गौरी पटवर्धन / मीनाक्षी मराठे (महिला हक्क संरक्षण समिती, नाशिक)
बंगळुरूरमध्ये राहणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनिअरने पत्नीच्या नावाने चिठी लिहून आत्महत्या केली आणि पुन्हा एकदा तऱ्हेतऱ्हेच्या चर्चांना उधाण आलं. त्यातील मुख्य मुद्दा आहे तो म्हणजे बायकांच्या बाजूने झुकले आहेत असं वाटणारे कायदे. समाजमाध्यमांवरही तसाच दिसणारा सूर दिसतो की, ‘बायकांना जर सगळ्या बाबतीत समानता हवी आहे, तर कायदे कशाला त्यांच्या बाजूने हवेत?’ पण, महिला हक्क संरक्षण समितीचं काम करताना आम्हाला प्रत्यक्षात काय चित्र दिसतं?
सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे पुरुषांवर खरंच अन्याय होतो का?
तर आमच्याकडे नोंदवल्या गेलेल्या सुमारे १८ ते २० टक्के केसेसमध्ये पुरुषांवर अन्याय होतो, असं दिसून येतं. हे प्रमाण एखाद्या दशकांपूर्वीपर्यंत याहून कमी होतं. मात्र, आता त्यात निश्चितपणे वाढ झालेली दिसते. अर्थात आमच्यावर अन्याय होतो आहे किंवा आमचा छळ होतो आहे, असं म्हणणाऱ्या पुरुषांची संख्या याहून अधिक आहे.
पुरुषांवर होत असलेल्या अन्यायाची मुख्य कारणं
१. पहिलं कारण म्हणजे विवाहित महिलांमध्ये विवाहबाह्य संबंधांचं प्रमाण वाढतांना दिसतं. याची कारणं काय असावीत, हा अजून एक अभ्यासाचा विषय आहे. पण, त्यामागचं कारण काहीही असलं, तरीही त्यामुळे त्या नात्यातला पुरुष उद्ध्वस्त होतो, असंच अनेक वेळा दिसून येतं. ‘आपल्या बायकोचं बाहेर प्रेमप्रकरण आहे.’ असं पुरुष उघडपणे सांगूही शकत नाहीत. कारण आपल्या समाजात या बाबतीत पुरुषालाच दोष दिला जातो. त्याच्या पुरुषार्थावर शंका घेतली जाते. तो त्याच्या बायकोला मुठीत ठेवू शकत नाही, यावरून त्याची चेष्टा केली जाते. त्यामुळे पत्नीचे विवाहबाह्य संबंध असतील, तर पुरुषांची अवस्था तोंड दाबून बुक्क्यांचा मार, अशी होते.
२. पुरुषांवर अन्याय होण्यामागचं दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे पत्नीने किंवा तिच्या माहेरच्या लोकांनी कायदेशीर कारवाईच्या धमक्या देणं. याचं प्रमाण खूप नसलं तरी या घटना निश्चितपणे घडतात आणि त्याच्या प्रमाणात वाढ झालेली दिसते. यात महिलांची बदलणारी मानसिकता याचा जितका दोष आहे तितकाच किंवा त्याहूनही अधिक दोष हा अतिशय संथपणे चालणाऱ्या न्याय व्यवस्थेचा आहे. या न्याय व्यवस्थेत पत्नीने आपल्याविरूद्ध खोटी तक्रार केली तरी आपली बाजू मांडून न्यायालयात आपल्याला न्याय मिळेल आणि तोही लवकर मिळेल, अशी आशा वाटत नाही. आपली कुठलीही चूक नसताना पोलिस आणि कोर्ट यांचे खेटे घालायला लागणं, हा अत्यंत गंभीर स्वरुपाचा ताण पुरुषाच्या कुटुंबीयांवर येतो.
३. या दोन तुलनेने वारंवार दिसणाऱ्या कारणांव्यतिरिक्त अजून एक कारण असं आहे, की जे पुरुषांना सहन करता येत नाही आणि चारचौघात सांगताही येत नाही. ते म्हणजे पत्नीकडून होणारी मारहाण. याचं प्रमाण अगदी कमी असलं तरीही या प्रकारच्या केसेस येतात. अनेकदा बायका असं म्हणतात की, नवरा मारहाण करतो आणि मी त्याला केवळ प्रतिकार केला होता. पण, काही वेळा फक्त बायको नवऱ्याला मारहाण करते, अशाही केसेस दिसतात.
अन्य कारणे...
१. ‘बायको आणि आईच्या भांडणात आमची फार कुचंबणा होते.’ पत्नी आणि आईचं एकमेकींशी पटत नसेल तर नवऱ्याची अवस्था कठीण होते, ही गोष्ट खरी असली, तरीही त्यावर जोवर तो स्वतः ठाम भूमिका घेत नाही तोवर हा प्रश्न सुटू शकत नाही. त्यातून त्यांची घुसमट होते.
२. जुळवून घेण्याची अपेक्षा बहुतेक वेळा पत्नीकडूनच केली जाते आणि तिने ते करायला नकार दिला तर नवऱ्याला तो त्याच्यावर होणारा अन्याय असतो. मात्र, या परिस्थितीत पत्नीही त्याच्याइतकीच पीडित असते आणि हा प्रश्न केवळ समंजस चर्चेने सुटू शकतो. अनेक पुरुषांना ठाम भूमिका घेतल्यामुळे येणारा वाईटपणा नको असतो.
३. अजून एक मुद्दा म्हणजे पत्नीच्या माहेरचे लोक तिच्या संसारात फार ढवळाढवळ करतात. यातली मेख अशी आहे, की मुलाची आई मुलाच्या संसारातील आणि सुनेच्या खासगी आयुष्यातील अनेक बाबतीत ढवळाढवळ करत असते. समाजाला सासू म्हणून तिचा तो अधिकार वाटतो. मात्र, मुलीच्या आईने काही सांगितलं तर ती ढवळाढवळ वाटते. यावरचा एकमात्र उपाय हा बायकोच्या आणि नवऱ्याच्या दोघांच्याही घरच्यांनी दोघांच्या संसारात ढवळाढवळ करू नये.
४. कमावत्या स्त्रिया त्यांनी कमावलेल्या पैशांचे निर्णय स्वतंत्रपणे घेताना दिसतात. त्यांच्या माहेरी पैशांची मदत करतात आणि हा पुरुषांना त्यांच्यावर अन्याय आहे, असं वाटतं. खरं तर दोघांच्या संसाराचा खर्च (दोघं कमावते असतील तिथे) दोघांनी मिळून करावा. अर्थात एखादी स्त्री जर तिच्या कमाईतले पैसे स्वतःच्या संसारासाठी अजिबात वापरत नसेल तर ते निश्चितपणे चूक आहे.
५. सगळ्यात कमी बोलला जाणारा आणि सगळ्यात गंभीर प्रश्न म्हणजे पत्नी शारीरिक संबंधात समाधानी नसते आणि ती संबंध ठेवायला नकार देते. या प्रश्नाचे दोन उपप्रश्न आहेत. जर का पत्नी शारीरिक संबंधांमध्ये खरंच समाधानी नसेल तर त्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन योग्य ती उपाययोजना केली पाहिजे. हा प्रश्न विवाहाचा पाया हलवून टाकू शकतो आणि पत्नी जर का शारीरिक संबंध टाळणं, हे हत्यार म्हणून वापरत असेल तर त्याप्रश्नीही अडचण समजून प्रश्न सोडवला पाहिजे.
६. या सगळ्या प्रश्नांच्या शेवटी असं दिसतं, की पुरुषांवर काही वेळा खरंच अन्याय होतो, काही वेळा त्यांना त्यांच्या पारंपरिक विचारांमुळे अन्याय झाल्यासारखं वाटतं. स्त्रियांपेक्षा पुरुषांवर अन्याय होण्याचं प्रमाण बऱ्यापैकी कमी आहे. मात्र, ते प्रमाण कितीही कमी असलं, तरीही त्याची योग्य ती दखल घेतलीच गेली पाहिजे आणि ज्या पुरुषांवर अन्याय होतो त्यांना योग्य ती मदत आणि न्याय मिळालाच पाहिजे. कारण वैवाहिक जीवनात कायम एकाचीच चूक आहे, असं कधीच नसतं.
mhss.nsk@gmail.com