फराह खान आणि तिचा मदतनीस दिलीप यांचा स्वयंपाकाचं यूट्यूब चॅनल चर्चेत तर आहे. हसतखेळत स्वयंपाक गप्पा गंमत असं त्याचं अनौपचारिक स्वरुप. (Amitabh Bachchan wrote a letter to Farah Khan, she was shocked, see what was the reason )मध्यंतरी अगदी अभिषेक बच्चनसोबतही त्यांनी एक एपिसोड केला. पण मग असं अचानक काय झालं की भल्या पहाटे ३ वाजता खुद्द अमिताभ बच्चन यांनी फराह खानला पत्र लिहिलं आणि तडक पाठवून दिलं तिच्या घरी? ते पत्र पाहून फराह खानला धक्क बसला नसता तरच नवल..
झालंही तसंच. फराह खानला पत्र पाहून धक्का बसला आणि कशामुळे असं पत्र आलं हे तिनं सोशल मीडियात पोस्ट करुन लिहिलंही. तर त्याचं झालं असं की,राधिका मदनच्या घरी अलिकडेच त्यांनी एक व्हिडिओ शूट केला. त्या घरात फराहला अमिताभ बच्चन यांचं एक पत्र दिसलं. छान मढवून ठेवलेलं आहे. राधिकाला त्यांनी काम आवडल्याने पत्र लिहिलं होतं. फराहने जाहीर त्यांना विनंती केली की तुम्ही कधीतरी मला पत्र लिहाल का? आणि काय आश्चर्य, अमिताभ बच्चन यांनी वेळात वेळ काढून पहाटे सव्वातीनला ते पत्र लिहिलं. खुद्द महानायकाच्या हस्ताक्षरातलं ते पत्र पाहून आणि आपल्या इच्छेचा त्यांनी मान राखलेला पाहून अर्थातच फराहला विलक्षण आनंद झाला.
आणि त्या आनंदापेक्षाही दिसलं मोठं मन. आपल्याकडे कुणीतरी काहीतरी मागतं आहे तर सचिवाला सांगून चार ओळी टाइप करुन रवाना केल्या असं न करता अमिताभ बच्चन यांनी स्वहस्ते सुंदर अक्षरात पत्र लिहून ते फराहला पाठवलं.
गोष्टी लहानशाच असतात पण त्यातून माणसांची कळकळ, मोठेपणाच नाही तर निगुतीने काम करण्याची शिस्त दिसते. त्या शिस्तीचा हा सुंदर आणि प्रेमळ वस्तूपाठ आहे. केवळ फराहलाच नाही तर ज्यांचं काम आवडेल अशा गुणवान माणसांना अमिताभ बच्चन स्वत: पत्र पाठवतात. त्यांचं कौतुक करतात. अर्थातच त्या पत्रात अमिताभ यांनी फराह खानच्या कामाचं कौतुक केलं आहे. फराहने आपल्या फिल्मफेअर पुरस्कारांसोबत ते पत्र ठेवलं, याहून मोठी शाबासकी ती काय असते.