नवं वर्षांचं स्वागत जगभरात मोठ्या उत्साहात करण्यात आलं. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जगभरात वेगवेगळ्या परंपरा पाळल्या जातात. त्यापैकीच एक म्हणजे मध्यरात्री १२ वाजता '१२ द्राक्ष' खाण्याची लोकप्रिय पद्धत. सध्या सोशल मीडियावर याला 'ग्रेप थ्योरी' (Grape Theory) म्हणून प्रचंड प्रसिद्धी मिळत आहे. असं मानलं जातं की, ही परंपरा पाळल्याने नव्या वर्षात सुख-समृद्धी, प्रेम आणि उत्तम नशीब लाभतं. या रंजक परंपरेबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
स्पेनमधून झाली सुरुवात (12 Grape Tradition Origin)
ही परंपरा मूळची स्पेनमधील असून तिथे याला 'उवास दे ला सुर्ते' म्हणजेच 'भाग्याची द्राक्ष' म्हटलं जातं. याची सुरुवात साधारण १८९५ च्या सुमारास झाली असावी असा अंदाज आहे. सुरुवातीला द्राक्ष ही श्रीमंतांची गोष्ट मानली जात असे, पण हळूहळू सामान्य जनतेनेही ही पद्धत स्वीकारली आणि ती नवीन वर्षाची एक मुख्य परंपरा बनली. आज स्पेनसह लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन देशांतही ही परंपरा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.
नेमकी काय आहे पद्धत?
नवीन वर्षाच्या रात्री जेव्हा घड्याळात १२ ठोके पडायला सुरुवात होतात, तेव्हा प्रत्येक ठोक्याला एक याप्रमाणे एकूण १२ द्राक्ष खाल्ली जातात. ही १२ द्राक्ष वर्षाच्या १२ महिन्यांचं प्रतीक मानली जातात. प्रत्येक द्राक्ष खाताना लोक मनातल्या मनात एक इच्छा (Wish) मागतात. जर तुम्ही १२ ठोके संपण्यापूर्वी सर्व द्राक्ष खाल्ली, तर तुमच पूर्ण वर्ष सुखाचं जाईल अशी श्रद्धा आहे.
सोशल मीडिया आणि 'ग्रेप थ्योरी'
सोशल मीडियावर अनेक तरुण असा दावा करत आहेत की, ही परंपरा पाळल्यामुळे त्यांना नवीन वर्षात नवीन जोडीदार किंवा प्रेम मिळालं. यामुळेच याला 'ग्रेप थ्योरी' म्हटले जात आहे. मात्र स्पेनमधील जाणकारांच्या मते, या परंपरेचा मूळ उद्देश केवळ प्रेम मिळवणं नसून संपूर्ण वर्षाचे सौख्य आणि नशीब मिळवणं हा आहे. सोशल मीडियाच्या प्रभावामुळे या परंपरेत आता काही नवीन गोष्टींची भर पडली आहे. उदा. काही लोक टेबलच्या खाली बसून द्राक्ष खातात.
द्राक्षे खाण्याची योग्य वेळ कोणती?
ही परंपरा रात्री ११ वाजून ५९ मिनिटांनी सुरू होते. जेव्हा काउंटडाऊन सुरू होतं, तेव्हा प्रत्येक सेकंदाला किंवा घड्याळाच्या ठोक्याला एक द्राक्ष खायचं असतं. असं मानलं जातं की, जर १२ वाजेपर्यंत तुमची द्राक्षे संपली नाहीत, तर नशीब साथ देत नाही. म्हणूनच लोक घाईघाईने द्राक्ष खाताना दिसतात.
हिरवी की लाल द्राक्ष?
स्पेनमध्ये प्रामुख्याने हिरवी द्राक्षे मुबलक आणि गोड असतात, त्यामुळे ती जास्त वापरली जातात. मात्र, तुम्ही हिरवी किंवा लाल कोणतीही द्राक्षे निवडू शकता. काही जण मानतात की हिरवी द्राक्ष पैसा आणि प्रगतीचं प्रतीक आहेत, तर लाल द्राक्ष प्रेमाचं. सरतेशेवटी, चांगल्या विचारांनी आणि आशेने ही परंपरा पूर्ण करणं महत्त्वाचं आहे.
सावधगिरी बाळगणं आवश्यक
१२ द्राक्ष इतक्या कमी वेळात खाणं सोपं नसतं, विशेषतः लहान मुलांसाठी हे अत्यंत धोकादायक ठरू शकते कारण ते त्यांच्या घशात अडकण्याची भीती असते. त्यामुळे शक्यतो लहान आकाराची द्राक्ष निवडावीत आणि ती नीट चावून खावीत.
