हुनान प्रांतातील एक हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. लेक आजारी पडल्यानंतर एका आईचं संपूर्ण आयुष्यच बदललं. ५९ वर्षीय शियाओ शुएफेईची मुलगी यांग फांग ग्वांगझूमध्ये काम करत असताना गंभीर आजारी पडली आणि कोमात गेली. डॉक्टरांनी यांगच्या शुद्धीवर येण्याची शक्यता कमी असल्याचं सांगितलं. आईला उपचार थांबवण्याचा सल्लाही दिला, परंतु शियाओने हार मानण्यास नकार दिला.
शियाओने तिच्या मुलीला रुग्णालयाच्या जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केलं आणि स्वतः तिची काळजी घेऊ लागली. तिच्या मुलीला बरं करण्याचा निर्धार करून, तिने डान्स थेरपी नावाची एक अनोखी पद्धत स्वीकारली. डॉक्टरांनी स्पष्ट केलं की, म्युझिक आणि मूव्हमेंटने मेंदूच्या नसा सक्रिय होतात. परिणामी शियाओ तिच्या मुलीला दररोज पार्कमध्ये घेऊन जात असे आणि तिचा हात धरून स्क्वेअर डान्सच्या रिदमवर नाचायची.
"तू खूप चांगली आई आहेस"
हळूहळू पार्कमधील इतर महिलाही या डान्समध्ये सहभागी झाल्या आणि सर्वांनी एकत्र येऊन यांगला सोप्या हालचाली शिकवण्यास सुरुवात केली. दोन वर्षांच्या सततच्या प्रयत्नांनंतर एके दिवशी यांग पहिल्यांदाच बोलली, "तू खूप चांगली आई आहेस." हे ऐकून शियाओचे डोळे पाणावले. जेव्हा तिच्या मुलीला रुग्णालयात नेण्यात आलं तेव्हा डॉक्टरांनी तिच्या मेंदूच्या हालचालीत लक्षणीय सुधारणा झाल्याचं सांगितलं. त्यांनी याला चमत्कार म्हटलं.
१० वर्षे दररोज डान्स थेरपी सुरू
शियाओने हार मानली नाही आणि १० वर्षे दररोज डान्स थेरपी सुरू ठेवली. याचच अखेर फळ मिळालं. आता, यांग थोडं फार चालू शकते, बोलू शकते आणि स्वतःची काळजी घेऊ शकते. जरी तिची विचार करण्याची क्षमता मर्यादित असली तरी, तिचे हास्य तिच्या आईसाठी खूप मोलाचं आहे. मुलीचं हास्य पाहून आईचा सर्व थकवा निघून जातो.
