How to get rid of cockroaches in kitchen: किचन कुणाच्याही घरातील सगळ्यात महत्वाची जागा असते. कारण किचनमध्ये आपल्यासाठी आरोग्यादायी जेवण तयार होतं, भांडी स्वच्छ केली जातात, खाण्या-पिण्याच्या सगळ्या वस्तू ठेवल्या जातात. म्हणजे एकंदर काय तर किचनचा आपल्या आरोग्यासोबत थेट संबंध असतो. जर किचनचं आरोग्य बिघडलं तर आपलंही आरोग्य बिघडतं यात काहीच शंका नाही. किचन एक अशी जागा आहे जिथे सगळ्यात जास्त झुरळं राहतात आणि किचनमध्ये त्यांना खाणं मिळतं आणि लपण्यासाठी पुरेशी जागाही मिळते. अशात ही झुरळं बाहेर काढणं आपल्या आरोग्यासाठी खूप गरजेचं ठरतं. झुरळं बाहेर काढण्यासाठी वेगवेगळे उपायही तुम्ही करत असाल, पण फायदा मिळतोच असं नाही. जर तुम्हीही वेगवेगळे उपाय करून थकले असाल तर आम्ही तुम्हाला झुरळं पळवून लावण्याचे काही उपाय सांगणार आहोत.
प्रसिद्ध शेफ पंकज भदौरिया नेहमीच सोशल मीडिया हॅंडलवर किचनसंबंध टिप्स आणि ट्रिक्स शेअर करत असतात. अशातच त्यांनी झुरळं पळवून लावण्यासाठी काही खास टिप्स सांगितल्या आहेत. त्यांनी इन्स्टा हॅंडलवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात त्यांनी सांगितलं की, जेवण बनवण्यासोबतच किचनची सफाई आणि हायजीनही खूप गरजेची असते. झुरळांमुळे किचन तर खराब होतंच, आपलं आरोग्यही बिघडतं.
झुरळं पळवण्याचे दोन खास उपाय
बोरिक पावडर
मास्टर शेफनं सांगितलं की, बोरिक पावडरचा वापर झुरळं पळवून लावण्यासाठी खूप फायदेशीर ठरतो. यासाठी एका वाटीमध्ये समान प्रमाणात बोरिक पावडर आणि बारीक केलेली साखर घ्या. हे मिश्रण अशा ठिकाणांवर शिंपडा जिथे जास्त झुरळं येतात. साखरेचा गोडवा झुरळांना आकर्षित करेल आणि बोरिक पावडर त्यांना मारेल.
बेकिंग सोडा
पंकज भदौरिया सांगतात की, जर तुमच्याकडे बोरिक पावडर नसेल तर त्याऐवजी तुम्ही बेकिंग सोड्याचा वापर करू शकता. बेकिंग सोड्यामध्ये बारीक केलेली साखर मिक्स करा. घरातील काना-कोपऱ्यात शिंपडा. हे मिश्रण झुरळांसाठी जिवघेणं ठरतं.
आणखी काय काळजी घ्याल?
जर तुम्हाला वाटत असेल की, झुरळं घरात येऊ नये किंवा आलेले सगळे बाहेर गेले पाहिजे तर किचनमधील गॅप्स आणि नाल्या चांगल्या साफ करा. वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या भेगा सिमेंटच्या मदतीनं भरा आणि नाल्यांवर जाळ्या लावा.
किचन ड्रॉअर आणि कपाटं नियमितपणे स्वच्छ करा. यासाठी तुम्ही लिंबाचा रस किंवा अॅपल व्हिनेगरचा वापर करू शकता. अॅपल व्हिनेगर आणि पाणी समान प्रमाणात मिक्स करा. हे एका कपड्यावर लावा आणि नंतर कपाटं पुसा.