पोळ्या करणे हे सकाळच्या वेळी स्वयंपाकाच्या कामांमधील एक महत्त्वाचे काम असते. पोळ्या हा आपल्या आहारातील महत्त्वाचा पदार्थ असल्याने तो करण्याशिवाय पर्यायच नसतो. पण पोळ्या करण्यासाठी कणीक मळणे, पोळ्या लाटणे, त्या भाजणे अशा बऱ्याच क्रिया कराव्या लागत असल्याने हे काहीसे वेळखाऊ काम असते. म्हणूनच बरेच जण पोळ्या करण्यासाठी मावशी लावतात. पण मावशींच्या पोळ्या घरातील सगळ्यांना आवडणे, त्यांच्या वेळा आणि त्या घेत असलेला पगार यांचे गणित जुळून यावे लागते (1 easy simple Trick to make 5 rotis together).
सकाळच्या वेळी चहा, नाश्ता, मुलांच्या शाळेचे डबे, भाजी, साफसफाईची कामे अशी सगळीच कामे एकावेळी असतात. अशात पोळ्या करण्याच्या कामात जास्त वेळ जाऊ नये आणि हे मोठे काम झटपट व्हावे यासाठी काही जण आदल्या दिवशी कणीक मळून ठेवणे किंवा आणखी काही ना काही ट्रिक वापरतात. आज पोळ्या झटपट होण्यासाठी आपण एक अतिशय सोपी आणि इफेक्टीव्ह अशी ट्रिक पाहणार आहोत. ज्यामुळे तुम्ही एकावेळी ५ पोळ्या लाटू शकाल. पाहूयात ही ट्रिक कोणती आणि त्यामुळे आपले काम कसे सोपे होईल...
एकावेळी ५ पोळ्या लाटण्याची ट्रिक...
१. आपण पोळीसाठी कणकेचे गोळे करतो त्याचप्रमाणे गोलाकार गोळे करुन घ्यायचे.
२. नेहमीपेक्षा या गोळ्यांना थोडे जास्त पीठ लावायचे आणि हे गोळे एकमेकांवर रचायचे.
३. सुरुवातीला हाताने हे गोळे थोडे प्रेस करुन सपाट करायचे आणि मग लाटण्याने हे लाटायचे.
४. लाटताना लाटणे खूप जोरात न फिरवता अंदाज घेत थोडे हळूवार फिरवायचे म्हणजे या पोळ्या एकमेकांना चिकटणार नाहीत.
५. नंतर हळूवारपणे या पोळ्या एकमेकांपासून वेगळ्या करायच्या. वेगळ्या करताना त्या फाटणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी.
६. प्रत्येक गोळ्याच्या मध्यभागी जास्तीचे पीठ लावल्यास आणि हळूवार लाटल्यास या पोळ्या चिकटण्याची शक्यता कमी असते.
७. अगदी ५ एकावेळी अवघड वाटत असतील तर तुम्ही ३ पोळ्या एकत्र करुन पाहू शकता. त्यानंतर पोळ्या नेहमीप्रमाणे तव्यावर भाजायच्या.
८. पण ही ट्रिक वापरुन पोळ्या केल्यास पोळ्यांचे महत्त्वाचे आणि वेळखाऊ काम झटपट होण्याची शक्यता असते.