Join us  

कटकट नको, घटस्फोटही नको म्हणून नवरा- बायकोची आत्महत्या! भारतातील भयानक आकडेवारी, घटस्फोटापेक्षा मरण स्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2021 5:15 PM

लग्नानंतर जमले नाही म्हणून पती-पत्नीला घटस्फोटाऐवजी आत्महत्येचा पर्याय वाटतो जवळचा, मागील ५ वर्षातील धक्कादायक आकडेवारी समोर

ठळक मुद्देहुंडा आणि त्यानंतर नवरा-बायकोमध्ये विविध कारणांनी असलेले मतभेद हे आणखी एक महत्त्वाचे कारण असल्याचे समजतेपाच वर्षात वैवाहिक ताणतणावांमुळे आत्महत्या केलेल्यांची संख्या ३७,५९१ इतकी असल्याचे समोर आले

लग्नसंस्था आणि कुटुंबव्यवस्था याबाबत भारत जगात आघाडीवर असल्याचे म्हटले जाते. युनायटेड नेशन्सच्या  एका अहवालानुसार जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतात घटस्फोटाचे प्रमाण सर्वात कमी आहे. २०१० पर्यंत ४५ ते ४९ या वयोगटातील घटस्फोट घेतलेल्या महिलांचे प्रमाण केवळ १.१ टक्के होते. याचा अर्थ सगळे विवाह यशस्वी होतात किंवा आपल्या वैवाहिक आयुष्यात सगळे खूश असतात असे नाही. तर उलट नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार (NCRB), आपल्या वैवाहिक आयुष्यात खूश नसलेल्या जोडप्यांपैकी अनेक जण घटस्फोट घेण्यापेक्षा आत्महत्या करण्याचा निर्णय घेत असल्याचे यामध्ये म्हटले आहे. त्यामुळे भारतात वैवाहिक जीवन संपवण्यापेक्षा स्वत:चे जीवन संपवण्याला लोक जास्त प्राधान्य देत असल्याचे समोर आले आहे. 

(Image : Google)

NCRB ने मागील महिन्यात अपघाताने मृत्ये होणाऱ्या आणि आत्महत्या करुन आपले आयुष्य संपवणाऱ्या लोकांची आकडेवारी प्रसिद्ध केली. त्यामध्ये २०१६ ते २०२० या पाच वर्षात वैवाहिक ताणतणावांमुळे आत्महत्या केलेल्यांची संख्या ३७,५९१ इतकी असल्याचे समोर आले. म्हणजेच दिवसाला २० जणांनी वैवाहिक आयुष्य सुखकर नसल्यामुळे आत्महत्या केल्याचे हा अहवाल सांगतो. तसेच अशाप्रकारे वैवाहिक जीवनातील अडचणींमुळे आत्महत्या करणाऱ्यांमध्ये महिलांचे प्रमाण हे पुरुषांच्या तुलनेत खूप जास्त असल्याची नोंदही या अहवालात करण्यात आली आहे. यामध्ये हुंड्यासाठी मुलाच्या कुटुंबियांकडून मुलीला दिला जाणारा त्रास हे सर्वात महत्त्वाचे कारण असल्याचे समोर आले आहे. तर नवरा-बायकोमध्ये विविध कारणांनी असलेले मतभेद हे आणखी एक महत्त्वाचे कारण असल्याचे समजते. १०,२८२ आत्महत्या या हुंड्याच्या कारणामुळे झाल्याचे ही आकडेवारी सांगते, तर १०,५८४ जणींनी नवऱ्याशी वाद असल्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. म्हणजेच वर्षाला २०५६ जणीनी हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला वैतागून आत्महत्या केली असून २१०० जणींनी नवऱ्याशी न पटल्याने आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलले आहे. 

(Image : Google)

तर विवाहेतर संबंधांमुळे आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाणही जास्त असून ते वर्षाला साधारण ११०० म्हणजेच, पाच वर्षाला ५७३७ इतके आहे. घटस्फोट झाल्यामुळे आत्महत्या करणाऱ्यांची संख्या २६०० असून अहवालात बाकीच्या आत्महत्या या कोणतेही कारण न देता इतर गटात नोंद करण्यात आल्या आहेत. लग्नाशी संबंधित वेगवेगळ्या कारणांवरुन आत्महत्या केलेल्या महिलांची ५ वर्षातील संख्या २१,५७० इतकी असून पुरुषांची संख्या १६,०२१ इतकी आहे. त्यामुळे महिला आर्थिकदृष्ट्या , मानसिकदृष्ट्या किंवा सामाजिकदृष्ट्या घटस्फोटासाठी सक्षम नसल्याने त्यांच्यातील आत्महत्येचे प्रमाण जास्त असल्याचे दिसते. 

 

टॅग्स :रिलेशनशिपघटस्फोटमृत्यूपती- जोडीदार