The secret of 130 year old architecture | 130 वर्ष जुन्या वास्तूचं गुपित
130 वर्ष जुन्या वास्तूचं गुपित

- हिमानी नीलेश

महालाच्या दोन दारांच्या साखळकडीचा करकर येणारा आवाज, मोठय़ा दरवाजाच्या पोटातला धाकटा दिंडी दरवाजा, कोनाडय़ातली तेवती दिवली, पितळी काडय़ा असलेला सागवानी झोपाळा, नोकराचाकरांच्या खोल्या,  देवडीवरची बैठक, पाहुण्यारावळ्यांची खोली.. पत्ता चुकल्यासारखा वाटतोय का? नाही. नाही   ‘अँडलेड डायरीज’च वाचताय तुम्ही. ‘मार्टिनडेल हॉल’ या मॅन्शनमध्ये पहिलं पाऊल ठेवलं तेव्हा मलाही असंच वाटलं होतं ! ठिकाणं बदलली तरी संदर्भ तेच. ऐश्वर्याचे, दागिन्यांनी मढलेल्या स्रियांचे, फक्त त्या वास्तूच्या भिंतींनाच माहीत असलेल्या कालौघात दडलेल्या गुपितांचे !
अँडलेडच्या थोडं बाहेर म्हणजे साधारण दीड तास उत्तरेकडे गेलं की क्लेअर गावात लागतो तो मार्टिनडेल हॉल. मूळची एडमंड बोमेन यांची वास्तू. नंतर त्यांनी विल्यम मॉर्टलॉक यांना विकली. मॉर्टलॉक कुटुंब म्हणजे बडं प्रस्थ होतं. नजर पोहोचेल तिथर्पयत पसरलेली जमीन त्यांच्या मालकीची, अनेक गिरण्या त्यांच्या मालकीच्या ! लाखो मेंढरं यथेच्च चरतील एवढी तर नुसती कुरणंच ! या  कुटुंबाकडे तब्बल 13क् वर्ष असलेली ही वास्तू विशाल आहे.
वास्तूसमोर उभं राहताच नजर वेधून घेतं ते जॉर्जियन शैलीतलं बांधकाम, मुख्य दालनात वर गेलेला सागवानी जिना, जिन्यामागची सुती ध्याग्यातली रेशीम चित्रणं, जमिनीवरचा जाडसर गालिचा, जाड पितळेचा गॉन्ग! शहरातील कितीतरी प्रतिष्ठित व्यक्तींचं स्वागत झालं असेल  हा गॉन्ग वाजवून! मग दिसतं उंच छताला टांगलेलं बिलोरी झुंबर, नक्षीदार कोरीव टेबलावर ठेवलेलं तितकंच कोरीव अश्व शिल्प. तेवढय़ात मोझार्टची सिम्फनी वाजू लागली, आणि मी त्या सुरांकडे खेचली गेले. हे दालन खास पाहुण्यांच्या बैठकीसाठी बांधलं होतं. तेल पाणी केलेला आजही चालू अवस्थेत असलेला एक पियानो तिथे होता नि शेजारीच पियानोच्या नोटेशनचे खलित्याप्रमाणो गुंडाळी करून ठेवलेले कागद   नावानिशी, अनेक चिंचोळ्या खोक्यामध्ये भरून ठेवलेले ! त्याचा फिकट पिवळा रंग, वळणदार इंग्रजी लिपी पाहत खूप जुन्या वापरलेल्या  पुस्तकासारखा गंध मी छातीत भरून घेत असतानाच तिथल्या आजींनी त्या सिम्फनीत स्वर  मिसळून गायला सुरुवात केली नि वातावरण भारलं गेलं. पांढरा शुभ्र पायघोळ  झगा परिधान करून आजी तिथल्या फायर प्लेसला रेलून गात होत्या. काय अप्रतिम होती ती फायर प्लेस ! काळाच्या ओघात विस्तवानं यावर धूर जमा झाला होता, तो काही केल्या निघेना ! एकदा एक पोलिश कामगार कुठल्याशा कामासाठी मार्टिनडेलवर  आला होता; त्याला हा प्रकार दिसला. त्यानं ही फायर प्लेस संपूर्ण स्वच्छ करायचं आश्वासन दिलं. या शेकोटीच्या जागेवर मालकिणीचा भारी जीव. त्या पोलिश माणसानं  चक्क शेणखतानं ही जागा लख्ख केली नि तो इनाम घेऊन परतला ! ही  सगळी माहिती घेत असतानाच आजी तिथून निघून पलीकडे गेल्या होत्या. सुरांचा भर ओसरला तशी मी मग पुढच्या दालनात गेले. हे खानपानाचं दालन.  महागोनी लाकडातून घडवलेलं अजस्र डायनिंग टेबल नि नक्षीदार खोलीत मधोमध चांदीचा टी सेट ठेवला होता. बाजूला चारफुटी टोले देणारं घडय़ाळ. किती शाही मेजवान्या पाहिल्या असतील या घडय़ाळानं? इथले बटलर आणि त्यांच्या  हाताखालचे नोकर नाचले असणार याच घडय़ाळाच्या तालावर. प्रत्येक मेजवानीचा इतमाम वेगळा. काटे, डिनर स्पून, डेझर्ट स्पून अशी क्रमवार लावलेली कटलरी. फाइव्ह कोर्स डिनर मधले ठरलेले पदार्थ त्या त्या वेळीच हजर झाले असणार. तेवढय़ात बटलर पॅण्ट्रीमधून बेल वाजली आणि मी त्या दिशेनं गेले. माझा अंदाज खरा ठरला. प्रत्येक खोलीतून कळ दाबली की त्या खोलीच्या नंबर पुढील घंटा इथे खाली किणकिणू लागे, की फक्त नोकरांसाठी असलेल्या मागल्या जिन्यानं नोकर तिकडे धाव घेत अशी व्यवस्था !

यातही क्रमवारी असे ! म्हणजे आधी बटलर, हाउसकीपर, मग मेड,  कूक, फूटमन आणि मग त्यांचे पडचाकर ! प्रशस्त भटारखान्यातील दगडी ओव्हन, शेजारची उंची मद्याची स्वतंत्र खोली पाहत पाहत तिथूनच खाली तळघरात सेलर डोर आणि धान्याच्या कोठाराकडे गोल फिरत गेलेल्या जिन्यापाशी मी पोहोचले. इथूनच मला आजींचा पांढरा झगा खाली जाताना दिसला मग मीही गेले त्या झग्यामागून. तळघर  थंड होतं. आजी एकदम टोकाशी पोहोचल्या होत्या आणि मागे वळून माङयाकडे पाहून मंदशा हसल्या. त्यांचा चेहरा तुकतुकीत आणि तेजस्वी होता. मी या थंड खोल्या न्याहाळू लागले. मला तो गारवा देवळातल्या गाभा-यासारखा वाटला. मग परत फिरले नि वरच्या मुख्य दालनात आले. तिथला दुतर्फा गेलेला जिना मला दोन्ही हात पसरून बोलवत होता. म्हणत होता, ‘वरच्या खोल्यांचा इतिहास विसावलाय माझ्या कुशीत ! येतेस?’ मी अधीरपणो ढांगा टाकत वर गेले. याच कठडय़ाला रेलून पूर्वी वाद्यवृंद उभा असे. आणि मंद सुरावटीवर खालच्या दालनात पायघोळ झगे, फॅन्सी हॅट्स नि बेस्ट सूट्स घालून प्रतिष्ठित लोक बॉल डान्स करीत असत. जिन्याच्या दुतर्फा आणखी  भव्य खोल्या ! मनात विचार आला कुणी वाजवली असेल मघाशी बेल? मी मधल्याच खोलीत शिरले. ही होती मास्टर बेडरूम. इथे कोप-यातल्या एका ड्रेसिंग स्क्रीनवर सोन्याच्या धाग्यांनी शिवलेलं अतिशय मोहक चित्र आहे. त्या पार्टीशन मागून आजींचे चंदेरी केस मला चमकताना दिसले. त्या वॉल पेपर निरखून पाहात होत्या तशी मीही जवळून बघू लागले. वॉल पेपरवरच्या नक्षीचा नमुना हातानं घडवला होता. पलीकडे मिसेस मॉर्टलॉकची खोली होती. चायना ग्लासच्या उंची फुलदाण्यांमधून खिडकीचा तुकडा दिसत होता. मोर्टलॉक्सचं स्वत:च क्रिकेटचं मैदान, नौकाविहारासाठीचं तळ, अश्वशाळा. हे सर्व या वरच्या खिडक्यांमधून एकेकाळी दिसे, मग मुलांची आणि दाईची खोली होती.

 


आजी माझ्या आधी येऊन बराच काळ इथे रेंगाळल्या असाव्यात. त्या पायघोळ झग्याला  झटका  देऊन  अशा  काही डौलदारपणो जिना उतरू लागल्या की मला थेट डाउन टाउन अँबे मधल्या ‘लेडी मेरी’ चीच आठवण झाली. हातात एक पांढरी कागदी गुंडाळी घेऊन जिन्यावरून तरंगत जाव्यात तशा  त्या लायब्ररीच्या दिशेनं लुप्त झाल्या ! शेकडो पुस्तकं असलेली इंग्लिश स्टाइलची लायब्ररी ! मध्ये भलं थोरलं   बिलियर्डसचं टेबल. इथला प्रकाश मंद आणि वातावरणही काहीस गूढ गंभीर !  एका कोप-यात मला आजींची सावली दिसली आणि अचानक मोठा आवाज झाला.. मी जागच्या जागी थिजले. आपण या रम्य आणि विशाल वास्तूत आड दिवशी आलो, नवरा आणि मुलगा तर जवळच असलेल्या मिनारतो कॅफेमध्ये आहेत. आज स्वागतकक्षातली एक व्यक्ती सोडली तर इथे चिटपाखरू नाही. कुणीतरी अनामिक गाइड असावं असं आपण त्या आजींच्या मागून जातो आहोत. तेवढय़ात त्या गर्रकन वळल्या. त्या रडत होत्या. हुंदके देऊन. मी भानावर आले. म्हणाले, ‘यू कॅन टॉक टू मी’ आजी वास्तू संशोधक. त्यांची आई आता नाही. तिचाच झगा त्या तिची आठवण म्हणून घालून आल्या होत्या. जॉन मोर्टलॉकच्या बायकोनं जॉन मॉर्टलॉकच्या आठवणी प्रीत्यर्थ  1.8 मिलियन डॉलर्स अँडलाइड स्टेट लायब्ररीला दान केले. तिथे एक अख्खी  मोर्टलोक्स विंग केली आहे. या विंगमध्ये बसून मला भेटलेल्या आजी नि त्यांची आई काम करीत. इथल्या सर्व प्राचीन वास्तूंमधले बारकावे त्यांना नीटच समजत होते. तेवढय़ात स्वागत कक्षातील बाई आली. मोर्टलॉक्स आणि मार्टिनडेलवर पुस्तक प्रकाशित करायचंय; पण वारस कुणी नाहीत. रोज नवी माहिती नि दुवे जोडत राहावे लागतात त्यामुळे प्रकाशन लांबणीवर पडतंय असं सांगू लागली. 

 


आता आजी प्रसन्न हसल्या. आम्हाला स्मोकरूममध्ये घेऊन गेल्या. प्रत्येक वास्तूची फोड करून माहिती देऊ लागल्या !.. इथे मला भूत आणि भविष्य जोडणा-या दोन सख्या मिळाल्या हे निश्चित. या संपूर्ण वेळात मी एकही छायाचित्र घेतलं नाही. त्या बहाण्यानं मी पुन्हा येईन. ही प्रसन्न, विशाल वास्तू कविता उलगडावी तशी मला नव्यानं उलगडेल. तशीही तिची प्रतिमा माङया मनावर कायमची उमटलेली आहेच !!


(अँडलेडच्या सिटी लायब्ररीत कार्यरत असलेल्या लेखिका दीर्घकाळ ऑस्ट्रेलियामध्ये वास्तव्यास आहेत.)

 himaninilesh123@gmail.com

 

 

Web Title: The secret of 130 year old architecture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.