What Is Ghosting : आजकाल रिलेशनमध्ये वेगवेगळे ट्रेंड किंवा टर्म बघायला मिळत आहेत. सोशल मीडियावर नात्यांसंबंधी या नव्या परिभाषेची नेहमीच चर्चा होत असते. आजकालच्या तरूणाईच्या नात्यांमध्ये 'घोस्ट' हा नवा शब्द अॅड झाला आहे. घोस्टिंग ही नात्यांमध्ये होणारी अचानक घटना आहे आणि याचा दोघांपैकी एका व्यक्तीला खूप जास्त त्रास होऊ शकतो. पण हे घोस्टिंग नेमकं काय आहे? याचा प्रभाव काय पडतो आणि याची लक्षणं काय असतात? तसेच या स्थितीला कसं हॅंडल करावं हे आज आपण पाहणार आहोत.
काय आहे घोस्टिंग?
जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला काहीही न सांगता नातं संपवतो त्याला घोस्टिंग असं म्हटलं जातं. सोशल मीडियाच्या या जेन झी जमान्यात हे अधिक बघायला मिळत आहे. डेटिंग करत असताना घोस्टिंगच्या अनेक घटना बघायला मिळत आहेत.
घोस्टिंगचा काय पडतो प्रभाव?
संताप आणि तणाव
ज्या व्यक्तीसोबत आपण काही दिवसांपासून बोलत आहोत, त्याच्या किंवा तिच्यासोबत अचानक बोलणं बंद झालं तर या स्थितीशी डील करणं जरा अवघड होऊन बसतं. त्यामुळे व्यक्तीचा राग वाढतो आणि जेव्हा हा राग बाहेर निघत नाही तेव्हा तणाव वाढतो आणि व्यक्ती हळूहळू डिप्रेशनमध्ये जाऊ लागते.
स्वत:वर संशय
जर दोघांपैकी एकानं घोस्टिंग केलं असेल तर दुसरी व्यक्ती यासाठी स्वत:ला जबाबदार धरू लागते. स्वत:वर संशय घेऊ लागते. ज्यामुळे व्यक्तीला आत्मविश्वास कमी होतो. यामुळे त्यांचं पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफ डिस्टर्ब होऊ लागतं. ते कोणत्याही कामात व्यवस्थित लक्ष घालू शकत नाहीत.
काय असतात घोस्टिंगची लक्षणं?
स्वतःबद्दल गुपित ठेवणे
बर्याच लोकांना डेट करताना स्वतःबद्दलच्या वैयक्तिक गोष्टी सांगायच्या नसतात. यावरून हे लक्षात येते की त्या व्यक्तीला नातं पुढे न्यायची इच्छा नाही. जर तुम्ही तुमच्याबद्दल सगळं सांगत आहात पण समोरील व्यक्ती तसं करत नसेल, तर तो स्वतःला भावनिकदृष्ट्या दूर ठेवू इच्छितो.
वारंवार भेटण्याचं टाळणं
जर एक पार्टनर तुमच्या घरी भेटायला येण्यासाठी आग्रह करत असेल, पण दुसरा नेहमी काही ना काही कारण सांगून टाळत असेल, तर हे अंतर राखण्याचं साइन आहे. तो मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारे दूर राहू इच्छितो.
ऑनलाइन असतानाही उत्तर न देणं
कोणी सतत फोनवर ऑनलाइन असतं, पण तुमच्या मेसेजला उत्तर देत नाही, तर हे ‘रेड फ्लॅग’ म्हणजेच सावधानतेचं संकेत असू शकतं.
सोशल मीडियावरून गायब होणं
जर एखाद्याची नात्यातील रुची कमी होत असेल, तर तो आपली ऑनलाइन उपस्थिती कमी करतो किंवा पूर्णपणे गायब होतो. ज्या डेटिंग अॅप किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुम्ही भेटला होता, तिथून तो गायब झाला असेल तर याचा अर्थ तो ‘मूव्ह ऑन’ करण्याचा प्रयत्न करत आहे.
उत्तर देण्यात उशीर
जर तुमच्या मेसेज किंवा कॉलला तो एक दिवसाहून अधिक वेळ लावतो, तर हा एक इशारा असू शकतो. ज्याला तुम्ही खरोखर आवडता, तो कितीही व्यस्त असला तरी लवकर उत्तर देतो. अशा गोष्टी वारंवार होत असतील, तर तुम्ही सावध होणं आवश्यक आहे.
घोस्टिंग कशी टाळावी?
नात्याच्या सुरूवातीलाच म्हणजे डेटिंग सुरू झाल्यावर लगेच आपल्या अपेक्षांबाबत समोरच्या व्यक्तीला सांगितलं पाहिजे. आपल्या पार्टनरच्या वागण्या-बोलण्यावर लक्ष ठेवा. सुरूवातीलाच मोकळेपणाने बोला आणि जे आहे ते सांगा. काहीही लपवून ठेवू नका.
ही स्थिती कशी सांभाळाल?
मनात कोणतीही भीती ठेवण्याऐवजी आपल्या मित्र-मैत्रिणीला किंवा जवळच्या व्यक्तीला याबाबत सांगा. ते तुमचं बोलणं ऐकून या स्थितीतून आपल्याला बाहेर काढण्यास मदत करू शकतील. स्वत:ला दोष देत बसून चिंता वाढवू नका. जेवण सोडणं, कुणाशी न बोलणं, कुणाला न भेटणं या गोष्टींमधून काही साध्य होणार नाही.
