प्रा. योगेश हांडगे
पाऊस आणि पावसाळा यांची मजाच काही और आहे. जून महिन्यात जेव्हा आकाशात काळे ढग जमायला लागतात, तेव्हाच एक वेगळंच समाधान मनात खोलवर उमटतं आणि तिथूनच खऱ्या मान्सून वाईब्सची सुरुवात होते. पाऊस सगळ्यांनाच मुग्ध करत असला तरी बुलेट आणि पावसावर सारखंच प्रेम करणाऱ्या बुलेटवीरांची गोष्टच न्यारी.. रिमझिमत्या पावसात धक…धक…धक… असा आवाज करत जेव्हा बुलेटस्वार गावाच्या रस्त्यांवरून किंवा घाटातून निघतात, तेव्हा त्यांचा आणि त्यांच्या बुलेटचा पावसाच्या साक्षीने एक वेगळाच प्रवास सुरू होतो..
पावसाळी रस्त्यांवरून फिरताना पायांना लागणारा थोडा थोडा चिखल, हेल्मेटवर पडणारे पाण्याचे थेंब, आणि समोर दिसणारी धुक्याची पुटं – हे क्षण कॅमेऱ्यात कॅप्चर करता येत नाही... ते फक्त अनुभवता येतात. गाडीचा आवाज आणि पावसाची टपकणारी थाप या दोघांत एक गूढ सुसंवाद असल्याचं जाणवतं.. बुलेटवर बसून जेव्हा तुम्ही कुठल्या हिल स्टेशनकडे जाता तेव्हा वाटतं की, आयुष्य थोडं स्लो झालेलं असलं तरी खूप अर्थपूर्ण झालंय.
पाऊस आणि चहा यांचंही एक वेगळंच नातं असतं नाही का? एरवी प्रवासात कुठेच थांबावं वाटत नाही. पण रस्त्याच्या कडेला एखादी लहानशी टपरी दिसली की हमखास तिथे जाऊन गरमागरम वाफाळता चहा घेण्यासाठी ब्रेक मारावाच वाटतो..
रिमझिम पावसात गरमागरम भुट्टा तर खायलाच हवा! मक्याचे कणीस खाण्याचे ५ जबरदस्त फायदे
गरमागरम चहाच्या एकेका घोटासोबत जणू पावसाने भिजून थंडगार झालेल्या शरीरात उबदारपणा भिनत जातो. अशा वेळी मैत्रीण किंवा मित्र सोबत असणं म्हणजे त्या पावसात एकत्र आठवणींचा 'अल्बम' तयार करणंच. आणि गंमत म्हणजे तो अल्बम Instagram-stories नाही – मनातल्या Storyboard मध्ये जतन होत जातो..
अगदी कायमसाठी. मान्सून राईड्स म्हणजे Insta रील्ससाठी फक्त फोटोज नव्हेत, ते "feel reels" असतात! त्यानंतर मान्सून संपतो. रस्ते कोरडे होतात.
डॉक्टर सांगतात पावसाळ्यात पाव, ब्रेड खाणं टाळाच; त्यामुळे वाढतेय 'या' रुग्णांची संख्या
पण बुलेटवर केलेले पावसाळी प्रवास कधीच मनातून जात नाहीत. त्या चिखलात, त्या चहात, त्या ओल्या कपड्यांत आठवणी चिकटून राहतात...
(प्रा. योगेश हांडगे, सहाय्यक प्राध्यापक संगणक विभाग, पुणे इन्स्टिटयूट ऑफ कॉम्पुटर टेकनॉलॉजी)