाण कमी आहे. २०२०च्या आकडेवारीनुसार भारतात प्रौढ स्त्रियांच्या एकूण संख्येपैकी फक्त २५ टक्के स्त्रियांकडे स्वतःचे मोबाइल फोन आहेत. दुसरीकडे स्त्रिया आणि मुलं हे सायबरच्या जगतातही ‘सॉफ्ट टार्गेट्स’ आहेत. अशा वेळी ऑनलाइन जगात वावरताना काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे.

बायकांनाच का सांगता सगळं हा मुद्दा कितीही बरोबर असला तरी ऑनलाइन जगात गुन्हेगार अनेकदा पडद्याआडून वार करत असतो. कधी पोलिसांची मदत घ्यायची आहे हेही माहीत नसतं. सावध राहिले तरच महिला अधिक मोकळेपणाने आणि सुरक्षितरीत्या सायबर जगात वावरू शकतील.

 

मुलांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करावेत का?

१) मुलांचे फोटो किंवा व्हिडीओ त्यांना विचारल्याशिवाय कधीही शेअर करू नका. मुलांचे डिजिटल फूटप्रिंट असावेत की असू नयेत हा त्यांचा निर्णय असला पाहिजे. मूल हा निर्णय देण्याच्या वयाचे नसेल तर फोटो शेअर करण्याचा मोह टाळलेला बरा. कारण सायबरच्या जगात एकदा गेलेली गोष्ट परत घेता येत नाही. ना हे फोटो व्हिडीओ त्या स्पेसमधून डिलीट होतात.

२) कुठलाही फोटो, व्हिडीओ आज सहज डाउनलोड करता येऊ शकतो. त्यांचा स्क्रीन शॉट काढून ठेवणं सहज शक्य आहे. या गोष्टी आपल्याला आणि मुलांनाही धोक्यात आणू शकतात.

३) एआयचा वापर ज्या गतीने वाढतो आहे, अशा वेळी आपण सावधानता बाळगणं आवश्यक आहे. सतत डीपी बदलणं, सतत स्वतःचे आणि मुलांचे फोटो शेअर करणं, सतत आपली लोकेशन्स शेअर करणं या सगळ्याच गोष्टी टाळल्या पाहिजेत. ऑनलाइन जगात मोठ्या प्रमाणावर स्टॉर्कर्स आणि पीडोफाईल्स (लहान मुलांविषयी लैंगिक आकर्षण असलेल्या व्यक्ती) असतात. आपले आणि मुलांचे फोटो कुठे, कोण आणि कशासाठी डाउनलोड करून ठेवेल हे सांगता येत नाही.

(Image : google)

पोस्ट करताना काय काळजी घ्याल?१) इन्स्टाग्राम अकाउंट प्रायव्हेट ठेवण्याची सोय आहे. तसेच फेसबुकलाही पोस्ट कुणापर्यंत जाऊ द्यायची म्हणजे कोण बघू शकेल हे ठरवण्याची सोय आहे. ती वापरली पाहिजे. सेटिंगमध्ये तसा बदल करता येतो. फक्त मित्र यादीपुरती पोस्ट मर्यादित ठेवता येते. कॉमेंट्स आणि शेअरिंगचे पर्याय बंद ठेवता येतात.
२) समजा एखाद्या पोस्टवर ‘ट्रोलधाड’ आली आणि लोक असभ्य भाषेत व्यक्त व्हायला लागले तर त्या गलिच्छ लिखाणाचे, बदनामीकारक लिखाणाचे स्क्रीन शॉट्स काढून ठेवा. जर पोलिसांची मदत घ्यायची झाली तर हे स्क्रीन शॉट्स उपयोगी पडू शकतात.
३) ब्लॉक, अनफ्रेंड, टेक अ ब्रेक, अनफॉलो हे सगळे पर्याय आपल्या सुरक्षेसाठी आहेत. एखादी व्यक्ती जर ऑनलाइन जगात आपल्याला त्रास देताना दिसली तर त्या व्यक्तीला लगेच ब्लॉक करा. ब्लॉक झालेली व्यक्ती त्यावरून ऑनलाइन जगात थयथयाट करू शकते तर करू द्या. त्रास देणाऱ्यांना ब्लॉक, अनफ्रेंड, अनफॉलो करताना संकोच बाळगण्याचं कारण नाही.
४) सोशल मीडियावर कधीही फार व्यक्तिगत माहिती आणि तपशील देऊ नका. आपण पोस्ट केलेल्या गोष्टींकडे कुणाकुणाचे लक्ष असू शकते हे आपण सांगू शकत नाही. ते आपल्या हाताबाहेर आहे. त्यामुळे फार व्यक्तिगत माहिती, क्षणाक्षणांचे अपडेट्स, आपण कुठे आहोत, कुठे चाललो आहोत, काय करणार आहोत, आपलं घर, रुटीन, मुलांचे तपशील, त्यांचं रुटीन या गोष्टी जगाला समजण्याची गरज नसते. आपल्या जगण्याचा रिॲलिटी शो जगाला दाखवून अनेकदा आपण स्वतःला धोक्यात आणू शकतो हे लक्षात ठेवा.





ऑनलाइन शॉपिंग करताना फसवणूक होते कारण..

१) ज्या शॉपिंग प्लॅटफॉर्मवरून शाॅपिंग करायची आहे ती साईट खात्रीलायक आहे का? हे तपासा.
२) कुठल्यातरी लिंकवरून आलेल्या साईटवरून शॉपिंग करू नका. काही वेळा साईटही खाेट्या असू शकतात. अशा वेळी तुमच्या बँक डिटेल्सचा, क्रेडिट कार्ड डिटेल्सचा गैरवापर होऊ शकतो.
३) फेक वेबसाइटमध्ये मूळ किंवा खऱ्या वेबसाइटच्या नावात, लोगोच्या डिझाइनमध्ये किंचित बदल केलेला असतो. त्यामुळे वेबसाइट उघडताना, उघडल्यावर आपण ओरिजिनल वेबसाइटवरच आहोत ना हे तपासा.
४) वेबसाइटवरचे कीप मी लॉग्ड इन किंवा रिमेम्बर मी सारखे पर्याय कधीही निवडू नका.


५) डिस्काउंट कुपन्स, पे बॅक ऑफर्स, फेस्टिव्हल कुपन्स यांच्या मोहात अडकू नका. अमुकतमुक कुपन मिळवण्यासाठी सोबत दिलेल्या लिंकवर क्लिक करा, असा मेसेज असेल तर तो फेक आहे हे लक्षात ठेवा.
६) गुगलवरून कस्टमर केअर नंबर कधीही घेऊ नका. गुन्हेगार मूळ नंबर बदलून त्यांचा नंबर टाकून तुम्हाला फसवू शकतो. त्यामुळे कंपनीच्या ऑफिशिअल वेबसाइटवर जो कस्टमर केअर नंबर दिलेला असतो त्यावरच कॉल करा.
७) OTP कधीही कुणाशीही शेअर करू नका. जर समोरची व्यक्ती क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा OTP मागत असेल तर तातडीने तो नंबर ब्लॉक करा.
८) क्रेडिट कार्डाच्या माध्यमातून ऑनलाइन शाॅपिंग करायचं असेल तर ते घरच्या संगणकावरूनच किंवा स्वतःच्या मोबाइलवरूनच केलं पाहिजे. फुकट वायफाय वापरून करू नये.

९) ऑनलाइन शाॅपिंग करत असताना समजा त्या साईटने तुम्हाला अनावश्यक माहिती विचारली, म्हणजे तुमचा खाते क्रमांक, त्याचा ऑनलाइन पासवर्ड किंवा एटीएम कार्ड नंबर तर ताे अजिबात देऊ नका.


फसवणूक झाली तर..

१) समजा, तुमची ऑनलाइन शॉपिंग करताना फसवणूक झालीच तर लगेच जवळच्या पोलिसांत तक्रार करा.
२) तुम्ही ऑनलाइन तक्रारही नोंदवू शकता. https://cybercrime.gov.in/ या सरकारी साईटवर फसवणुकीची तक्रार नोंदवता येते.
३) तुम्ही १९३० वर संपर्क करूनही सायबर गुन्ह्याची तक्रार नोंदवू शकता.

(लेखिका मुक्त पत्रकार आणि समाजमाध्यमांच्या अभ्यासक, आहेत.)
muktaachaitanya@gmail.com
सायबर मैत्र संस्थेच्या संचालक आहेत.
https://www.youtube.com/@screentimewithmukta2025

 

Web Title: cyber security for women? how to be safe online? cyber laws and help for women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.