lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Relationship > समंथाने नाकारली २०० कोटी रुपयांची पोटगी! घटस्फोट घेताना पोटगी नाकारावी का? कसा घ्यायचा हा निर्णय?

समंथाने नाकारली २०० कोटी रुपयांची पोटगी! घटस्फोट घेताना पोटगी नाकारावी का? कसा घ्यायचा हा निर्णय?

समंथा प्रभू आणि नागा चैतन्य यांनी घटस्फोट घेतला, पोटगीवरुन वाद झाले नाहीत, पण सामान्य घटस्फोटात काय होतं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2021 12:32 PM2021-10-05T12:32:46+5:302021-10-05T13:21:33+5:30

समंथा प्रभू आणि नागा चैतन्य यांनी घटस्फोट घेतला, पोटगीवरुन वाद झाले नाहीत, पण सामान्य घटस्फोटात काय होतं?

Samantha refuses alimony of Rs 200 crore! Should alimony be denied in a divorce? How to make this decision? | समंथाने नाकारली २०० कोटी रुपयांची पोटगी! घटस्फोट घेताना पोटगी नाकारावी का? कसा घ्यायचा हा निर्णय?

समंथाने नाकारली २०० कोटी रुपयांची पोटगी! घटस्फोट घेताना पोटगी नाकारावी का? कसा घ्यायचा हा निर्णय?

Highlightsसमंथाला पोटगीची गरज नसेलही कदाचित पण सामान्य स्त्रियांचे काय?महिला पोटगीला नको म्हणण्याचे प्रमाण वाढतंय, कारण...सध्याच्या मध्यम वर्गीय, उच्च मध्यमवर्गीय महिलेची नक्की काय अवस्था आहे, तिचे काय म्हणणे आहे याविषयी

साऊथचे प्रसिद्ध कपल समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य यांनी घटस्फोट घेण्याचे जाहीर केले. नागा चैतन्य याने सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबत जाहीर केले आहे. लग्नाला चार वर्षे झालेली असताना या दोघांनी हा निर्णय घेतला आहे. पण यातील आणखी एका मुद्द्यावर सध्या जोरदार चर्चा होत आहे. ती म्हणजे समंथा हिने नागा चैतन्यकडून मिळणाऱ्या पोटगीला नकार दिला आहे. आता घटस्फोट म्हटल्यावर कायद्यानुसार सर्वच गोष्टी आल्या. यात विभक्त होण्याबरोबरच पोटगी हाही एक महत्त्वाचा मुद्दा असतो. समंथाला नागा चैतन्यच्या कुटुंबियांकडून थोडीथोडकी नसून तब्बल २०० कोटी रुपये रक्कम पोटगी म्हणून देण्यात येईल असे सांगण्यात आले होते, पण तिने ती नाकारली आहे. समंथाने तिच्या अभिनय कौशल्यावर आणि जिद्दीने टॉलिवूडमध्ये स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. समंथा एक उत्तम अभिनेत्री असून तिने शून्यातून आपले विश्व निर्माण केले आहे. बऱ्याच विचारांती मी अक्कीनेनी कुटुंबाकडून पोडगी न घेण्याचा निर्णय घेतला असून त्याबाबत मी त्यांना कळवलं आहे असं समंथा म्हटली आहे.

समंथा ही प्रसिद्ध अभिनेत्री असून तिच्या नावाचा साऊथमध्ये दबदबा आहे. त्यामुळे तिला या पोटगीची गरज नसेलही कदाचित पण सामान्य स्त्रियांचे काय? अशाप्रकारे पोटगी नाकारणे त्यांना शक्य आहे का? अशाप्रकारे पोटगी नाकारण्याचे प्रमाण किती आहे? घटस्फोट झाल्यावर अशाप्रकारे पोटगी नाकारली जाते का? ती नाकारण्याची काय कारणे असू शकतात? अशा स्त्रियांना नंतर त्याबाबत पश्चाताप होतो का? समंथाच्या निमित्ताने कोर्टाची पायरी चढणे, त्यासाठी येणारा आर्थिक, शारीरिक, मानसिक ताण या सगळ्यांमधून जात असताना सध्याच्या मध्यम वर्गीय, उच्च मध्यमवर्गीय महिलेची नक्की काय अवस्था आहे, तिचे काय म्हणणे आहे या विषयाबाबत जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल.

( Image : Google)
( Image : Google)

महिला पोटगीला नको म्हणण्याचे प्रमाण वाढतंय...

याबाबत पुण्यात २५ वर्षे घटस्फोट या विषयावर काम करणाऱ्या आणि भगिनी हेल्पलाईनच्या संचालिका अॅड. सुप्रिया कोठारी सांगतात, अगदी अर्थिक सक्षम नसलेल्या अशिक्षित घटकातील स्त्रियाही पोटगी नाकारतात. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे तिला माहित असते आपल्या नवऱ्याकडे देण्यासाठी काहीही नसते. मी माझं छोटं-मोठं काम करुन पोट भरेन पण मला याचं काही नकोच असं म्हणणाऱ्या स्त्रियाही आहेत, याचं प्रमाण कमी असलं तरी असा महिलावर्ग आहे. याबरोबरच मध्यमवर्गातील मुलीही आम्हाला फक्त नुकसानभरपाई आणि लग्नाचा खर्च द्या पण पोटगी नको असा स्टँड घेताना दिसतात. या आर्थिकदृष्ट्या सक्षम असतात, आपले भविष्य आपण घडवू शकणाऱ्या असतात. त्यामुळे आम्ही आमच्या कष्टाने सगळे उभे करु असे त्यांचे म्हणणे असते. पण असाही एक वर्ग आहे की ज्यांना पोटगीची गरज नसते पण इतके वर्ष मानसिक, शारीरिक आणि भावनिक त्रास झाला तर पुरुषाला का सोडायचे? त्याला धडा शिकवण्यासाठी या सगळ्या गोष्टींची भरपाई म्हणून आम्ही पोटगी घेणार असे त्यांचे म्हणणे असते.

तर, उच्चभ्रू वर्गातील महिलाही हल्ली पोटगी नाकारतात, कित्येक लाख, कोटींमध्ये मिळत असलेली पोटगी त्यांना नको असते. त्या स्वत:च्या पायावर सक्षम असतात आणि आपल्याला भविष्यासाठी कोणतीही रक्कम गरजेची नाही यावर त्यांचे दुमत नसते. काही वर्षांपूर्वी या याबाबातची परिस्थिती वेगळी होती. महिला नुकसानभरपाई आणि पोटगी घेण्याचे प्रमाण जास्त होते कारण त्या आर्थिक सक्षम नव्हत्या, या विषयाबाबत पुरेशी जागृती नव्हती. मात्र गेल्या काही वर्षात हे चित्र बदलत असल्याचे दिसते. मात्र नुकसान भरपाई, लग्नाचा खर्च, सोने व इतर मालमत्ता, स्त्रीची मिळकत या सर्व गोष्टी न्यायालात सिद्ध झाल्या तरच नुकसान भरपाई आणि पोटगी ठरवता येते असेही अॅड. कोठारी यांनी स्पष्ट केले.

( Image : Google)
( Image : Google)

त्यामुळे एकूणच आताची मुलगी, स्त्री तुलनेने सक्षम आहे. ती स्वत: कमावते, स्वत:चे खर्च करु शकते., स्वाभिमानाने जगू शकते त्यामुळे पोटगी घेण्याचे प्रमाण आधीपेक्षा तुलनेने कमी आहे. यात काही महिला कोर्टकचेरीसाठी वेळ नाही त्यामुळेही पोटगी सोडून देतात. तर काही वेळी या सगळ्यातून लवकरात लवकर सुटका हवी असते त्यामुळे पोटगी नाकारली जाते. विशेष म्हणजे या सगळ्यातून लवकर मोकळे होण्यासाठी पोटगी घेण्यापेक्षा नवऱ्यालाच पैसे देणाऱ्या स्त्रियांचीही उदाहरणे आहेत. शारीरिक त्रासाला कंटाळून किंवा करीयर, नोकरी आणि स्वत:चे आयुष्य स्थिर करायचे असल्याने महिलाच नवऱ्याला पैसे देतात आणि ही प्रक्रिया लवकर व्हावी यासाठी प्रयत्न करतात. त्यामुळे समंथाच्या निमित्ताने महिला वर्ग आर्थिक, वैचारिक, भावनिकरित्या बदलत असल्सयाचे आणि सक्षम होत असल्याचे चित्र आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.   

Web Title: Samantha refuses alimony of Rs 200 crore! Should alimony be denied in a divorce? How to make this decision?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.