वडिलांचं आपल्या मुलीवर खूप जास्त प्रेम असतं. ते तिची खूप काळजी घेतात, लेकीची प्रत्येक इच्छा पूर्ण करतात. अशीच एक हृदयस्पर्शी घटना आता समोर आली आहे. चीनमधील एका वडिलांनी आपल्या मुलीला घरच्या जेवणाची चव मिळावी म्हणून तब्बल ९०० किलोमीटरचा प्रवास केला आणि तिच्या युनिव्हर्सिटीबाहेर 'घरच्या जेवणा'चा छोटा फूड स्टॉल लावला. या गोष्टीने सर्वांचच लक्ष वेधून घेतलं असून सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
चीनमधील टियानजिन येथे राहणाऱ्या वडिलांनी आपली मुलगी ली बिंगडीसाठी मोठा निर्णय घेतला. ली बिंगडी जिलीन प्रांतातील सिपिंग येथील जिलीन नॉर्मल युनिव्हर्सिटीत शिक्षण घेत होती. त्यामुळ ती तिच्या वडिलांपासून दूर राहत होती. ली बिंगडी अनेक महिन्यांपासून युनिव्हर्सिटीच्या कॅन्टीनमधील जेवणाबद्दल तक्रार करत होती. स्वच्छता नसते, जेवण चांगलं नसतं, घरच्या जेवणाला मिस करतेय असं ती वारंवार वडिलांना सांगत होती.
रेस्टॉरंटमधील चांगली नोकरी सोडली
मुलीची ही तक्रार ऐकून वडील खूप दु:खी झाले. वडिलांच्या मनाला लागलं. त्यांनी कोणताही विचार न करता थेट टियानजिनमधील आपली बारबेक्यू रेस्टॉरंटमधील चांगली नोकरी सोडली. मुलीच्या जवळ राहता यावं आणि तिला हवं असलेलं घरचं जेवण देता यावं म्हणून त्यांनी तब्बल ९०० किमीचा प्रवास करत सिपिंग शहरात धाव घेतली. सिपिंगमध्ये आल्यावर त्यांनी फ्राईड राईस आणि नूडल्स बनवण्याचं कौशल्य शिकून घेतलं आणि युनिव्हर्सिटीच्या गेटबाहेर एक स्टॉल भाड्याने घेतला.
वडिलांना झालेला त्रास पाहून लेकीला वाटलं वाईट
ऑक्टोबर महिन्याच्या मध्यावर त्यांच्या स्टॉलची सुरुवात झाली, पण पहिला दिवस अतिशय निराशाजनक होता. पहिल्या दिवशी त्यांना फक्त सात प्लेट्स विकता आल्या. आपल्या वडिलांना झालेला त्रास पाहून ली बिंगडीला खूप वाईट वाटलं. वडिलांनी केलेला उत्कृष्ट स्वयंपाक, स्वच्छता, करण्याची पद्धती आणि त्यांच्या संघर्षाबद्दल तिने एक भावनिक पोस्ट युनिव्हर्सिटीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केली.
आईच्या निधनानंतर वडिलांनी दिली साथ
या पोस्टचा परिणाम दुसऱ्याच दिवशी दिसून आला. वडिलांच्या त्या स्टॉलवर विद्यार्थी, शिक्षक आणि स्थानिक रहिवासी यांची मोठी गर्दी झाली. "वडिलांच्या व्यवसायाला आधार देण्यासाठी काही लोकांनी गरजेपेक्षा जास्त ऑर्डर दिली," असं ली बिंगडीने म्हटलं आहे. ती देखील वडिलांना स्टॉलवर मदत करते. आईच्या निधनानंतर तिच्या वडिलांनी तिला खूप साथ दिली.
