भाऊबीज. भावाबहिणीच्या नात्याचा, प्रेमाचा उत्सव. भाऊबीज ही काही फक्त ओवाळणी देण्याघेण्यापुरती गोष्ट नसते, ना सोशल मीडियातली पोस्ट किंवा फोटोतलं पीडीए. ते नातं हेच एक वचन आहे जन्मभराच्या सोबतीचं. पडत्या काळात एकमेकांसोबत राहण्याचं आणि आनंदाच्या काळात आनंद साजरा करतानाच भानावर राहण्याचं जन्मभराचं नातं म्हणजे भाऊबहीण!
अगदी बॉलिवूडमध्येही भावाबहिणीच्या काही जोड्या आहेत. बहिणीबहिणींच्या आहेत. ते आपल्या भावाबहिणीच्या मागे त्यांच्या पडत्या काळात पहाडासारखे उभे राहिले आणि एकमेकांच्या साथीने जगण्याची वाट सोपी केली.
हृतिक रोशन आणि सुनैना रोशन, फरहान अख्तर आणि जोया अख्तर, जान्हवी आणि अर्जुन कपूर, करिश्म-करीना कपूर, रणबीर-रिधिमा, आलिया भट आणि तिची बहीण. अशी किती उदाहरणं सांगता येतील जे जाहीर एकमेकांसोबत एकमेकांच्या पाठीशी तर उभे राहिलेच पण त्यांनी परस्परांना सांभाळून घेत आपले प्रेमाचे नाते घट्ट केले.
नातं असं कायम घट्ट ठेवायचं तर काही गोष्टी करायलाच हव्या.
एक म्हणजे हिशेब ठेवायचे नाहीत. विचारायचं नाही की कोण फोन करतं कोण करत नाही, कोण मदत करतं कोण करत नाही. कोण वेळ काढतं कोण काढत नाही. आपण आपल्यापरीने त्या नात्यासाठी कायम देत रहायचं. आपण कितीही मोठे झालो, वेगवेगळ्या शहरात गेलो, ऑफिसात बिझी झालो, तरी बोलणं कमी व्हायला नको.
एकमेकांचं ऐकून घ्यावं, सल्ला द्यावा पण मी म्हणतो तसेच कर असे आग्रह सोडून द्यावे. जजमेंटल अजिबात होऊ नये. अपमान तर अजिबात करु नयेत.
लहानपणी हक्कानं ज्या गोष्टी मागायचो, वाटून घ्यायचं ते आताही करण्यात कसला आला इगो?
भांडणं तर होणारच, पण कुणाची चूक याचा किस न पाडत बसता सॉरी म्हणून मोकळं व्हायचं आणि लगेच सोडून द्यायचा वाद. मनात काही ठेवायचं नाही.
लहानपणी जसं आपण खेळताना भांडायचो आणि लगेच सॉरी न म्हणताही पुन्हा खेळायला लागायचो, अगदी तसंच.
आपल्या नात्यापेक्षा मोठं काही नाही हे एकदा मनात पक्क असलं की भाऊबीज कायमसाठी मायेची ओवाळणी घेऊन येते. बहीण जन्मभर सोबत असते आणि भाऊ पाठीराखा होतो.
