lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Relationship > घोरणाऱ्या जोडीदाराने झोप उडवली; घोरण्यावर उपाय असू शकतो का? सहन करायचं की..

घोरणाऱ्या जोडीदाराने झोप उडवली; घोरण्यावर उपाय असू शकतो का? सहन करायचं की..

सुखाच्या संसारात ‘घोरण्यामुळे’ मिठाचा खडा पडतो हे खरं, पण त्यावर उपचार आहेत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2024 07:38 PM2024-05-07T19:38:46+5:302024-05-07T19:41:48+5:30

सुखाच्या संसारात ‘घोरण्यामुळे’ मिठाचा खडा पडतो हे खरं, पण त्यावर उपचार आहेत.

A snoring partner sleeps away; Can there be a cure for snoring? To bear that.. | घोरणाऱ्या जोडीदाराने झोप उडवली; घोरण्यावर उपाय असू शकतो का? सहन करायचं की..

घोरणाऱ्या जोडीदाराने झोप उडवली; घोरण्यावर उपाय असू शकतो का? सहन करायचं की..

Highlightsघोरणं बरं होऊ शकतं. तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि नांदा सौख्यभरे !

सोनाली लोहार

नुकताच ओटीटीवर एक तामिळ चित्रपट पाहिला. कथेचा जीव तसा छोटासा; पण विषय मात्र फारच महत्त्वाचा. ही कथा आहे एका नवविवाहित जोडप्याची आणि त्यांच्या कुटुंबीयांची. या तरुण जोडप्यातील मुलीला घोरण्याचा त्रास असतो. लग्नासाठी तिला बघायला येणाऱ्या प्रत्येक मुलाला ती ही गोष्ट अगदी प्रामाणिकपणे सांगते आणि तिथेच बैठका फिसकटतात. आपल्या सुंदर सुशिक्षित मुलीचं लग्न जमावं म्हणून तिची आई तिला गप्प बसवते आणि तिचं लग्न होतं; पण लग्नाच्या पहिल्याच रात्री बायकोच्या घोरण्यानेच नवऱ्याला दचकून जाग येते आणि तिथूनच सगळं बिनसत जातं. रात्रीची झोप अपूर्ण झाल्याने त्याच्या व्यवसायावरही परिणाम होतो आणि शेवटी गोष्टी घटस्फोटापर्यंत जातात.'घोरणे' या एका अतिशय वैयक्तिक गोष्टीमुळे नातेसंबंधांवर काय परिणाम होऊ शकतात यावर हा चित्रपट चांगलाच प्रकाश टाकतो; पण दुर्दैवाने घोरण्यावर उपलब्ध उपाय आणि उपचारांबद्दल मात्र त्यात काहीही नाही. ‘जोडीदारावर प्रेम असेल तर मग त्याचे घोरणे सहन करत राहा आणि आपले लग्न वाचवा' असा काहीसा सूर हा चित्रपट आळवत राहतो. पण तसे नाही, घोरण्याचा त्रास कमी व्हावा म्हणून उपाय आहेत.
घोरणं ही 'सवय' नाही तर एक ‘शारीरिक समस्या' आहे जिचा व्यवस्थित अभ्यास करून त्याचं निदान झालं पाहिजे आणि उपचारही झाले पाहिजेत, हेच बऱ्याच जणांना माहीत नसतं.

(Image :google)

घोरण्याचा त्रास, डोक्याला ताप?

१. आजच्या घडीला जगात २ अब्जाहून अधिक लोक कमी-अधिक प्रमाणात घोरतात, ज्यात लहान मुलंही आली. नाकापासून ते खाली श्वसन नलिकेपर्यंतच्या मार्गात निर्माण झालेला काही ना काही अडथळा आणि घशाच्या जीभ, पडजीभ या व इतर भागांच्या स्नायूंमध्ये आलेली शिथिलता ही घोरण्यास कारणीभूत ठरते.
२. अगदी साधं उदाहरण म्हणजे दिवसभर प्रचंड शारीरिक थकवा येणार एखादं काम केल्यावर रात्री अंथरुणावर पडल्यापडल्याच डोळे मिटतात आणि शरीराचे स्नायू न स्नायू सैलावतो. सकाळी आपण उठतो त्यावेळी नवरा हळूच सांगतो, "काल तू जरा घोरत होतीस गं". आपण शरमून जातो आणि नवल करत राहतो की मी तर कधीच घोरत नाही, मग कालच असं कसं झालं!
३. विशेष म्हणजे आजही पुरुषांचं घोरणं हे थोडं तरी स्वीकारार्ह समजलं जातं; पण बाई घोरते म्हणजे तर "अरे देवा, किती ते वाईट" म्हणून जास्तच नाकं मुरडली जातात.

४. गडबड अशी असते की जो घोरतो त्याला आपण घोरतोय याची गंधवार्ताही नसते, तो स्वतः अगदी गाढ झोपेत असतो, रात्रभर तळमळत राहतो तो त्याचा शेजारचा जोडीदार. त्यामुळे डॉक्टरांकडे येणारे बहुतांश पेशंट्स हे त्यांच्या जोडीदारांनीच ढकलत आणलेल्या व्यक्ती असतात. अशावेळी ती व्यक्ती ज्या अपराधी भावनेने समोर बसते ते बघून वाईट वाटतं.
५. जोडीदाराची तर होतेच; पण घोरणाऱ्या व्यक्तीची स्वतःचीही प्रचंड कुचंबणा होत असते. या व्यक्ती सहप्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून रात्रीचा प्रवास टाळतात, मित्र-मैत्रिणींबरोबर ओव्हर नाइट सहली, गेट-टुगेदर टाळतात. सहकाऱ्यांबरोबर रूम शेअर करावी लागेल म्हणून बाहेरगावच्या कॉन्फरन्स, सेमिनार्स टाळतात. सणसमारंभात नातेवाइकांसोबत असताना चुकून डुलकी लागली तर कुटुंबीयांचे हसे होईल म्हणून समारंभही टाळतात.
६. काही वेळा दुसरा जोडीदार घोरण्याचा व्हिडीओ वगैरे करून गंमत म्हणून नातेवाइकांना, मित्रांना दाखवतो. अशावेळी ती घोरणारी व्यक्ती इतकी संकोचून गेलेली असते की काही विचारू नका. नात्यात असं नकळत हळूहळू अंतर पडत जातं.

(Image :google)

घोरण्यावर उपचार काय?

१. कधीकधी घोरताना काही काळासाठी श्वास घेण्याची क्रियाच थांबू शकते, ज्याला 'स्लिप ॲप्निया' म्हणतात आणि ही अवस्था तर जीवघेणी ठरू शकते. रात्रभर शरीराला श्वासामार्फत होणाऱ्या ऑक्सिजनचा पुरवठा जर अशाप्रकारे कमी होत गेला तर साहजिकच त्याचा परिणाम शरीरातल्या सर्वच महत्त्वाच्या संस्थांवर होऊन त्यांची कार्यक्षमताही मंदावते, हे सगळंच धोकादायक आहे.
२. घाेरण्याचा त्रास असेल तर तज्ज्ञांमार्फत कान- नाक-घसा तपासणी, स्लिप स्टडीसारख्या तपासण्या करून या समस्येचे मूळ शोधता येतं. त्यावर शस्त्रक्रिया, मायोफंक्शनल थेरपी, वेट लॉस थेरपी, पॉझिटिव्ह एअर प्रेशर थेरपीसारखे अगदी पुरेपूर रिझल्ट देणारे उपायही उपलब्ध आहेत.
३. घोरणं बरं होऊ शकतं. तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि नांदा सौख्यभरे !

संसारात मिठाचा खडा

एक साठीतलं जोडपं आलं होतं. बायको वैतागून म्हणाली, "या वयात लेक-सून काय म्हणतील म्हणून अजून तरी एकाच खोलीत झोपतोय. तुम्ही यांचं घोरणं थांबवा नाही तर मला तरी गाढ झोप येईल असं काहीतरी औषध द्या."
* एकदा एक वरिष्ठ अधिकारी आले, सोबत अर्थातच पत्नी होती. ती म्हणाली, "यांचं घोरणं हल्ली इतकं वाढलंय की मी मध्यरात्री उठून सरळ हॉलमध्ये जाऊन झोपते. सकाळी नोकर माणसं यायच्या आधी परत बेडरूममध्ये जाते." ते ऐकत असलेले अधिकारी म्हणाले, "खूप वाईट वाटतं हो! दिवसभर इतकी मरमर करायची ती कोणासाठी? रात्री आपलं हक्काचं माणूस शेजारी आहे या विश्वासाने डोळे मिटतो आपणं, तेवढंही सुख नशिबात नाही. ही जराही ॲड्जस्ट करायला तयार नाही."

* एकदा एक बाई म्हणाल्या, "मी हळूहळू यांच्या घोरण्याची सवय करून घेतली होती. यांचं सुरू झालं की मी अक्षरशः त्या तालावरती झोपून जायचे; पण हल्ली यांच्या घोरण्याच्या पॅटर्नच बदलत चाललाय, मधेच शांतता, मधेच स्कूटरचा आवाज, मधेच ट्रेनसारखा आवाज, कधी मिक्सरसारखा आवाज! शक्य आहे का मी झोपणं, तुम्हीच सांगा!"
* ही खूप घोरते म्हणून मी दुसऱ्या खोलीत झोपायला लागलोय, तर ही माझ्यावर संशय घेते, असं नवरा सांगत होता.
बायको भरल्या गळ्यानं म्हणाली, 'रात्रीचा फोन कसा वापरता येणार नं, म्हणून ही कारणं, बाकी काही नाही!"
तो हतबल होऊन बघत होता.

(लेखिका व्हॉइस थेरपिस्ट आहेत)
sonali.lohar@gmail.com

Web Title: A snoring partner sleeps away; Can there be a cure for snoring? To bear that..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.