सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. त्यामुळे कित्येक घरांमध्ये लग्नाची धूम आहे. एकदा लग्न करून आपली मुलगी दुसऱ्या घरी गेली की तिने तिथेच सगळा जन्म काढायचा. काय त्रास होईल तो सोसासचा. पण तिथेच नांदायचं अशी शिकवण देऊन पुर्वी आईबाप मुलीची पाठवणी करायचे. पण आता मात्र हा ट्रेण्ड बराच बदलला आहे. कारण मुलीही सक्षम झाल्या असून स्वत:च्या पायावर उभ्या आहेत. त्यामुळे सासरच्या लोकांचा त्रास त्या विनाकारण सहन करत बसत नाहीत. नवरा त्यांच्या बाजुने असेल तर नवऱ्यासोबत किंवा नवऱ्याशिवाय त्या वेगळा मार्ग निवडतात आणि त्रासातून स्वत:ची सुटका करून घेतात. कारण आता लग्न मोडणं या प्रकाराचा आता खूप बाऊ केला जात नाही. एखाद्या वर्षाचा गॅप गेला तर पुन्हा लगेच दुसरी लग्नं होतात आणि आनंदात संसाराला सुरुवातही होते.
असं दुसऱ्या लग्नाचं प्रमाण सध्या भारतात खूप वाढत आहे. काही मॅट्रिमोनियल साईट्सनी याविषयीचा अभ्यास केला. यातून असं दिसून आलं की भारतात २०११ च्या तुलनेत २०२५ मध्ये दुसऱ्या लग्नाचं प्रमाण जवळपास ४३ टक्क्यांनी वाढलं आहे. दुसऱ्या लग्नाचं प्रमाण वाढण्याची कित्येक कारणं आहेत. कधी कधी जोडीदारच आवडत नाही. कधी कधी त्याचं उत्पन्न किंवा त्याच्या काही सवयी हा देखील खटकण्याचा विषय असतो. कधी कधी पार्टनरमध्ये इंटरेस्टच नसतो, अशी कित्येक कारणं त्यामागे आहेत. थोडक्यात सांगायचं तर आहे तसं जुळवून घ्यायचं आणि त्याच पार्टनरसोबत जन्म काढायचा ही शिकवण आता मागे पडत असून आयुष्यातलं सूख महत्त्वाचं मानलं जात आहे.
त्यामुळे आपल्याला समजून घेणारा आणि ज्याच्याशी आपले विचार जुळतात तोच जोडीदार हवा, अशी लग्नाळू लोकांची अपेक्षा आहे. याशिवाय या सर्व्हेक्षणात असेही दिसून आले आहे की मुलामुलींचे लग्नाचे वय वाढत चालले असून २९ वर्षे हे सरासरी लग्नाचे वय दिसून येत आहे. कारण शिक्षण घेतल्यानंतर लगेच लग्न करण्याचा विचार हल्ली मुलीही करत नाहीत. शिक्षण, करिअर आणि आर्थिक स्थैर्य हे विषय जास्त महत्त्वाचे वाटत असून त्यानंतरच लग्नाचा विचार केला जात आहे. याच्या सकारात्मक बाबीही आहेत आणि नकारात्मक बाबीही आहेत. पण एकंदरीतच लग्न संस्था बदलत चालली आहे, हे यावरून दिसून येतं.
