आजारी पडल्यावर सर्वजण औषधं घेतात. ही औषधं आपल्याला बरं होण्यास मदत करतात, ती संपल्यानंतर आपण सर्वजण त्यांचं रिकामं रॅपर कचऱ्यात फेकतो. कारण त्याचा काहीच वापर नसतो असा आपण विचार करतो. मात्र औषधांसोबतच त्याचं रिकामं रॅपर देखील खूप उपयुक्त ठरू शकतं हे समजल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल.
स्वयंपाकघरातील अनेक कामांमध्ये रॅपरची मदत होऊ शकते. औषधाच्या या रिकाम्या रॅपरचा गृहिणी अगदी क्रिएटिव्ह वापर करतात. यामुळे तुमचे पैसे आणि वेळ दोन्ही वाचू शकतात. तुम्हाला फक्त हे रॅपर योग्यरित्या कसं वापरायचे हे माहित असणं आवश्यक आहे.
हँड ग्राइंडरची धार धारदार करा
या रिकाम्या औषधांच्या रॅपरचा वापर करून तुम्ही हँड ग्राइंडरचं ब्लेड आणखी धारदार करू शकता. यासाठी तुम्हाला काही औषधांचे रिकामे रॅपर घ्यावे लागतील. कात्रीच्या मदतीने त्यांचे छोटे तुकडे करा आणि त्यामध्ये टाका. यानंतर थोडं पाणी घाला. आता हँड ग्राइंडर चालू करा. तुम्हाला दिसेल की ग्राइंडरची धार बरीच तीक्ष्ण झाली असेल.
काळी झालेली भांडी स्वच्छ करा
स्वयंपाक करताना जर कोणतंही भांडं जास्त काळं झालं असेल तर ते स्वच्छ करण्यासाठी रॅपरचा वापर करू शकता. यासाठी तुम्हाला त्या भांड्यावर बेकिंग सोडा टाकावा लागेल आणि नंतर रॅपरने घासावं लागेल. थोड्या वेळानंतर भांड्यावरचा काळेपणा निघून जाईल.
चाकू आणि कात्री धारदार करा
औषधांच्या रिकाम्या रॅपरचा वापर करून तुम्ही कात्री आणि चाकू धारदार करू शकता. यासाठी तुम्हाला रॅपर फोल्ड करावं लागेल. चाकू आणि कात्रीवर थोडं मीठ लावा आणि रॅपरने घासून घ्या. चाकू आणि कात्री धारदार होईल.
कपाटांच्या आणि भांड्यांच्या कडांवरील घाण स्वच्छ करा
कपाटांच्या आणि भांड्यांच्या कडांवर घाण साचते. ही घाण नॉर्मल साफसफाई करून काढता येत नाही. अशा परिस्थितीत तुम्ही ती काढण्यासाठी औषधाच्या रॅपरची मदत घेऊ शकता. त्याच्या पातळ आणि तीक्ष्ण कडा सर्व घाण काढून टाकतील.