Friendship Marraige : लग्नाचं नाव ऐकताच जास्तीत जास्त लोकांच्या मनात प्रेम, रोमान्स आणि भावनिक नात्याचं चित्र उभं राहतं. पण आपण कधी अशा लग्नाबद्दल ऐकलं आहे का, ज्यात ना प्रेम असतं, ना शारीरिक आकर्षण फक्त मैत्री असते? जपानमध्ये सध्या असाच एक नवा ट्रेंड वेगाने वाढत आहे, ज्याला म्हणतात "फ्रेंडशिप मॅरेज". आज आपण नात्याच्या या नव्या व्याख्याबाबत समजून घेणार आहोत.
काय आहे ‘फ्रेंडशिप मॅरेज’? (What Is Friendship Marraige)
फ्रेंडशिप मॅरेज म्हणजे दोन असे लोक जे एकमेकांशी भावनिकदृष्ट्या जोडलेले असतात, पण त्यांच्यात रोमॅंटिक किंवा शारीरिक आकर्षण नसतं. हे नातं पूर्णपणे मैत्री, समजूतदारपणावर अवलंबून असतं. जपानमध्ये २०१५ पासून आतापर्यंत सुमारे ५०० लोकांनी अशा प्रकारचं लग्न केलं आहे. या लग्नांमध्ये कपल्स लग्नाआधीच अनेक व्यावहारिक गोष्टी स्पष्ट ठरवतात. जसे की, खाण्याच्या आवडीनिवडी, घर खर्चाचं प्लानिंग, भविष्यातील योजना, मुलांच्या संगोपनाची पद्धत आणि घरातील जबाबदाऱ्यांचं शेअरिंग.
कोण करतात अशी लग्नं?
हा ट्रेंड असेक्शुअल म्हणजेच ज्यांना लैंगिक आकर्षण नसतं किंवा होमोसेक्शुअल लोकांमध्ये जास्त पाहायला मिळतो. त्यांच्यासाठी ही एक सुरक्षित आणि सन्मानजनक पद्धत ठरते, ज्यात ते समाजाच्या पारंपरिक अपेक्षांपासून दूर राहून एक स्थिर नातं निर्माण करू शकतात.
का वाढतोय हा ट्रेंड?
तरूणाईमध्ये हा ट्रेंड वाढण्यामागे काही सामाजिक आणि मानसिक कारणं आहेत.
सामाजिक दबावातून मुक्ती
जपानसारख्या देशात लग्न आणि मुलं याबाबत समाजाकडून मोठा दबाव असतो. फ्रेंडशिप मॅरेज त्यातून बाहेर पडण्याचा एक सोपा मार्ग मानला जातो.
सोबत आणि आपलेपणाची गरज
अनेक लोक एकटेपणाने त्रस्त आहेत. त्यांना असा जोडीदार हवा असतो जो मित्रासारखा आणि कुटुंबासारखा आधार देईल.
पारंपारिक लग्नाविषयी उदासीनता
अनेक तरूण पारंपारिक विवाहाच्या अपेक्षांमुळे आणि तणावांमुळे चिंतेत आहेत. त्यांना भावनिक ओझ्याविना साधं नातं हवं असतं. अशा लग्नांमध्ये अपेक्षा कमी असतात, त्यामुळे वाद आणि निराशाही कमी असते.
सरकारी फायदे
जपानमध्ये लग्न झालेल्या जोडप्यांना करसवलती मिळतात. त्यामुळेही हा पर्याय तरूणांना आकर्षक वाटतो.
फ्रेंडशिप मॅरेज म्हणजे एखाद्या विश्वासू ‘रूममेट’सोबत आयुष्य जगण्यासारखं आहे. या नात्याचं मूळ प्रेम नसून, एकमेकांचा सन्मान, समज आणि सोय आहे. या नात्यात ना भावनिक दबाव असतो, ना समाजासमोर दिखावा. दोघंही आपापल्या मर्यादा राखून एकमेकांच्या आयुष्यात महत्त्वाचा भाग बनतात. कदाचित भविष्यात हा ट्रेंड जगभर अधिक वाढू शकतो. कारण शेवटी प्रत्येकाला आयुष्यात कुणीतरी साथीदार हवाच असतो.