Join us

जन्मभर सुखी रहायचंय ना, मग नवरा म्हणेल तसं जगा! -अमेरिकेतही बायकांना असे सल्ले मिळतात तर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2022 16:49 IST

American lady's Advice To All Women: बाई पुरुषापेक्षा कमीच, तिनंच नमतं घ्यावं हे सल्ले मागास, जुनाट देशात नाही तर अमेरिकेत दिले जात आहेत.

ठळक मुद्देबायांनो आयुष्यभर सुखात रहायचं ना तर पुरुषांना शरण जा, ते म्हणतील तसं जगा. ऐकून धक्का बसला ना? अनेकांना बसला.

'पती हाच परमेश्वर' किंवा 'पती के चरणाेंमे स्वर्ग है...', अशी घिसीपीटी वाक्यं तर आता भारतीय चित्रपटांमधूनही ऐकू येणं बंद झालंय. पण ही अमेरिकन स्वयंघोषित रिलेशनशिप गुरू (relationship expert) पाहा, ती बायकांना ऑनलाइन सल्ले (online advice to women) देत सुटली आहे की, बायांनो आयुष्यभर सुखात रहायचं ना तर पुरुषांना शरण जा, ते म्हणतील तसं जगा. ऐकून धक्का बसला ना? अनेकांना बसला. आधीच अमेरिकेत (America) बायकांना गर्भपाताचा हक्क नाकारण्याइतपत बुरसटलेले निर्णय घेतले जात आहेत. दुसरीकडे बायकांना चार समजुतीच्या गोष्टी सांगायच्या नावाखाली इनफ्लूएन्सर म्हणाव्या अशा बायका असे जुनाट, मागास सल्ले देत सुटल्या आहेत. अर्थात त्या बाईंवर प्रचंड टीका झाली, अनेकजणी तर म्हणाल्या की हे असलं आचरट जगण्यापेक्षा आम्ही जन्मभर एकटं नाही का राहणार? मात्र सोशल मीडियातून काय आणि कसा प्रचार अमेरिकेतही होऊ शकतं याचं हे ताजं उदाहरण आहे.

 

स्वत:ला रिलेशनशिप एक्सपर्ट मानणाऱ्या या महिलेचं नाव आहे अलीसा अब्दुल्लाएवा. अटलांटा येथे राहणारी ही महिला अशाच आशयाचे स्वत:चे अनेक व्हिडिओ टिकटॉकवर पोस्ट करते आणि जगभरातील महिलांना सल्ला देत असते. तिच्या या सल्ल्यांनी सोशल मिडियावर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. स्त्री आणि पुरुष समान नाहीतच. स्त्रियांपेक्षा पुरुष हे नेहमीच वरचढ आहेत आणि वरचढच राहणार असं या बयेचं म्हणणं आहे. त्यामुळे जर एखाद्या बाईला आयुष्यात सुखी रहायचं असेल, आनंदी- समाधानी व्हायचं असेल तर तिने तिच्या नवऱ्याचं सगळं ऐकलंच पाहिजे. त्याला शरण गेलंच पाहिजे, असा सल्ला ती देते..

 

स्वत:चं हे म्हणणं लोकांना विशेषत: महिलांना पटवून देण्यासाठी तिने एक अजब थेअरी रचली आहे. ती म्हणते की आज कोणतीही स्त्री अशा नवऱ्याच्या शोधात असते जो तिच्यासाठी प्रोव्हायडर आणि प्रोटेक्टर म्हणून काम करेल. इथेच पुरुषांचा स्त्रियांपेक्षा उच्च दर्जा लक्षात येतो. जर तुम्ही म्हणत असाल स्त्री आणि पुरुष समान आहेत, तर मग कोणताही पुरुष तुमच्यासाठी प्रोव्हायडर आणि प्रोटेक्टर अशा भुमिका पार पाडणार नाही.

सायकल चालवत भरधाव वेगाने निघालेली सुसाट पोर, रस्त्यात खांबावर दणकन आपटणार तोच...... व्हायरल व्हिडिओ

उच्चतेच्या बाबतीत सगळ्यात आधी देव आहे, त्यानंतर गुरू आहेत, त्यानंतर पुरुष आणि नंतर स्त्री आहे, असं तिचं म्हणणं आहे. तिच्या या व्यक्तव्यामुळे सोशल मिडियावर चांगलीच खळबळ माजली असून अनेक स्त्रिया तिच्या या विचारांवर चिडल्या आहेत. हे असं असेल तर यापेक्षा लग्न करून एखाद्या पुरुषाची गुलामगिरी पत्करण्यापेक्षा आयुष्यभर सिंगल राहणंच कधीही उत्तम अशा आशयाच्या भरपूर कमेंट तिच्या व्हिडिओंना मिळत आहेत. हे आचरट सल्ले कुणी मनावर घेतले नाही तरी, सतत जुनाट गोष्टींचा मारा हादेखील तितकाच घातक आहे. 

 

टॅग्स :रिलेशनशिपसोशल व्हायरलइन्स्टाग्रामअमेरिका