ऑफिसमध्ये अनेकदा कामाच्या ताणामुळे कर्मचारी हैराण होतात. त्यांच्या आयुष्यावरही याचा मोठा परिणाम होतो. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बंगळुरूमधील एका महिला आयटी कर्मचाऱ्याच्या आईचा अपघात झाला आणि तिने वर्क फ्रॉम होमसाठी अर्ज केला, परंतु कंपनीने तो नाकारला. तरुणीने पुरावा म्हणून मेडिकल रिपोर्टही दिला, परंतु कंपनीने तिच्याकडे दुर्लक्ष केलं. तरुणीची गोष्ट आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाली आहे.
बंगळुरूमधील एका आयटी फर्ममध्ये काम करणाऱ्या तरुणीची आई अपघातात जखमी झाली होती. ज्यानंतर तिने घरातून काम करण्याची परवानगी मागितली होती. रेडिटवर पोस्ट करताना एका युजरने लिहिलं की, "माझ्या पत्नीची छोटी बहीण बंगळुरूमध्ये राहते आणि आयटी क्षेत्रात काम करते. तिने तिच्या कंपनीला विचारलं की ती एक महिना घरून काम करू शकते का? कारण तिचा आईचा अपघात झाला आहे."
"अपघातात जखमी झाल्याने सध्या आई हालचाल करू शकत नाही किंवा काहीही करू शकत नाहीत. कंपनीने याचे पुरावे मागितले. तेव्हा तिने एमआरआय स्कॅन आणि रिपोर्ट पाठवला. तिने सुटी नको फक्त घरातून काम करण्याची परवानगी मागितली होती, परंतु तरीही तिला नकार देण्यात आला आहे. मी नेहमीच ऐकलं आहे की मोठ्या कंपन्यांमध्ये सहानुभूतीचा अभाव असतो, पण आता ते अनुभवत आहे "
ही पोस्ट व्हायरल झाल्यावर रेडिट युजर्सना खूप राग आला, ज्यांनी कॉर्पोरेट कल्चरमधील असंवेदनशीलतेचा निषेध केला. एका युजरने त्याचा अनुभव शेअर केला आहे. "माझ्या भावाचा एकदा विचित्र अपघात झाला ज्यामध्ये त्याने त्याच्या बोटाचा काही भाग गमावला. त्याची सर्जरी करायची होती, परंतु कंपनीने त्याला काढून टाकलं" असं सांगितलं. सध्या या घटनेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.