Join us  

मलाला युसुफझाईने निवडला आयुष्याचा जोडीदार; कोण आहे 'असर', ज्याला मलाला 'कुबुल है' म्हणाली..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2021 11:27 AM

मुलींच्या शिक्षणासाठी निडरपणे लढणारी मलाला विविहबद्ध झाली आहे, तिचा पती कोण आणि कुठला आहे जाणून घेऊया...

ठळक मुद्देजाणून घ्या कोण आहे मलाला युसूफझाई हिचा पती? महिला हक्कांसाठी लढणारी मलाला इंग्लंडमध्ये झाली विवाहबद्ध

मुलींच्या शिक्षण हक्कासाठी वयाच्या १५ व्या वर्षापासून लढा देणारी पाकिस्तानची मलाला युसूफझाई अतिशय धाडसी मुलगी. इतक्या लहान वयात मुलींच्या शिक्षणाविषयी बोलणारी आणि लढा देणाऱ्या मलालाने जगभरात आपली ओळख निर्माण केली. अवघ्या १५ व्या वर्षी तिच्यावर तालिबान्यांनी हल्ला केला होता आणि त्यात ती जखमी झाली होती. यानंतर मलाला तिच्या कुटुंबियांसह इंग्लंडमधील बर्मिंगहॅम याठिकाणी स्थायिक झाली. वयाच्या १७ वर्षी मलालाला नोबेल शांतता पुरस्काराने गौरविण्यात आले होते. मलाला सर्वात कमी वयाची नोबेल पुरस्कार विजेती आहे. तिने ऑक्सफर्ड विद्यापीठात तत्त्वज्ञान, राजकारण आणि अर्थशास्त्राचा अभ्यास केला आणि 2020 मध्ये पदवी प्राप्त केली. मलाला सध्या २४ वर्षांची असून नुकतेच तिचे लग्न झाले. बर्मिंगहम येथे घरगुती पद्धतीने तिचा निकाह पार पडला असून याबाबत तिने आपल्या ट्विटर अकाऊंटद्वारे माहिती दिली आहे. यामध्ये तिनी दोघांचे फोटोही पोस्ट केले आहेत. आता मलालाचा पती असर मलिक नेमका कोण आहे याबाबत माहिती घेऊया...

१. मूळचे पाकिस्तान येथील असलेले असर मलिक पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या हाय परफॉर्मन्स सेंटरचे महाव्यवस्थापक म्हणून काम करतात. २०२० मध्ये ते या पदावर रुजू झाले. 

२. याबरोबरच असर मलिक त्याच्याकडे लास्ट मॅन स्टँडसची फ्रांचायजीही आहे. 

३. एप्रिल २०१९ ते मे २०२० या कालावधीत असर पाकिस्तान सुपर लीगमधल्या मुलतान सुलतान्स संघासाठी व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहत होते. 

४. असर यांनी लाहोर युनिव्हर्सिटी ऑफ मॅनेजमेंट सायन्स येथून बॅचलर ऑफ सायन्सचे शिक्षण घेतले आहे. पदवीसाठी अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र हे त्यांच्या अभ्यासाचे विषय होते.  

५. थिएटर प्रॉडक्शनशी निगडीत ड्रामालाईन या संस्थेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.  

हल्ल्यानंतर मलाला हिला उपचारांसाठी इंग्लंडमध्ये नेण्यात आले होते. त्याठिकाणी तिच्यावर उपचार करण्यात आले आणि नंतर ती याचठिकाणी स्थायिक झाली. पाकिस्तानमध्ये मलालाच्या कामाबद्दल संमिश्र प्रतिक्रिया असतील तरीही पाश्चात्य देशात मात्र तिच्या निर्भयपणामुळे आणि महिला हक्कांसाठी काम केल्याबद्दल तिचे मोठ्या प्रमाणात कौतुक केले जाते. मलाला हिने हल्ल्यातून बरे झाल्यावरही मुलींच्या शिक्षणासाठीचे काम सुरुच ठेवले. वडिलांच्या मदतीने तिने युनायटेड किंग्डम येथे मलाला फंड सुरु केला. मुलींनी त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करीयर करावे यासाठी या फंडामार्फत मदत करण्यात येते. 

(Image : Twitter)

मलालाने ट्विट करत आपल्या लग्नाची बातमी दिल्यावर तिच्या चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. मलाला हिला क्रिकेट खूप आवडत असून काही मुलाखतींमध्ये तिने याबाबत उल्लेख केला होता. योगायोगाने तिचे पती क्रिकेटशी संबंधित आहेत. आपल्या ट्विटरच्या पोस्टमध्ये मलाला म्हणते, “हा माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस आहे. असर आणि मी आयुष्यभर सोबत राहण्यासाठी लग्नगाठ बांधत आहोत. बर्मिंगहम येथील आमच्या घरी लहान पद्धतीने कुटुंबियांबरोबर आमचा निकाह पार पडला आहे. तुमच्या शुभेच्छा आमच्यासोबत राहुद्या. आयुष्याचा पुढील प्रवास सोबत करण्यासाठी आम्ही एक्सायटेड आहोत”. तिची ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असून अनेकांनी ती लाईक आणि रिट्विट केली आहे. जुलै महिन्यात व्होग मासिकाला दिलेल्या मुलाखतीत मलालाने लग्नाविषयीचे आपले मत व्यक्त केले होते. ती म्हणाली होती, "लोकांना लग्न का करायला लागतं हे समजत नाही. जर तुम्हाला आयुष्यासाठी जोडीदार हवा असेल तर तुम्हाला कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या का कराव्या लागतात? तुमचं सहजीवन असंच का सुरू होऊ शकत नाही"? 

टॅग्स :रिलेशनशिपलग्नमलाला युसूफझाईट्विटर