Quantum Dating : आजच्या बदलत्या काळात तरूणाई, करिअर, मेंटल हेल्थ आणि पर्सनल फ्रीडमला फार जास्त महत्व देतात. नात्यांबाबत तर त्यांचे फारच वेगळे, खुले विचार असतात. जुन्या लोकांप्रमाणे नाती निभावणं अनेकदा त्यांना ओझं वाटतं. याच कारणाने तरूण मंडळींमध्ये डेटिंगचे वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेंड बघायला मिळतात. क्वांटम डेटिंग त्यांपैकीच एक. क्वांटम डेटिंग त्यांना कोणत्याही दबावाशिवाय रिलेशन ठेवण्याची संधी मिळते. यात ना भविष्यांचं काही प्लॅनिंग असतं, ना ब्रेकअपची भीती. क्वांटम डेटिंग हा डेटिंगचा असा ट्रेंड आहे ज्यात लोक एकाचवेळी अनेक इमोशनल कनेक्शन एक्सप्लोर करतात. यात नाती काही बांधलेली नसतात आणि ते कधीही एकमेकांना सोडू शकतात.
क्वांटम डेटिंग म्हणजे काय?
क्वांटम डेटिंगचा अर्थ असा की नातं एकाच वेळी ‘हो’ आणि ‘नाही’ अशा अवस्थेत असतं. म्हणजे फिक्स असं काही नसतं. या ट्रेंडमध्ये लोक एका व्यक्तीशी बांधील राहू इच्छित नाहीत. ते वेगवेगळ्या लोकांना भेटतात, संवाद साधतात आणि भावनिक पातळीवर स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न करतात. यात बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंडसारखी लेबल्स लावणं गरजेचं नसतं. तरुणांना हा प्रकार स्वातंत्र्य, कमी दबाव आणि स्वतःला समजून घेण्याचा मार्ग वाटतो. म्हणजेच काय तर नातं ओपन असतं.
सोशल मीडियामुळे ट्रेंडला बळ
सोशल मीडिया आणि डेटिंग अॅप्समुळे क्वांटम डेटिंगला मोठ्या प्रमाणावर चालना मिळाली आहे. रोज नवे लोक, नवे पर्याय आणि नवे अनुभव समोर येतात. अनेक तरुणांचं असं मत आहे की योग्य व्यक्ती मिळेपर्यंत एका नात्यात अडकून राहण्याची गरज नाही. क्वांटम डेटिंग त्यांना भावना समजून घेण्यासाठी लेबलशिवाय मोकळीक देते. कधी कधी दोन मित्रांमध्येही अशा प्रकारचं नातं दिसून येतं.
क्वांटम डेटिंगचे फायदे आणि तोटे
या ट्रेंडचे काही फायदे आहेत, तर काही तोटेही. एकीकडे हे भावनिक स्वातंत्र्य आणि वैयक्तिक विकासाची संधी देते. तर दुसरीकडे यामुळे भावनिक गोंधळ आणि असुरक्षितता निर्माण होऊ शकते. अनेकदा समोरची व्यक्ती वेगळी अपेक्षा ठेवू शकते, ज्यामुळे मन दुखावण्याची शक्यता वाढते. काही प्रकरणांत एक जण नात्यात गंभीर होतो, तर दुसरा तसा नसतो यामुळे अडचणी निर्माण होतात.
