Join us

५३ व्या वर्षी कॉलेजात जाणाऱ्या राजस्थानच्या भंवरी शेखावत; बारावीत केलं टॉप! -शिक्षणाचा वयाशी काय संबंध?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2022 17:55 IST

जिद्द असली मनात तर काय अशक्य आहे याचं हे उदाहरण. शिक्षण सुटलं म्हणून नुसतं हळहळत न बसता त्यांनी दिली परीक्षा..

ठळक मुद्देमनात जिद्द असेल तर काय वाट्टेल ते करता येतं, कुणीही अडवू शकत नाही

इच्छा दांडगी असेल आणि स्वत:वर भरवसा असेल तर काय नाही करता येत? ज्यांच्यात धमक असते ते परिस्थिती कशीही असो त्याला पुरुन उरतात आणि स्वत:ला हवं ते करतातच, ज्यांना काहीच करायचं नाही ते परिस्थितीच्या नावानं कारणं सांगत फक्त रडत असतात. अशीच भारी धमक असलेल्या राजस्थानातल्या भंवरी शेखावत. वय ५३ वर्षे. त्यांनी राजस्थान बोर्डाची बारावी परीक्षा २०१९मध्ये नुसती उत्तीर्णच नाही केली तर त्यावर्षी सर्व विद्यार्थ्यांपेक्षा राजस्थानात जास्त मार्कही मिळवले. बारावी उत्तीर्ण झाल्या तेव्हा त्या २१ वर्षांच्या होत्या आणि आता त्या आपलं ग्रॅज्युएशन सिकर येथील पं. दिनदयाल उपाध्याय विद्यापीठात पूर्ण करत आहेत. त्यांना राज्यातील मानाचा मीरा पुरस्कारही देण्यात आलेला आहे.न्यूज १८ या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार १९८६ साली भंवरी शेखावत यांनी महाराष्ट्रात दहावीची परीक्षा दिली होती. पण त्यानंतर त्यांचं लग्न झालं आणि त्या राजस्थानात निघून गेल्या. शिक्षण पूर्ण करण्याची त्यांची इच्छा होतीच. ती त्यांनी ३३ वर्षांनंतर पूर्ण करायची ठरवली. आणि बारावीच्या परीक्षेचा फॉर्म भरला. परीक्षा दिली आणि नुसती परीक्षा उत्तीर्णच केली नाहीतर राज्यात सर्वात जास्त मार्कही मिळवून दा‌खवले. आपल्या पत्नीचा हा पराक्रम पाहून त्यांचे पतीही चकीत झाले. परीक्षेचा फॉर्म मुक्त विद्यापीठातून भरला तेव्हा आपण उत्तीर्ण होऊ याची घरच्यांनाही खात्री वाटत नव्हती असं त्या सांगतात. आता त्या पदवीच्या दुसऱ्या वर्षाला शिकत आहेत.भंवरी देवी सांगतात, ‘मला लोकांनी विचारलेही की आता वयाची पन्नाशी उलटल्यावर शिकून तू काय करणार? काय या शिक्षणाचा उपयोग? या वयात कुणी असं कॉलेजात शिकतं का? मात्र असे प्रश्न विचारणाऱ्यांना उत्तर द्यायचं या जिद्दीनं मी अभ्यास केला आणि उत्तीर्ण झाले. माझं शिक्षण पुढे सुरु झालं.’मनात जिद्द असेल तर काय वाट्टेल ते करता येतं, कुणीही अडवू शकत नाही याचं हे उदाहरण आहे.अर्थता पर्याय प्रत्येकासमोर असायचे लढायचे की रडत बसायचे? भंवरीबाईंसारख्या महिला लढतात, आणि म्हणूनच  जिंकतात.

टॅग्स :शिक्षणप्रेरणादायक गोष्टी