Rhea chakraborty viral T shirt words & few questions about patriarchy | ती ना? तसलीच! - हे कोण ठरवतं? -रिया चक्रवर्ती आणि काही प्रश्न

ती ना? तसलीच! - हे कोण ठरवतं? -रिया चक्रवर्ती आणि काही प्रश्न

ठळक मुद्देकधी न पाहिलेल्या, ओळखदेखील नसलेल्या मुलीला लोक चटकन दोषी ठरवून मोकळे होतात, का? 

- संयोगीता ढमढेरे 

अप्सरा, राक्षसीण, हडळ, विषकन्या, ढालगज भवानी, बाजारबसवी, कैदाशिण, वारांगना, डाकीण, खलनायिका आणि वेश्या! वेदकाळ असो की सत्योत्तर, देव असो की दानव, राजेशाही असो की लोकशाही, आदिवासी असो की महानगरवासी, भारत असो की युरोप, सर्व भाषांत याचे समानार्थी शब्द सापडतात. 
देवी, सहनशील, त्यागमूर्ती, क्षमाशील, नम्र, मातृत्व, मार्दव, लाघव म्हणजे बाई असं समीकरण मांडत असतानाच असं ‘स्त्रीत्व’ नसलेल्या बाईच्या या नावांची आणि  रुपांची कल्पना सर्वत्न झाली आहे. आई, बहीण, मुलगी यासम नात्यातली स्त्री  पवित्र, पण याच स्रीला पुरुषाची शय्यासोबतीण या नात्यात तिला वरीलपैकी कोणतंही विशेषण सहज लागू शकतं. ते विशेषण लावली जाणारी प्रत्येक स्त्नी ही आई, बहीण किंवा मुलगी असतेच की, पण स्त्री  ‘चांगली’ आहे हे सांगण्यासाठी ती कुणाची तरी ‘आई-बहीण’ आहे हे सांगणं महत्त्वाचं असतं. खरं तर जी नाती बाईसाठी असतात तशी समांतर नाती पुरु षासाठीही असतातच ! पण पुरुष हा भाऊ, बाप असतो असं म्हणाल्याने फारसा गुणात्मक फरक पडत नाही. आई-बहीण ही नाती पवित्र म्हणूनच एखाद्याचा वर्मी लागेल असा अपमान करायचा असेल तर आया बहिणींचा उद्धार होतो ! 


मुलाला जन्म घालण्याच्या उद्देशाने केलेलं कर्म पवित्र असतं. मात्न स्वखुशीसाठी शारीरिक संबधाची मागणी करणार्‍या, पुढाकार घेणार्‍या, स्वतर्‍चा लैंगिक जोडीदार निवडणार्‍या स्त्रिया बदनाम ठरल्या आणि आजही ठरतात. पुरु षांच्या फॅन्टसी या स्त्रियांनी व्यापून टाकली असली तरी वास्तवात, घरात (शय्यागृहाच्या बाहेर) अशा स्त्रियांना स्थान नसतं. या स्त्रिया कर्तव्यदक्ष, परमार्थाच्या मार्गाला लागलेल्या पुरु षाला मोहात पाडतात आणि त्याचं वाटोळं करतात. विश्वामित्नाची तपस्या भंग करणारी किंवा पुरुरवाला पृथ्वीवर एकाकी सोडून जाणारी मेनका आणि उर्वशी या बोलून चालून अप्सराच ! पण लोपामुद्रासारखी ऋषीपत्नी पण अगत्स्य ऋषींना तपापासून परावृत्त करून मुलं जन्माला घालून जगरहाटी चालवायला सांगते. स्वार्थी, सुखलोलुप, हव्यास असणार्‍या अशा बायकांमुळे भोळ्याभाबडय़ा पुरुषांचं अत्यंत मूल्यवान, ओजस्वी वीर्य वाया जातं आणि जीवन नष्ट होतं यावर भारतीय समाजाचा विशेष विश्वास आहे. 
शूर्पणखा रामाकडे आकर्षित झाली नसती, सीतेने हरणाच्या कातडय़ाची चोळी घालण्याचा हट्ट केला नसता, द्रोपदी रूपगर्विता नसती तर रामायण-महाभारत घडलंच नसतं अशी आपल्या समाजाची दृढ धारणा आहे. अशावेळी इंद्राने कपट करून अप्सरांना पाठवणं, लक्ष्मणाने शूर्पणखेला नकार देण्याऐवजी तिचं नाक कापणं, जन्मापासून असलेले कौरव-पांडव शत्नुत्व आदी गोष्टी सहज दुर्लक्षित होतात. 
स्पष्ट बोलणं, प्रश्न विचारणं, लैंगिक संबंधासाठी पुढाकार घेणं, स्वतर्‍च्या स्वतंत्न अस्तित्वावर विश्वास असणं, विचार करणं, महत्त्वाकांक्षा बाळगणं हे बुद्धी-कौशल्याचं प्रतीक असलेले पुरु षांचे गुण.
तसे गुण स्रीकडे असतील तर ते समाजासाठी घातक ठरतात हा समज बेटी पढाओ, बेटी बचाओचा गाजावाजा करण्याच्या जमान्यातही बदलेला दिसत नाही. 
मुलं लग्नाच्या वयात आली की  भारतीय पालकांना चिंता सतावू लागतात. मुलीला सासर चांगलं मिळावं आणि मुलाला चांगली मुलगी मिळावी! मुलीवर सासरी कामाचा भार पडू नये, तिचा छळ होऊ नये अशी इच्छा असते. आणि घरी येणार्‍या सुनेने घर फोडू नये, मुलाला ताटाखालचं मांजर बनवू नये अशा माफक अपेक्षा असतात. खरं तर मुलगी असो वा मुलगा लग्न होतं म्हणजे त्या दोघांना लैंगिक जोडीदार मिळतो. हा लग्नाचा सर्वात प्रमुख आणि महत्त्वाचा पैलू असतो. लैंगिक संबंधांचा आनंद आणि हवं असल्यास इच्छेनुसार एखाद दुसरं अपत्य हे त्याचं फलित असतं. वयात आल्यापासून मुला-मुलींना बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड असणं याची महानगरीय मध्यमवर्गाला आता सवय होऊ लागली आहे. तसाच लग्नपूर्व लैंगिक संबंध आणि लिव्ह इन हा काही फक्त वाचनीय किंवा गॉसिपचा विषय राहिलेला नाही. घरात आणि आसपास अशी ढळढळीत उदाहरणं सर्रास दिसतात, पण तरी एकूणच लैंगिक संबंधांबद्दलच्या ‘टॅबू’मुळे या वास्तवाकडे बघून न बघितल्यासारखं केलं जातं. 
मुलीचा बॉयफ्रेंड म्हणजे ‘भाडीपा’तला बबू असावा अशी अपेक्षा, पण मुलाची गर्लफ्रेंड, अगदी स्वतर्‍ निवडलेली सून मात्र गरीब, सालस असावी, घरातला प्रत्येक सदस्य, घरातली प्रत्येक जबाबदारी तिने आपली म्हणावी अशी इच्छा असते. 


जिला असं जमत नाही ती मुलगी मुलाला भुलवणारी, त्याच्या पैशावर डोळा असणारी, त्यावर डल्ला मारणारी, त्याला बिघडवणारी किंवा खाऊन टाकणारी ठरते. हे आपल्या समाजात खोलवर रु जलेलं आहे. 
कधी न पाहिलेल्या, ओळखदेखील नसलेल्या मुलीला लोक चटकन दोषी ठरवून मोकळे होतात, त्यामागे हे सारंही असेल का? 


( लेखिका मुक्त पत्रकार आहे.) 
 mesanyogita@gmail.com

Web Title: Rhea chakraborty viral T shirt words & few questions about patriarchy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.