Tea Cup Cleaning : भारतामध्ये बहुतेक घरांमध्ये दिवसातून अनेक वेळा चहा केला जातो. सकाळी उठल्यावर, नाश्त्याच्या वेळी आणि संध्याकाळीही चहा प्यायला जातो. काही लोक तर दिवसातून कित्येक कप चहा पितात. अशात आपणही पाहिलं असेल की, चहासाठी सतत वापरल्या जाणाऱ्या कपांवर पिवळे किंवा काळे डाग पडलेले असतात. खासकरून पांढऱ्या कपांवर ते अधिक स्पष्ट दिसतात. केवळ साबण किंवा लिक्विडने धुवून हे डाग जात नाहीत. अशा वेळी आठवड्यातून एकदा आम्ही सांगतो ते उपाय करून बघा. कप पुन्हा नव्यासारखे चमकदार होतील.
कपांवरील डाग कसे घालवायचे?
मीठ आणि लिंबाचा रस
जर कपावर हलके डाग असतील तर मीठ आणि लिंबाचा रस एकत्र करून त्या भागावर चोळा. मीठाने घासल्याने कपावरचे पिवळे डाग सहज निघतात. काही मिनिटांनंतर स्वच्छ पाण्याने धुवा. कप लगेचच स्वच्छ आणि चमकदार दिसेल.
बेकिंग सोडा
थोडं पाणी घेऊन त्यात बेकिंग सोडा मिसळा आणि पेस्ट तयार करा. ही पेस्ट कपावर लावून 5 मिनिटं तसंच ठेवा. नंतर स्क्रबरने चोळून कोमट पाण्याने धुवा. कपावरचे पिवळे डाग आणि डलपणा एकदम नाहीसा होईल.
डिशवॉश लिक्विड आणि बेकिंग सोडा
नॉर्मल क्लिनिंगसाठी तुम्ही डिशवॉश लिक्विड आणि बेकिंग सोडा एकत्र करून वापरू शकता. या मिश्रणाने कप धुतल्यास कपावर एकही डाग राहत नाही आणि त्याला नवीन चमक मिळते.
टूथपेस्ट
जुना किंवा संपत आलेला टूथपेस्ट चहाचे कप स्वच्छ करण्यासाठी उत्तम आहे. टूथपेस्टमध्ये डाग काढणारे नॅचरल तत्व असतात. त्यामुळे चहाचे कप झटपट स्वच्छ होतात आणि पुन्हा चमकू लागतात.
