Marriage Graduation : भारतात लग्न एक पवित्र बंधन मानलं जातं. लग्नानंतर पती-पत्नी आपला गाडा जुळवून चालवतात. पण आजकाल लग्नाबाबत वेगवेगळे ट्रेंड बघायला मिळत आहेत, जे फारच अजब आणि विचार करायला लावणारे आहेत. जपान किंवा चीनसारख्या देशांमधून असे रिलेशनशिप ट्रेंड नेहमीच समोर येत असतात. सध्या जपानमधील लग्नासंबंधी एक असाच ट्रेंड चर्चेचा विषय ठरत आहे. ज्याला मॅरेज ग्रॅजूएशन (Marriage Graduation) नाव देण्यात आलं आहे.
Marriage Graduation हा ट्रेंड पारंपारिक लग्नाच्या नात्याला एका वेगळ्या दृष्टीकोनातून बघण्याचा प्रयत्न मानला जातो. महत्वाची बाब म्हणजे याला घटस्फोटाचा एक पर्याय सुद्धा मानला जातो. पण मुळात हा काही नवा ट्रेंड नाहीये, याची सुरूवात 2000 सालात झाली होती. आज आपण हेच समजून घेणार आहोत की, हा ट्रेंड नेमका काय आहे.
मॅरेज ग्रॅजुएशन काय आहे?
मॅरेज ग्रॅजुएशन किंवा जपानी भाषेत सोत्सुकॉन (Sotsukon) एक असं नातं आहे, ज्यात पती-पत्नी आपल्या सहमतीनं आपलं आयुष्य वेगवेगळं जगण्याचा निर्णय घेतात. यात ना घटस्फोट घ्यावा लागतो, ना कोणतं भांडण असतं. उलट यात एकमेकांचा सन्मान आणि सहमती असते. ज्या लोकांना आपली स्वप्न पूर्ण करायची असतात, स्वातंत्र्य हवं असतं, ते लोक हा ऑप्शन निवडतात.
मॅरेज ग्रॅजुएशन आणि घटस्फोट
मॅरेज ग्रॅजुएशन आणि घटस्फोट दोन्ही अशा गोष्टी आहेत, ज्यात लग्नाचा संसार मोडला जातो. पण तरीही या दोन्ही गोष्टींमध्ये मोठा फरक आहे. घटस्फोट ही पूर्णपणे कायदेशीर प्रक्रिया असते, ज्यात अनेक अडचणी असतात आणि तणावही असतो. घटस्फोटानंतर पती-पत्नीचं नातं पूर्णपणे संपतं. पण मॅरेज ग्रॅजुएशनमध्ये नातं संपत नाही. त्याला एक वेगळं नाव दिलं जातं. जे सहमतीचं दिलं जातं.
या नात्यात कपल पती-पत्नीसारखं राहत नाही. ते रूममेट्स किंवा मित्रांसारखे सोबत राहतात. आपापल्या जबाबदाऱ्या स्वत: पार पाडतात. तर काही कपल्स वेगवेगळ्या घरांमध्ये राहतात. पण तरीही भेटीगाठी घेत असतात. एकमेकांची मदत करतात. मॅरेज ग्रॅजुएशनचा एक मोठा फायदा हा मानला जातो की, यात कोणत्याही वकिलाची गरज पडत नाही. अलिकडे या नात्याचा ट्रेंड बराच वाढलेला दिसतो.