Road Schooling: - An option chosen by parents in Hyderabad for their daughters to teach life lessons | रोड स्कूलिंग :- हैदराबादमधील पालकांनी आपल्या मुलींसाठी  निवडलेला एक फिरस्ता पर्याय

रोड स्कूलिंग :- हैदराबादमधील पालकांनी आपल्या मुलींसाठी  निवडलेला एक फिरस्ता पर्याय

- प्रतिनिधी

होम स्कूलिंग करणारे अनेक पालक  जगभरात आहेत; पण आता ‘रोड स्कूलिंग’ ही नवीन संकल्पना रूढ होऊ पाहत आहे. भारताबाहेरील देशात मुलांना रोड स्कूलिंगद्वारे शिकवणारे अनेक पालक आहेत. भारतातही हैदराबादमधील गंगाधर आणि राम्या हे जोडपंही आपल्या जुळ्या मुलींना शिकवण्यासाठी रोड स्कूलिंगचा प्रयोग करत आहेत.
मागच्या वर्षी गंगाधर आणि त्यांच्या पत्नी राम्या यांनी आपल्या नऊ वर्षाच्या जुळी मुलींसोबत 90 दिवसांची ‘रोड ट्रीप’ केली. 15 राज्यांतून ते 13,000 कि.मी फिरले. आपल्या मुलींना जे काही शिकवायचे ते प्रवासातून, निसर्गाच्या अन् माणसांच्या सान्निध्यात राहून हे या दोघांनी ठरवलं. आणि या शिक्षणाची सुरुवात मुली अगदी दोन महिन्यांच्या होत्या तेव्हापासून त्यांनी केली. 
मुळात गंगाधर यांनी अठरा वर्षे कार्पोरेट सेक्टरमध्ये काम केलं आहे. मागच्याच वर्षी त्यांनी आपली नोकरी सोडली ती खास मुलींच्या या रोड स्कूलिंगसाठीच. फिरणं हा गंगाधर आणि राम्या यांचा छंद. या फिरण्यातून जे गवसतं ते जगाच्या कोणत्याही शाळेत शिकून मिळणार नाही यावर दोघांचाही ठाम विश्वास. म्हणूनच आपल्या मुलींना शिकवण्यासाठी त्यांनी ‘रोड स्कूलिंग’ हे माध्यम निवडलं. 


 आपल्या या रोड स्कूलिंगबाबात गंगाधर सांगतात की, ‘होम स्कूलिंगमध्ये तरी काही विशिष्ट अभ्यासक्रम असतो डोळ्यासमोर; पण रोड स्कूलिंग करताना आम्ही काहीच ठरवत नाही. सकाळी उठवल्यानंतर मनात एखादं ठिकाणं आलं की आम्ही दोघंही त्यावर चर्चा करतो. त्याबद्दलची शक्याशक्यता तपासतो, जुजबी तयारी केली की आमच्या नॅनोतून आम्ही निघतो. फार काही गुगलबिगल करत बसत नाही. त्यामुळे प्रत्यक्ष त्या त्या गावात, शहरात गेल्यानंतर आम्हाला जे सरप्राइजेस मिळतात ते आम्हाला महत्त्वाचे वाटतात. ‘आपल्या प्रवासाचं वेळापत्रक आखताना ते प्रामुख्यानं मुलींचा विचार करतात आणि मुलींचं मत घेतात. समजा एखाद्या दिवशी मुलींना कन्नड शिकण्याची इच्छा असेल तर त्या दिवशी त्या कन्नड शिकतात. कमीत कमी साधनात प्रवास आणि जगणं याचे धडेही या मुली प्रवासादरम्यान गिरवतात. प्रवासादरम्यान सुरक्षित ठिकाणी तंबू ठोकून रात्रीचा मुक्काम करणं किंवा प्रत्यक्ष गावातल्या लोकांसमवेत राहाणं, स्थानिक पदार्थ खाणं याद्वारे समाज आणि संस्कृतीची ओळख गंगाधर आणि राम्या आपल्या मुलींना करून देत आहेत. प्रवासादरम्यान प्लॅस्टिक आणि जंक फूडचा वापर ते पूर्णपणे टाळतात. वेगवेळ्या राज्यांतून, शहरांतून, गावांतून प्रवास करताना त्या त्या भागातील महत्त्वाच्या व्यक्तींना ते भेटतात. त्यांच्याशी गप्पा मारतात. यामुळे मुलींना वेगवेगळ्या क्षेत्रतील व्यक्ती , त्यांचे काम आणि विचार यांची जवळून ओळख होत आहे. रोड स्कूलिंगद्वारे मुलींना आत्मविश्वास, स्वावलंबन या मूल्यांची ओळख गंगाधर आणि राम्या करून देत आहे. शिवाय रोड स्कूलिंगद्वारेच आपल्या मुली भीतीशी दोन हात करायला, प्राण्यांवर प्रेम करायला, भावना ओळखायला आणि जपायला शिकत असल्याचं गंगाधर सांगतात. 
 मुलींना जलचक्राचं शिक्षणही त्यांनी प्रत्यक्ष चेरापुंजीला जाऊन दिलं. मुलींनी शेतात प्रत्यक्ष नांगरणी केली. ईशान्य भारतातील एका दुर्गम गावात ते एकदा अडकून पडले होते. तेव्हा गावातील अनोळखी व्यक्तींनी त्यांची मदत केली. यातून मुलींना मानवतेचा धडा प्रत्यक्ष अनुभवता आला, असं गंगाधर सांगतात.  


     ‘कोरोनामुळे त्यांचं हे रोड स्कूलिंग काही महिने बंद होतं.  तेव्हा घरात एकमेकांसोबत राहण्याचा, घरातली कामं एकत्र मिळून करण्याचा, स्वयंपाक , कलाकुसर शिकण्याचा आनंद त्यांनी घेतला. मुलींनी ऑनलाइनवर भरतनाटय़मचे धडे घेतले. प्रवासावरची बंधनं कमी झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा हैदराबाद ते म्हैसूर हा प्रवास केला. गणित, विज्ञान हे विषय शिकण्याचे मार्ग पुस्तक , शाळा, क्लास याच्यापलीकडेही असू शकतात. आणि गणित,  विज्ञान  यापेक्षाही माणसं, निसर्ग, आपली पृथ्वी समजून घेणं गरजेचं असल्याचं गंगाधर आणि त्यांच्या पत्नीचं मत आहे. आणि हे सर्व  आपल्या मुलींना समजून देण्यासाठी त्यांनी मोठय़ा आत्मविश्वासानं रोड स्कूलिंगचा पर्याय निवडला आहे. 

 


 

Web Title: Road Schooling: - An option chosen by parents in Hyderabad for their daughters to teach life lessons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.