- शिल्पा दातार


ती तिच्या करिअरमध्ये अव्वल असते; पण तिचं लग्न होतं; पुढे अनेक कारणांमुळे तिच्या करिअरमध्ये खंड पडतो. कधी बाळंतपण, कधी नव-याची बदलीची नोकरी किंवा घरच्या जबाबदा-या यांना तिला आपल्या करिअरपेक्षा अधिक झुकतं माप द्यावं लागतं. कालांतरानं जबाबदा-या कमी होत जातात, मुलं थोडी मोठी झाल्यावर आपल्या विश्वात रमतात, नवरा त्याच्या करिअरमध्ये सेट झालेला असतो तेव्हा तिच्या मनात येतं, ‘अरेच्चा, मी तर शिकले आहे, चांगलं करिअर करत होते.. आणि आता.. मध्ये एवढी गॅप पडल्यावर पुन्हा मी ‘त्या’ शिक्षणाचा उपयोग करू शकेन का? काळ खूप पुढे  गेलाय. मला तर आता ऑफिसमधल्या कामाची सवयही राहिलेली नाही. मी पुन्हा नोकरी करू शकेन का? आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी होऊ शकेन का? स्वत:च्या गरजेसाठी लागणारा पैसा स्वत:च्या ज्ञानाचा, कौशल्यांचा वापर करून स्वत: मिळवू शकेन का?’
- आता ‘ती’च्या या प्रश्नांची उत्तरं होय अशीच मिळतील. महिलांना ब्रेकनंतर पुन्हा करिअर करण्याच्या संधी अनेक संस्था, कंपन्या देत आहेतच; शिवाय अनेक स्टार्ट-अप्सही त्यांना त्यासाठी मदत करत आहेत. 
मुलींचं शिक्षण मुलग्यांच्या बरोबरीनं होतं. शिक्षणाच्या क्षेत्रतली ‘जेंडर गॅप’ संपवली आहे; पण करिअर करताना मुलींना अपरिहार्य कारणास्तव मध्येच ब्रेक घ्यावा लागतो. 2000 साली एलपीजीची (लिबरलायङोशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन) लाट आली. त्यानं कामाच्या ठिकाणी असलेली कार्यपद्धती बदलली. भारतीय कॉर्पोरेट व सेवा क्षेत्रवरही त्याचा परिणाम झाला. भारताच्या मनुष्यबळ नियोजनामध्ये महिलांना संधी मिळायला लागली. त्या संधीचं बोट पकडून अनेक महिला ‘सेकंड इनिंग’साठी स्वत: सज्ज झाल्या; पण त्यांनी आपल्याच सारख्या इतर महिलांनाही मदतीचा हात दिला. 
लग्न झाल्यावर, बाळंतपणाच्या वेळी, घरातील वृद्ध व्यक्तीच्या शुश्रूषेसाठी, मुलांना वेळ देण्यासाठी तसंच स्वयंपाक, घराची देखभाल या गृहीत धरलेल्या कामांसाठी अनेकजणी करिअरमध्ये ब्रेक घेताना दिसतात. अशावेळी त्यांना आपापल्या क्षेत्रत काम करण्याची इच्छा असल्यास कालानुरूप झालेल्या बदलांबाबत प्रशिक्षण देऊन पुन्हा त्यांच्या करिअरच्या क्षेत्रत सामावून घेण्यासाठी कॉर्पोरेट क्षेत्रतील काही संस्था पुढे सरसावल्या आहेत. त्यासाठी  अनेक स्टार्ट -अप्स काम करत आहेत. 
‘आय ड्रीम करिअर’ ही दिल्लीस्थित कंपनी पुन्हा करिअर करू इच्छिणा:या महिलांसाठी काम करते. मुख्य ऑफिस दिल्ली आणि  बंगळुरू इथं असून, या कंपनीचे संपूर्ण देशभरात प्रतिनिधी आहेत. या कंपनीतील साडेचारशे महिला करिअर काउन्सिलिंग करतात. या सर्वजणींनी करिअर ब्रेकनंतर हे करिअर निवडलं आहे. वेगवेगळे सेमिनार्स घेऊन विद्यार्थ्याना करिअरबाबतची माहिती, शिक्षण क्षेत्रतले बदलते प्रवाह, नवीन तंत्रज्ञान याबाबत माहिती दिली जाते. समुपदेशनाच्या माध्यमातून  त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला जातो. या कंपनीमध्ये वीस र्वष कॉर्पोरेट क्षेत्रचा अनुभव असलेल्या मुंबई येथील वर्षा रिबेलो समुपदेशक आहेत. त्या मुंबईमध्ये 
रुपारेल कॉलेजमध्ये  अधिव्याख्यात्याही होत्या. करिअरमध्ये ब्रेक घेऊन पुन्हा परतण्याचा अनुभव वर्षाताईंनाही आहे. निवृत्त झाल्यावर त्यांनी त्यांच्या आधीच्या करिअरला साजेसं असं समुपदेशनाचं क्षेत्र वयाच्या साठाव्या वर्षी निवडलं. त्या म्हणाल्या,  ‘नव्यानं करिअर करण्याच्या क्षेत्रत काम करण्यासाठी आम्ही महिलांना पाठबळ देतो.  पुन्हा करिअर करण्याचा निर्णय घेतलेल्या महिलांना आम्ही पुन्हा अक्षरश: उभं करतो. ऑनलाइन प्रशिक्षण देतो. यामध्ये मुलाखतीच्या तयारीपासून आत्मविश्वास देण्यार्पयत सर्व काही करतो. बरेचदा नव्यानं करिअर करताना त्या महिलेच्या आजूबाजूची परिस्थिती सकारात्मक नसते. आत्मविश्वास कमी झालेला असतो. आम्ही हे करू शकतो, हा आत्मविश्वास त्यांना मिळवून देणं हे आव्हानात्मक असतं. आत्मविश्वास हा पुढील करिअरचा बेस आहे, असं मला वाटतं.’
 डॉ. सौंदर्या राजेश यांनी स्थापन केलेल्या ‘अवतार वुमन’ या स्टार्ट-अपचं मुख्य ऑफिस चेन्नईला असून, भारतभर तिच्या शाखा आहेत. डॉ. सौंदर्या सांगतात, ‘स्री म्हणजे जणू दशावतार. एकाचवेळी अनेक कामं लीलया पेलणारी. घर, संसार, बालसंगोपन, शुश्रूषा यात रमलेली ती कॉर्पोरेट, संशोधन, सेवा माध्यमांच्या क्षेत्रतही तितकीच सक्षम असते. म्हणूनच भारतात करिअर ब्रेक घेतलेल्या महिलांच्या मदतीसाठी सुरू केलेल्या स्टार्ट अपचं नावच आम्ही अवतार ठेवलं’
 महासत्ता होऊ पाहणा:या, जागतिकीकरणाच्या रेटय़ाला आपलंसं करणा:या या देशात ब्रेकनंतर महिलांना करिअरमध्ये त्यांच्या अनुभवाच्या आधारावर आणि बुद्धीला साजेशा वेतनावर, पदावर पुन्हा रुजू करू इच्छिणा:या कंपन्या नगण्य आहेत.  डॉ. सौंदर्या यांनी  सासूबाईंकडून 60हजार रुपयांची मदत घेऊन ‘अवतार’ची स्थापना केली. नव्यानं करिअर करू इच्छिणा-या तब्बल दोनशे महिला त्यांच्या कामात सहभागी झाल्या. 2000 साली अवतार क्रि एटर्स, त्यानंतर 2008 साली अवतार ह्युमन कॅपिटल आणि 2011 मध्ये फ्लेक्झी करिअर्स इंडिया सुरू केली. अवतार हे महिलांसाठी भारतातलं पहिलं सर्वात मोठं स्किल बिल्डिंग इनिशिएटिव्ह असून, चेन्नईसह मुंबई, पुणो, बेंगळुरू, जयपूर, हैदराबाद, गुरगाव येथे त्याच्या शाखा आहेत.  डॉ. सौंदर्या सांगतात,  ‘गेल्या दहा वर्षात जवळपास आम्ही 50 हजारहून अधिक महिलांना पुन्हा करिअर करण्याची संधी मिळवून दिली आहे. आम्ही भारतभरात 300 कंपन्यांशी जोडलेलो आहोत. आता भविष्यात छोटय़ा कंपन्या व सेवा केंद्रांमध्ये पोहोचण्याचा विचार आहे.’ 
उपलब्ध आकडेवारीनुसार कौटुंबिक कारणांनी रोजगाराच्या क्षेत्रतून बाहेर पडणा-यां पैकी 35 टक्के जणी बाळंतपणामुळे नोकरी सोडतात, तर 45 टक्के महिला इतर कारणांमुळे. गेल्या 19 वर्षामध्ये अवतारच्या साहाय्यानं 40 हजार महिलांनी करिअरमध्ये नवीन क्षीतिजं पार केली आहेत. 8 हजारहून अधिक महिला त्यांच्या आधीच्या करिअरमध्ये परत आल्या आहेत. बायका मॅटर्निटी लिव्ह घेतात तर आम्ही का नाही, असं पुरुष म्हणतात तेव्हा त्यासाठीही अवतारसारख्या कंपन्या पुरुषांना बालसंगोपनासाठी सुटी देण्यासाठी आग्रही असतात, जेणोकरून महिलांच्या करिअरमध्ये बाधा येऊ नये अशा इको सिस्टीम राबवण्यास मदत केली जाते. कार्यकुशलतेत महिलांचा सहभाग वाढल्यास आर्थिक उन्नती होईल, देशाच्या जीडीपीवरही त्याचा सकारात्मक परिणाम होईल, असं आकडेवारी सांगते. 
बंगळुरूच्या नेहा बगारिया यांची कहाणीही वेगळी नाही. त्यांनी जॉब्ज फॉर हर नावाचं पोर्टल सुरू केलं आहे. या पोर्टलला भारतभरात दरमहा सरासरी 5क् हजार जणी भेट देतात. सिटी बँक, फ्यूचर ग्रुप, गोदरेज ग्रुप, कोटक महिंद्रा या नामांकित कंपन्यांसह एकूण 750 कंपन्यांशी जोडलेलं हे पोर्टल नोकरीच्या संधी, मार्गदर्शक, पुनर्विक्री, नेटवर्किग, समुदाय आणि प्रेरणा या गोष्टींवर काम करतं. मोठय़ा ब्रेकनंतर स्रियांना करिअरमध्ये पुन्हा काम करण्यास संधी दिली जाते. 
लग्नानंतर 2005 ला मुंबईहून बंगळुरूला शिफ्ट झालेल्या नेहा यांनीही करिअरमध्ये बाळंतपणानंतर 3 वर्षाची गॅप घेतली होती. त्यानंतर केमवेल बायोफार्मा या घरच्याच कंपनीत पुन्हा मार्केटिंग आणि फायनान्स सांभाळताना मधली दरी जाणवली. दुस-या मुलाच्या जन्मानंतर त्यांनी पुन्हा कंपनीत काम करायला सुरुवात केली. त्यांचं परतणं सोपं होतं; पण काही कारणानं करिअरमध्ये खंड पडलेल्या इतर स्रियांना सामावून घेण्यास कंपन्या नाखुश असतात. हे जाणवल्यावर त्यांनी त्याच क्षेत्रत करिअर करायचं ठरवलं. मार्च 2015 मध्ये महिलांसाठी ऑनलाइन व्यासपीठ सुरू केलं. त्यानंतर काही कंपन्या या अनुभवी महिलांना घेण्यासाठी अनुकूल झाल्या. सहा महिलांबरोबर सुरू केलेलं काम आता बहरलंय. आज त्यांच्याकडे 50 जणांची टीम आहे. त्यातल्या 30 जणी ब्रेकनंतर परतलेल्या आहेत. भारतातील 3500 कंपन्यांशी जोडलेला स्टार्ट-अप रिझ्युमे रायटिंग, मुलाखत प्रशिक्षण, विविध कौशल्य आणि  आत्मविश्वास निर्माण करण्यावर भर दिला जातो.
 ‘हर सेकंड इनिंग्ज’च्या मंजुला धर्मलिंगम करिअरमधील सेकंड इनिंगसाठी महिलांना हजारो संधी उपलब्ध करून देत आहेत. त्यांनी 2018 या एकाच वर्षात 200 हून अधिक महिलांना नव्यानं करिअरच्या संधी मिळवून दिल्या आहेत.  हर सेकंड इनिंगमध्ये साहाय्य आणि प्रशिक्षण, कर्मचारी क्षमता, डायव्हर्सिटी हायरिंग प्लॅटफॉर्म, सल्ला सेवा याअंतर्गत रिझ्युमे कसा लिहायचा इथपासून रिटर्नशिप कार्यक्र मांतर्गत भविष्यात लागणारी कौशल्य, प्रकल्प, सर्टिफिकेशन्स, अनुभव, करिअर साहाय्य या गोष्टींवर भर दिला जातो.  
नाशिकमधील योगीता जगधने यांनीही ‘इमोशनल इंडिपेन्डन्सी’च्या माध्यमातून आपल्या करिअरमध्ये परतणा-यामहिलांना ख-या अर्थानं बळ दिलं आहे. 2017 साली त्यांनी नाशिकमध्ये  ‘बीएमजे फाउण्डेशन’ची स्थापना केली. त्या म्हणतात, ‘ पुन्हा काम करू इच्छिणा-या बायकांसाठी समुपदेशनाबरोबरच 45 दिवसांचे प्रशिक्षण वर्गही मी घेते. त्यांना करिअरच्या नवीन वातावरणात आत्मविश्वासानं परत आणणं हे महत्त्वाचं काम आहे.’ 
त्या सांगतात, ‘माझ्या प्रशिक्षणाला एकदा 10  महिन्यांचं बाळ घरी ठेवून एक आई येत होती, यावरूनच या विषयाची गरज किती आहे ते ओळखा.’ 

--------------------------------------------

नवे रस्ते, नव्या शक्यता
‘करिअरमध्ये पुन्हा परतण्याचं नियोजन करणा-या महिलांना विश्वास आणि उभारीची गरज असते. त्यांना काहीतरी करायचं असतं; पण काय करावं ते कळत नाही. त्यांना त्यांचं शिक्षण, कौटुंबिक, भोवतालची परिस्थिती यानुसार नवे मार्ग शोधावे लागतात. ज्यांना 9 ते 5 नोकरी करायची नसते अशा महिलांनाही करिअरचे नवे रस्ते, नव्या शक्यता समजून घ्यायच्या असतात. घरच्या रूटीनमधून, वातावरणातून बाहेर पडून काम करू इच्छिणा-यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणं, हे या क्षेत्रातलं सर्वात मोठं आव्हान आहे.’

- गरिमा गुप्ता
‘आय ड्रीम करिअर’

-------------------------------------
 

फुलपाखराचा सुरवंट
 ‘आयुष्याची सेकंड इनिंग असते, तशी करिअरचीही असते. तेव्हा आपली नोकरी, आपली कार्यकुशलता नव्यानं जोखावी लागते. ब्रेक घेतलेल्या काळात कदाचित आपल्यातल्या  फुलपाखराचा पुन्हा सुरवंट झालेला असतो. आपली बौद्धिक पातळी, प्रगल्भता, नियोजन क्षमता या सगळ्यालाच नव्याने धार लावावी लागते.’
- मंजुला धर्मलिंगम, ‘हर सेकंड इनिंग्ज’
-------------------------------------------------

 

ब्रेक घेतल्यानंतर..
‘मी 1990साली बँकेत नोकरी करत होते. लग्नानंतर बाळंतपणासाठी मला नोकरी सोडावी लागली. मुलं थोडी मोठी झाल्यावर पुन्हा नोकरी मिळवताना अनेक अडचणी आल्या. मी मुलाखतींमध्ये निवडली जायचे; पण माझ्या   क्षमतेनुसार मला पगार दिला जात नसे. फ्रेशर्सना देतात तो पगार देऊ केला जाई. हा माझ्या  अनुभवाचा व कार्यक्षमतेचा अपमान होता. मी ब्रेक घेतला या विषयावर संशोधन करायला सुरु वात केली, तेव्हा लक्षात आलं की कॉर्पोरेट सेक्टर महिलांच्या क्षमतेबद्दल अनभिज्ञ असून, तिथं याबाबत जाणीव-जागृती निर्माण करण्याची गरज आहे. पुन्हा करिअरमध्ये येऊ इच्छिणा-या आपल्यासारख्या खूप जणी असतील, त्यांचं काय? असा विचार करून मी त्या प्रश्नातूनच माझं स्टार्ट-अप सुरू केलं’
- डॉ. सौंदर्या राजेश, संस्थापक,‘अवतार वुमन’
--------------------------------------------------------------------

शिक्षण वाया जाऊ नये म्हणून..
‘स्वत:चं शिक्षण सार्थकी लावता येईल, उपयोगात आणता येईल असं काही प्रत्येकीनं करायला पाहिजे. जिला घडय़ाळाच्या काटय़ाप्रमाणो नोकरी करणं शक्य नसतं तिनं विशिष्ट कालमर्यादेचा प्रोजेक्ट घेऊन काम केल्यास वेळेची बंधनं नसतात. महिलांमध्ये जात्याच समजून घेण्याची क्षमता चांगली असते. सहजपणो बोलणं हा त्यांचा जन्मत:च स्वभाव किंवा गुण असतो. हे गुण समुपदेशनासाठी उपयोगी ठरतात.’
- वर्षा रिबेलो,
मुंबई


(लेखिका मुक्त पत्रकार आहेत)

mrs.shilpapankaj@gmail.com

 

 

Web Title: Second innings: -In the world of womens who want to start a new innings after break

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.