बिअर हे जगभरात अत्यंत लोकप्रिय असलेलं मद्य. सगळेजण हे मद्य आवडीनं रिचवतात. या संदर्भातील आकडेवारीही हादरवणारी आहे. जगात दरवर्षी किती बिअर प्याली जात असेल? २०२३च्या आकडेवारीनुसार त्या वर्षी संपूर्ण जगात एकूण १८७.९ दशलक्ष किलोलिटर बिअर लोकांनी आपल्या पोटात ढकलली. ज्या देशात सर्वाधिक बिअर प्याली आणि विकली जाते त्या देशांत चीन आघाडीवर आहे. याबाबत गेल्या सलग २५ वर्षांत त्यांनी एकदाही आपला पहिला नंबर सोडला नाही!
अर्थात चीनमध्ये बिअर पिणारे लोक सर्वाधिक असले तरी दरडोई सर्वाधिक बिअर पिण्याचा विक्रम मात्र झेक प्रजासत्ताकाच्या नावावर आहे. तेथील लोक सरासरी अधिक बिअर पितात. चीन, अमेरिका आणि ब्राझील हे तीन देश मिळून एकूण बिअरच्या तब्बल ४० टक्के बिअर फस्त करतात! आशियामधील लोकांना बिअरची सर्वाधिक चटक आहे. एकट्या आशियातील लोक बिअरच्या एकूण जागतिक उत्पादनापैकी ३२ टक्के बिअर संपवतात!
या बिअर पुराणावरून लक्षात आलं असेल, जगभरातील लोकांना बिअर किती प्रिय आहे ते. त्यामुळे अनेक जण बिअरचा एक थेंबही वाया जाऊ देत नाहीत. मात्र त्याचीच दुसरी बाजू म्हणजे सध्या जगभरात अनेक देशांमध्ये आता चक्क बिअरनं अंघोळ केली जाते! ही अंघोळही कशी? - तर आपण बाथटबमध्ये जसं पाण्यात बसतो, डुंबतो, तसं बिअर पित या बिअरच्या टबमध्ये बसायचं, अक्षरश: डुंबायचं! याला म्हणायचं ‘बिअर स्पा’ किंवा ‘बिअर बाथ’! जगभरात हा ट्रेंड आता वाढतो आहे आणि या बिअरमध्ये मनसोक्त डुंबण्याचा आनंद लोक घेताहेत. त्यात पुरुषांच्या तुलनेत महिलाचं प्रमाण जास्त आहे.
बिअर स्पाच्या संदर्भात सर्वाधिक प्रसिद्ध आहे तो झेक प्रजासत्ताक. तिथे गेल्या कित्येक वर्षांपासून हा प्रकार प्रचलित आहे; पण आता इतर देशांतही या बिअर स्पाचं वेड झपाट्यानं पसरतं आहे. त्यात आइसलँड, स्पेन, अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, बेल्जियम तसंच संपूर्ण युरोप आघाडीवर आहे.
‘बिअर बाथ’चा हा ट्रेंड जगभरात का फोफावतो आहे? - मद्य म्हणून तर बिअर जगभरात लोकांना प्रिय आहेच, पण याच बिअरकडे आता ‘निरोगी जीवनशैली,’ ‘वेलनेस’च्या दृष्टीनंही पाहिलं जात आहे. बिअर बाथ घेतल्यास तुमचे अनेक आजार दूर होतात, तुम्हाला शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य लाभतं, त्वचा मुलायम होते, तुम्ही ‘तरुण’ दिसता आणि तुमचं तारुण्य आणखी उजळून निघतं, असं मानलं जातं.
बिअर बाथ घेताना बिअरमध्ये त्यासाेबत इतरही अनेक आयुर्वेदिक घटक मिसळले जातात. हे स्नान करीत असताना जे बुडबुडे, जी संयुगं निघतात, ती त्वचा अधिक तजेलदार आणि तरुण करते, केस चमकदार होतात, मनावरील आणि स्नायूंवरील तणाव निवळतो, रक्ताभिसरण सुधारतं, मूड चेंज होतो, तुमच्यातलं नैराश्य, उदासीनता झटकली जाऊन शरीरात आनंद, उत्साह संचारतो... असे बिअर बाथचे अनेक फायदे आहेत, शांत झोपेसाठीही बिअर बाथ अत्यंत उपयोगी आहे, असं तज्ज्ञांचं आणि स्पा सेंटरच्या संचालकांचं म्हणणं आहे. बिअर बाथचा ट्रेंड आता नव्यानं सुरू झाला असला तरी या प्रकाराला सुमारे एक हजार वर्षांचा इतिहास आहे. युरोपीय संस्कृतीत ही पारंपरिक उपचार पद्धती आहे असे म्हणतात.