आजच्या काळात नोकरी बदलणं ही सामान्य गोष्ट झाली आहे, पण नोकरी लागल्यावर अवघ्या ९ दिवसांत जर कोणी राजीनामा दिला तर नक्कीच आश्चर्याचा धक्का बसतो. अशीच एक घटना आता समोर आली आहे. एका तरुणाने ९ दिवसांत १४ लाखांची नोकरी सोडली. त्याची पोस्ट आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून त्यावरून चर्चा रंगली आहे.
तरुणाने सांगितलं की, ४ महिने बेरोजगार राहिल्यानंतर आणि अनेक कंपन्यांकडून रिजेक्शन मिळाल्यानंतर, त्याला अखेर एका छोट्या स्टार्टअपमध्ये DevOps ची नोकरी मिळाली. जवळपास ८० लोक असलेल्या कंपनीत नोकरी मिळाल्याने त्याला मोठा दिलासा मिळाला होता, परंतु त्यानंतर काहीच दिवसांत यूके बेस्ट मल्टीनॅशनल बँकेकडून ऑफर आली आणि त्याने आपला विचार बदलला.
वर्क लाईफ बॅलेन्स साधता येईल
स्टार्टअप जॉबमध्ये त्याला १४ लाखांचं पॅकेज मिळालं होतं. याच दरम्यान, बँकेच्या ऑफरमध्ये त्याला १५ लाखांचं पॅकेज आहे. तसेतच हायब्रिड वर्क मॉडेल आणि बंगळुरूमध्ये काम करण्याची संधी देण्यात आली. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामुळे वर्क लाईफ बॅलेन्स साधता येईल.Nvidia, Amazon, Zeta आणि Nutanix सारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या मित्रांनी आणि मेंटर्सनी त्याला MNC ची ऑफर स्वीकारण्याचा सल्ला दिला.
"मला मानसिक शांतता हवी"
"मलाच अजब वाटतं की, मी फक्त नऊ दिवसांत नोटीस टाकली, पण बेरोजगारीदरम्यान मी केलेल्या संघर्षांचा विचार करता, मला ही संधी गमावायची नाही. खरं सांगायचं तर मी आता थकलो आहे. मी कमीत कमी ३० इंटरव्ह्यू दिले आहेत. आता मला मानसिक शांतता हवी आहे आणि ही नोकरी मला तेच देऊ शकते" असं तरुणाने पोस्टमध्ये म्हटलं आहे. किमान दीड ते दोन वर्षे तो इथे काम करेल असंही सांगितलं.
इंटरनेटवर वादविवाद सुरू
तरुणाच्या एका निर्णयामुळे इंटरनेटवर वादविवाद सुरू झाले आहेत. लोक विविध प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने "MNC नेहमीच स्टार्टअपपेक्षा अधिक स्थिर असतात. ब्रँड नेम करिअरसाठी चांगलं असतं" असं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने "माझ्या शेवटच्या तीन स्टार्टअप्समध्ये खूप खराब कल्चर होतं. मला आठवड्याच्या शेवटी काम करायला लावायचे आणि अखेर कंपनी बंद पडली. MNCs दीर्घकालीन सुरक्षा देतात" असं म्हटलं आहे.